शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (20:10 IST)

उद्धव ठाकरे : ‘माझ्या लोकांनीच मला दगा दिला’,म्हणत ठाकरे सरकारने घेतले 'हे' 10 मोठे निर्णय

बुधवारी संध्याकाळी झालेल्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. माझ्या पक्षातल्या लोकांनीच मला दगा दिला असं ते बोलले आहेत. अशी माहिती जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. त्यावर कोर्टात निर्णय अपेक्षित असताना उद्धव ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
 
त्याबरोबरच ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय घेतले -
 
औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामांतरासह मान्यता
उस्मानाबाद शहराच्या 'धाराशीव' नामांतरासह मान्यता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता
राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.
कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार.
अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार.
ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय.
शासन अधिसूचना 8 मार्च 2019 अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार मंत्रिमंडळ बैठकीनंतर म्हणाले की, "कामाचा कुठलाही अनुभव नसताना अडीच वर्षं सगळ्यांनी सहाकार्य केलं. पुढेसुद्धा ते थांबणार नाहीत. त्यांनी आयुष्यात थांबणं शिकलंच नाही, असंही उद्धवजी म्हणाले. आमचे त्यांनी आभार मानले. मुळात कुणीही काही चांगलं केलं की आपण आभार मानतोच ना."
 
"स्पाईन सर्जरी झाल्यानंतर महिन्याभरात काम सुरू करणारी दुसरी व्यक्ती दाखवा. एक तरी नाव सांगा. पण उद्धवजींनी काम सुरू केलं. अशा माणसासोबत कटकारस्थान होणार असेल, तर महाराष्ट्राची 12 कोटी जनता विचार करणार आहे की नाही, हे मला माध्यमांनी सांगावं," असंही सुनील केदार म्हणाले.