गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. T-20 वर्ल्डकप-09
Written By वेबदुनिया|

पराभव एवढा जिव्हारी का?

जितेंद्र झंवर

क्रिक्रेट वेड्या भारतात क्रिकेटप्रेमी प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाची आस लावून बसलेले असतात. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून मिळणार्‍या विजयामुळे तो अधिकच सुखावला होता. त्याला आकाशही ठेंगणे वाटत होते. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी टी-20 च्या विश्वकरंडक स्पर्धेत पहिले विजेतेपद भारताला मिळाले होते. आता दुसरे विजेतेपदही आपलेच अशी वल्गना भारतीय संघाकडून स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी करण्यात आली होती. मग क्रिकेट रसिक परिस्थितीचे भान विसरून दुसरे विजेतेपद घेवून संघ परत येईल, अशी आशा करून बसला होते. परंतु त्यांना धक्का बसला. भारतीय संघ सुपर-एटमध्येच बाद झाला.

WDWD
भारत आणि पाकिस्तान संघात बरेच साम्य आहे. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. दोन्ही संघाकडे होतकरू खेळाडू आहेत. कोणत्याही परिस्थितीतून सामने फिरविण्याची ताकद या संघांच्या फलंदाजांमध्ये आहे. परंतु दोन्ही संघात एक मुलभूत फरक आहे. आपल्याकडे क्रिकेट आणि त्यामागून खोर्‍याने येणारा पैसा याला महत्त्व दिले जात आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडूंनी क्रिकेट आणि क्रिकेटसाठीच स्वता:ला पूर्णपणे वाहून घेतले. टी-20 विजेतेपदाबाबत त्यांचे हे सूत्रच त्यांना विजेतेपदाकडे घेवून गेले. त्यांच्या देशातील आणि क्रिकेट मंडळातील विषम परिस्थिती असताना तो संघ जगज्जेता बनला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वाधिक संपन्न क्रिकेट संघटना आहे. बीसीसीआयला नफा मिळत असल्याने खेळाडूंचा विश्रांतीचा विचार न करता सामन्यांमागून सामने आयोजित केले जात असतात. हे सामने आयोजित करताना पुढे येणार्‍या महत्त्वच्या स्पर्धांकडेही दुर्लक्ष केले जाते. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन करून बीसीसीआयने खेळाडूंना अतिरिक्त ताण दिला. आयपीएलमध्ये खेळणारे जवळपास सर्वच खेळाडू टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या प्रत्येक खेळाडूला स्पर्धेपूर्वी 14 आयपीएलचे आणि दोन सराव सामने खेळावे लागले. आयपीएलमधील 14 सामने खेळताना महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यांनी आपली दुखापत लपवून ठेवत विश्वकरंडक स्पर्धेत सहभाग घेतला. याबाबत क्रिकेट मंडळाच्या फिजिओने दिलेल्या अहवालाकडेही बीसीसीआयने दुर्लक्ष केले. शेवटी 'लिंबूटिंबू' संघाविरुद्ध पात्रता फेरीत विजय मिळविल्यानंतर सुपर-एटमध्ये गारद व्हावे लागले.

NDND
भारताचा पराभवाचे महत्त्वाचे कारण खेळाडूंना झालेली दुखापत आणि अतिक्रिक्रेट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खेळात विजय आणि पराभव सुरूच असतात, परंतु पराभव लाजिरवाणा तरी नको व्हावा, हीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा होती. परंतु सुपर-एटमध्ये तिन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारून गतविजेत्या भारताने सफशेल लोटांगणच घातले. यामुळे क्रिकेट रसिक नाराज झाले.

पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणे भारतीय खेळाडू क्रिकेटला आपले सर्वस्व अर्पण करीत नाही. त्यांना क्रिकेटपेक्षा जाहिरातींच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही महत्त्वाचे असते. यासाठी मग 'पद्मश्री' सारख्या राष्ट्रीय पुरस्काराकडेही पाठ फिरवली जाते. (महेंद्रसिंह धोनी आणि हरभजनसिंग 'पद्मश्री' पुरस्कार स्वीकारण्यास गेले नव्हते.) मग या खेळाडूंकडून विश्वविजेतेपदाची अपेक्षा कशी करणार? विश्वविजेतेपद मिळाले, परंतु ते कायम ठेवण्यासाठी लागणारी चिकाटी, मेहनत, आणि खेळाप्रती सर्वस्व अर्पण करण्याची लागणारी भावना आमच्या खेळाडूंमध्ये नव्हती. यामुळेच भारताला पराभवास सामोरे जावे लागले. आता भविष्यात तरी या चुका टाळण्यासाठी बीसीसीआयने प्रयत्न करावे, हिच क्रिकेट रसिकांची अपेक्षा असणार आहे.