मारियाने भारतीयांवरील प्रेमापोटी काढला होता 'तो' टॅटू
पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणार्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने नुकतीच निवृत्ती स्वीकारली. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी मारिाने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाची अनेकांना कल्पना नव्हती. त्यामुळे या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला. तिच्या कारकिर्दीत तिने विविध विक्रमांना गवसणी घातली. त्याशिवाय ती एक ग्लॅमरस आणि सौंदर्यवती टेनिसस्टार म्हणून देखील चर्चेत राहिली. ती खेळत होती त्यावेळी तसेच आता निवृत्तीनंतर तिच्या विषीच्या खास गोष्टी जगासमोर येत आहेत. अशीच एक गोष्ट भारतीय लोकांशी निगडित असून मारिया शारापोव्हाचे भारतीयांवर आणि भारतीय भाषांवर विशेष प्रेम होते. त्यामुळेच तिने स्वतःच्या मानेवर हिंदीमध्ये 'जीत' या शब्दाचा टॅटू काढून घेतला होता. ही विशेष बाब समोर आली आहे.
शारापोव्हाचा जन्म 26 एप्रिल 1987 साली सर्बिया येथे झाला. तिने रशियात चार वर्षांची असताना टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. 3 वर्षांनंतर 1994 मध्ये तिचे कुटुंब अमेरिकेत आले. त्यामुळे अमेरिकेत तिने टेनिसचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. 2002 साली मारियाने ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनिअर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती सर्वात तरुण टेनिसपटू ठरली होती. तिने 2004 साली 17 वर्षांची असताना विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपले पहिले ग्रँडस्लॅम पटकाविले. त्या सामन्यात तिने अव्वल मानांकित सेरेना विलियम्स हिला पराभूत केले होते. 2004 ला तिने वुमेन्स टेनिस असोसिएशनच्या टॉप 10 मध्ये प्रवेश केला होता. 2006 साली वयाच्या 19 व्या वर्षी तिने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. 2008 साली तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तर 2012 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने तिने विजेतेपदाचा स्लॅम पूर्ण केला. असा पराक्रम करणारी ती 10 वी महिला टेनिसपटू होती. 2013 साली सलग 9 वर्षे सर्वाधिक कमाई करणार्या महिला खेळाडूंच्या 'फोर्ब्स'च्या यादीत शारापोव्हाला अव्वल स्थान मिळाले होते.
मारियाचे सुमारे दोन वर्ष अलेक्झांडर गिलकेस यांच्याशी अफेअर होते. 40 वर्षीय गिलकेस लंडनमधील उद्योगपती आहेत. तसेच ते 'पॅडल 8'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. 'पॅडल 8' ही ऑनलाइन बोली लावणारी वेबसाइट आहे. 2016 साली मारिया उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी दोषी आढळली. त्यामुळे तिच्यावर 2 वर्षांची बंदी घालणत आली होती. पण नंतर ही बंदी कमी करून 15 महिन्यांवर आणण्यात आली होती. डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे तिचे सुमारे 165 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. नाइक, पोर्से, सॅमसंग यासारख्या नामांकित ब्रँडनी तिला दिलेले प्रायोजकत्व काढून घेतले. त्याचा मोठा फटका तिला बसला. 2017 साली तिने बंदीची शिक्षा संपल्यावर टेनिसमध्ये पुनरागन केले. पण त्यानंतर तिला कारकिर्दीत फारशी चमक दाखवता आली नाही.