बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:16 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कटात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फसले

महाराष्ट्रात राज्यकारभार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले उद्धवपंत ठाकरे यांना नेमके झाले तरी काय? असा प्रश्न महाराष्ट्रातील सुजाण सुबुद्ध नागरिकांना पडावा अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाल्याचे चित्र कालपासून दिसू लागले आहे. माजी लोकसभा सदस्य किरीट सोमय्या हे सध्या महाआघाडीतील मंत्र्यांच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहेत. सोमय्या महाआघाडीतील मंत्र्यांचे कथित भ्रष्टाचाराचे घोटाळे लोकांसमोर मांडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात कालपासून जो हाय व्होल्टेज नाट्य घडवण्यात आला तो बघता उद्धवपंत असे का वागतात? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
 
किरीट सोमय्या हे सध्या महाआघाडी सरकारमधल्या नेत्यांचे घोटाळे मोठ्या प्रमाणात बाहेर काढत आहेत. आतापर्यंत ११ नेते त्यांच्या रडारवर आले आहेत. अजूनही बरीच नावे त्यांनी जाहीर केली आहेत, त्यामुळे घोटाळ्यांचा भांडाफोड करण्याचा हा सिलसिला अजून काही काळ निश्चितच चालणार आहे. गेल्या आठवड्यात सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा एक घोटाळा बाहेर काढला, हे प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यातले होते, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन मुश्रिफांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्याचा इरादा सोमय्यांनी जाहीर केला होता. निर्धारित कार्यक्रमानुसार आज सोमवार दि. २० सप्टेंबरला कोल्हापुरात पोहोचून ते कागल पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करणार होते. 
 
वस्तुतः कोणत्याही कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करण्याचा अधिकार कुणालाही असतो, त्याच प्रकारातून सोमय्या तक्रार दाखल करणार होते, त्यात कुणाची काही हरकत असण्याची काही कारण नव्हते, सोमय्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी करून तक्रारीत तथ्य आहे काय? हे पोलिसांना तपासता आले असते आणि तक्रारीत तथ्य सापडले नसते तर मुश्रीफांना क्लीन चिटही देता आली असती.
 
मात्र ही प्रक्रिया पूर्ण न करता, आधीच सोमय्यांना अडवायचे असा महाआघाडी सरकारचा विचार असावा त्यानुसार काल १९ सप्टेंबरला दुपारी सोमय्यांच्या  मुंबईतील घरी जाऊन मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली, त्यांना कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात असलेला गणेशविसर्जनाचा माहोल आणि किरीट सोमय्या जिल्ह्यात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  सोमय्यांना विरोध करण्याची केलेली घोषणा अशी प्रमुख कारणे देण्यात आली होती. वस्तुतः कोल्हापूर पोलिसांची नोटीस देण्यासाठी मुंबई पोलिसांनी जाणे हे कुठेतरी न पटणारे होते, त्यातही मुंबई पोलिसांनी द्यायचीच होती तर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जाऊन ती नोटीस पोहोचवली असती, तरी चालण्यासारखे होते. मात्र ही नोटीस देण्यासाठी सोमय्यांच्या घरसमोर प्रचंड मोठा पोलिसांचा ताफा उभा करण्यात आला होता. परिणामी  सोमय्यांना स्थानबद्ध केले कि काय? अशी शंका जनसामान्यांच्या मनात निर्माण झाली होती.
 
या प्रकारामुळे एकूणच प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला गेला. पोलिसांनी काहीवेळ सोमय्यांना घरातच अडकवून ठेवले. नंतर त्यांना गणेश विसर्जनासाठी जाण्यास परवानगी देण्यात आली. गणेशविसर्जनासाठी गेलेले सोमय्या तिथूनच सरळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर पोहोचले आणि तिथूनच त्यांनी कोल्हापूरची महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली, यावेळी सर्व माध्यम प्रतिनिधी तिथे उपस्थित राहतील याची काळजी त्यांनी घेतली होती. त्यामुळे किरीट सोमय्या कोल्हापूरला निघाले या घटनेचा लाईव्ह टेलिकास्ट सर्व वृत्तवाहिन्यांनी सुरु केला होता, विशेष म्हणजे प्रत्येक स्टेशनवर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित राहून सोमय्यांचा जयजयकार करत होते, याचवेळी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमून सोमय्यांच्या नावाने शिमगा सुरु झाला होता, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही तिथे पोहोचणार अशी हवा निर्माण झाली होती. 
 
महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच सांगली जिल्ह्यातील कराड रेल्वे स्टेशनवर सोमय्यांना उतरवून घेण्यात आले. तिथे जिल्हाबंदीचा आदेश त्यांच्यावर बजावण्यात  आला. मग सकाळी ९ वाजता सोमय्यांनी पत्रपरिषद घेऊन मुश्रिफांवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला आणि ते मुंबईकडे यायला निघाले. हे हाय व्होल्टेज नाट्य काल दुपारी १२ वाजेपासून पुढच्या २४ तासात घडला.
इथे प्रश्न असा निर्माण होतो, की हे सर्व उद्योग करण्याची खरोखरी गरज होती काय? शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे  आहे, आणि त्यांचा हा निर्णय आहे, असा खुलासा केला आहे. मात्र निर्णय कोणत्याही खात्याचा असला तरी मुख्यमंत्रीम्हणून उद्धव ठाकरेंवरही जबाबदारी येतेच त्यातून त्यांना पळ काढता येणार नाही.
 
