गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुष्काळी लातूरला मोठा दिलासा, या धरणाचे मिळणार पाणी

जलाग्रही लातूर या सर्वसामान्य लातूरकरांच्या चळवळीस यश मिळत असून, लातूरला उजनीचे पाणी मंजूर करण्यात आले. लातूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी या घटनेची नोंद करण्यात येणार आहे. 
 
औरंगाबाद येथे आयोजित मराठवाडा टंचाई आढावा बैठकीत याबाबतची घोषणा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली असून, त्याबद्दल  दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद येथे मराठवाडा टंचाई आढावा बैठकीच्या निमित्ताने आलेल्या पाणीपुरवठा मंत्री यांची जलाग्रही लातूरच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि उजनीचे पाणी लातूरला मिळावे याचे निवेदन दिले सोबत पाण्याच्या गंभीर स्थितीवर  सविस्तर चर्चा केली. यावेळी लातूर चे खासदार सुधाकर शृंगारेही उपस्थित होते. यापूर्वी जलाग्रही लातूरच्या वतीने देशाचे पंतप्रधान, जलशक्तीं मंत्री, मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. 
 
जलाग्रही लातूर या अराजकीय उपक्रमांद्वारे सर्व सामान्य लातूरकरांनी लक्षवेधी लढा उभारला होता. मिस्ड कॉल अभियानांतर्गत ४३००० पेक्षा अधिक लातूरकर या उपक्रमात सहभागी होत उजानीचे पाणी मिळावे यासाठी आग्रही झालेले होते. लातूरला उजनी पाणी बंद पाईपलाईनद्वारे मांजरा धनेगाव धरणास जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी ३६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  पुढील ०६ महिन्याच्या  प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे.  उजनी येथील  पाणी लातूरला देताना सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया आणि तरतूद पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही पाणी पुरवठा मंत्री यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य लातूरकरांच्या एकत्रित प्रयत्नांना यश येवून लातूर ची अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी मान्य करवून घेतल्याबद्दल जलाग्रही लातूरच्या वतीने लातूरकरांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले असे ‘जलाग्रही’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.