शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टगणेश
Written By वेबदुनिया|

अष्टगणेश : एकदंत

एकदंतावतारो वै देहिनां ब्रम्हाधारक:।
मदासुरस्य हंता स आखुवाहनग: स्मृत:।।

एकदंतावतार हा ब्रह्माधारक असून तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक आहे. गुरू शुक्राचार्यांचे भाऊ महर्षी च्यवन यांचा मुलगा मद एकदा शुक्राचार्यांकडे आला. स्वत:ची ओळख करून देत त्याने ब्रह्मांडावर राज्य करण्याची इच्छा व्यक्त केली. शुक्राचार्यांनी त्याला आपला शिष्य बनविले आणि एकाक्षरी मंत्र त्याला दिला. मदाने त्यांना प्रणाम केला आणि तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला.

तिथे त्याने निरंकार तपश्चर्या सुरू केली. त्याची कठोर तपश्चर्या पाहून सिंहवाहिनी भगवती प्रकट झाली. तिने त्याला निरोगी आणि ब्रह्मांडावर राज्य करण्याचा वर प्रदान केला. मदासुर नंतर घरी आला. त्याने आपले नगर सुंदर आणि भव्य बनविले. दूरदूरचे पराक्रमी असुर या नगरीमध्ये येऊन राहू लागले. नंतर त्याने प्रमादसुराची कन्या सालसाशी विवाह केला. गुरू शुक्राचार्याने मदासुराला दैत्याधीशपदी नियुक्त केले.

WD
सर्व शक्तीमान मदासुराने सुरवातीला पृथ्वीवर साम्राज्य स्थापित केले. नंतर त्याने स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला पराभूत केले आणि मदासुर स्वर्गाचा शासक बनला. संपूर्ण त्रैलोक्य त्याच्या अधीन झाले. सगळीकडे अधर्म आणि अत्याचार पसरला होता. मदासूराच्या त्रासाला कंटाळलेल्या सर्व देवांनी सनत्कुमारांना आपली व्यथा सांगितली. सनत्कुमारंनी त्यांना एकदंताच्या एकाक्षरी मंत्राचा जप करण्याचा उपदेश केला.

महर्षीच्या उपदेशानुसार देवगण एकदंताला संतुष्ट करण्यासाठी त्याची उपासना करू लागले. अनेक वर्ष कठोर तप केल्यानंतर मूषक वाहन एकदंत प्रकट झाले. प्रभूच्या दर्शनाने धन्य झालेल्या देवतांनी त्यांना प्रणाम केला व आपली व्यथा त्यांच्याजवळ मांडली. एकदंताने तथास्तु असे म्हटले आणि अंतर्धान पावले.

तिकडे महर्षीने मदासुराला सांगितले, की ऋषींनी एकदंताची कठोर तपश्चर्या केली आणि त्यावर प्रसन्न होत एकदंताने त्यांना त्यांच्या इच्छापूर्तीचे वरदान दिले आहे. आता ते तुझे प्राण घेतील. हे ऐकून मदासुर अत्यंत क्रोधित झाला आणि आपले सैन्य घेऊन एकदंताशी युद्ध करण्यासाठी निघाला. वाटेतच एकदंत प्रकट झाला त्याचे विशाल, उग्र मूषक वाहन रूप पाहून असुर भयभीत झाले.

मदासुराने आपल्या दूताला त्यांच्याकडे पाठविले. आपण कोण आहात, एवढे महाकाय रूप कसे, असे अनेक प्रश्न दूताने विचारले. एकदंताने त्याला सांगितले, की मी स्वानंदवासी आहे आणि आत्ताच स्वानंदावरून तुझ्या गुरूचा वध करण्यासाठी आलो आहे. त्याला सांग मला शरण ये अन्यथा तुझा वध केला जाईल. दूताने हा संदेश मदासुराला सांगितल्यावर त्याला नारदाने सांगितलेली गोष्ट लक्षात आली.

तितक्यात त्याने एकदंताचे तेजस्वी रूप पाहिले. तरीही तो युद्धासाठी तयार झाला. मदासुर धनुष्याला तीर लावत असतानाच परशू त्याच्या छातीत घुसला. तो खाली पडला आणि मूर्च्छित झाला. काही वेळानंतर चेतना आल्यावर उठून पाहिले तर ते दिव्य अस्त्र त्याच्या हातातून सुटून एकदंताच्या कमळामध्ये दिसले. हे पाहून आश्चर्यच‍कीत झालेल्या मदासुराने एकदंत चरणी धाव घेतली आणि म्हणाला, 'हे प्रभू! आज मला तुझे दूर्लभ दर्शन झाले.

हे माझे नशीब आहे. मी आपल्या शरणी येतो मला क्षमा करून आपली दुर्लभ भक्ती प्रदान करा'. जेथे माझ्या दैवी संपदेची पूर्ण पूजा-अर्चा केली जाते तेथे तू जाऊ नको असे एकदंताने त्याला सांगितले. एकदंताचा वर प्राप्त करून मदासुर पाताळात गेला.