या एकूणच घटनाक्रमात काही प्रमुख प्रश्न निर्माण होतात. त्यातील पहिला प्रश्न हाच येतो की, पोलीस तक्रार करण्यासाठी जात असलेल्या किरीट सोमय्यांना पोलीस तक्रार करण्यापासून रोखण्याचे खरे कारण काय? आधी नमूद केल्यानुसार भारतासारख्या लोकशाही देशात कुणालाही कोणत्याही प्रकरणात पोलीस तक्रार करता येते, नंतर त्या तक्रारीची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे असते, या प्रकरणातही सोमय्यांनी तक्रार केली असती, आणि पोलिसांनी चौकशी करून आवातल्यास गुन्हा दाखल केला असता, किंवा मुश्रीफांना क्लीन चिट दिली असती, मात्र तक्रारच करू द्यायची नाही, आणि त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा हा प्रकार काहीसा हास्यास्पद वाटतो. तक्रार करता येऊ नये यासाठी त्यांना जिल्हाबंदी करणे यामागेही नेमके काय कारण आहे, हेदेखील लक्षात येत नाही.
 
सोमय्यांना जिल्हाबंदी केल्यामुळे प्रकरण जास्त चिघळले, त्यांना जिल्हाबंदी न करता तक्रार करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ दिले असते तर हे प्रकरण इतके गाजले नसते. या प्रकरणात काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यातील पहिलाच प्रश्न हा जिल्हाबंदी करण्याची काय जरूर होती? हा विचारलंस जातो आहे. त्यापाठोपाठ ही नोटीस देण्यासाठी मुंबईच्या अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा सोमय्यांच्या घरी का गेला? हा प्रश्नही  विचारला जातो आहे.
 
सोमय्या कोल्हापुरात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, हे आंदोलन हाताळाने आणि जरूर वाटल्यास सोमय्यांना संरक्षण देणे ही पोलिसांची जबाबदारी होती, मात्र जिल्हाबंदी करून त्यांनी आपली जबाबदारी झटकली असा आरोप करता येऊ शकतो. मुळात इतक्या छोट्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून रोखता येऊ शकते का? हा प्रश्नही चर्चिला जातो आहे. उद्या या सर्व घटनाक्रमाच्या विरोधात सोमय्या न्यायालयात गेले तर राज्य सरकार निश्चित अडचणीत येऊ शकते, हा धोका लक्षात घ्यायला हवा. 
 
शिवसेनेने या प्रकारची जबाबदारी राष्टवादी काँग्रेसकडे झटकली आहे, हे बघता उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा कटच होता, अशी शंका घेतली जात आहे. त्यातील तथ्येही नाकारता येत नाही. आधी नमूद केल्याप्रमामने मुख्यमंत्री या नात्याने प्रत्येक छोट्यामोठ्या निर्णयाची जबाबदारी उद्धव ठाकरेंवरच येते, या प्रकरणात देखील अखेर ठाकरेंनाच जबाबदार धरले जाणार आहे, इथे निर्णय राष्ट्रवादी  काँग्रेसने घेतला त्यामुळे सोमय्यांना नोटीस बजावण्यात आली, त्याचे पर्यवसान सोमय्यांना हिरो बनवण्यात झाले, आता शिवसेनेच्या माथी बदनामीच येणार आहे, हे स्पष्ट दिसते आहे.
 
या सर्व प्रकराची संगती लावल्यास हे उद्धव ठाकऱ्यांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेच रचलेले षडयंत्र आहे, हे स्पष्ट दिसते आहे. या प्रकारात  सोमय्यांना मुंबईला अडकवण्याचा प्रयत्न करायचा त्यांनी तो निर्णय नाकारला कि. त्याची मोठी बातमी होते आणि त्याचा परिणाम शिवसेनेवर होणार हे लक्षात घेऊनच हे षडयंत्र रचले आहे हे निश्चित, मात्र या षड्यंत्रात फासून उद्धव ठाकरे हकनाक बदनाम झाले आहेत. असाच प्रकार नारायण राणेंच्या बाबतीतही घडला आणि त्यातही रसाने हिरो झाले तर बदनामी शिवसेनेच्या वाट्याला आली. आजही नेमके तेच घडले आहे.
 
हे सर्व प्रकार बघता उद्धवपंत ठाकरेंनी अधिक चातुर्याने काम करणे गरजेचे झाले आहे, शिवसेनेने जरी आजवर राडा संस्कृती जपली असली, तरी सामंजस्याचे राजकारणही अनेकदा केले आहे, त्यामुळे भविष्यात असे प्रकार होऊ नयेत याची काळजी त्यांनी घयायला हवी. महाआघाडीत शिवसेनेचे सोबर करणारे दोन्ही पक्ष हे त्यांचे मूळचे  राजकीय विरोधकच आहेत. सध्या फक्त सत्ता मिळवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. सत्तेचा लाभ हे त्यांचे तत्व आहे, सहकार्याचे हित जपणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे महत्वाचे नाही. हा मुद्दा लक्षात घेऊन शिवसेनेने रणनीती ठरवणे गरजेचे आहे, तोपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या षड्यंत्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फसले असे म्हणावे लागणार आहे.
 
 तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
 
ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
अविनाश पाठक