उत्तर प्रदेशच्या जनतेने शिवसेनेला नाकारले, काही ठिकाणी नोटापेक्षा कमी मते
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये शिवसेनेने भाजपला चांगलेच आव्हान दिले होते. परंतु शिवसेनेचा सुपडा साफ होताना दिसत आहे. काही ठिकाणी तर शिवसेनेला नोटापेक्षा कमी मत मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या जनतेनं महाराष्ट्रातील शिवसेनेला नाकारलं आहे. काही उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. यापूर्वीसुद्धा शिवेसेनेने २०१७ मध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळीसुद्धा यश मिळाले नव्हते.
उत्तर प्रदेश निवडणूकीमध्ये शिवसेनेने ४०३ जागांपैकी ५२ जागांवर आपला उमेदवार दिला होता. युवासेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातील वजनदार नेते उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी गेले होते.
शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांचा उत्तर प्रदेशमधला रोड शो फ्लॉप गेला आहे. शिवसेना स्वतंत्र लढत होती. काही उमेदवारांचे आता डिपॉझिट जप्त होण्याची परिस्थिती आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशमध्ये अनेक दिवस तळ ठोकून होते.
पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये खतौली, मेरठ कैंट, धौलाना, नोएडा, दादरी, सिकंदराबाद, अनूपशहर, डिबाई, मांट, मथुरा, खैरागढ आणि दक्षिण आगरा येथे उमेदवार दिले होते परंतु एकाही उमेदवाराचा करिष्मा चालला नाही. उत्तर प्रदेशमध्ये नोटाला ०.७१ टक्के मतदान आहे तर शिवसेनेला ०.०२ टक्के मतदान झाले आहे.