शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

आजचा 'पॉवर योगा', कालचा 'हठयोग'

हठयोग म्हणजे 'हट्टाने केलेला योग' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाधीवस्था प्राप्त करण्यासाठी हठयोग हा शेवटचा पर्याय मानला जातो. समाधीवस्थेसाठी शरीराला एवढा त्रास द्यावा की तो त्रासही एक अवस्था बनावी आणि व्यक्तिमत्वाचा भाग व्हावा. हठयोग म्हणजे समाधीवस्थेच्या मागे लागणे. सतत आणि निरंतर त्या अवस्थेचा पिच्छा पुरवणे.

सात हठ-

षट्कर्मासनमुद्रा: प्रत्याहारश्च प्राणसंयाम:। ध्यानसमाधी सप्तैवांगनि स्युर्हठस्य योगस्य।।- षट्कर्म, आसन, मुद्रा, प्राणायम, प्रत्याहार, ध्यान व समाधी ही हठयोगाची सात अंगे आहेत.

हठयोगाचा जोर आसन, बंध, मुद्रा व प्राणायामावर अधिक असतो. शरीराच्या मध्यभागी असलेल्या मुलाधारचक्राखाली सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलनी शक्तीला जागृत करून उर्वरित पाच चक्रांतून तिला सहस्त्रारचक्रापर्यंत नेण्याचा प्रवास या हठयोगाच्या माध्यमातून घडतो.

धौती, वस्ती, नेती, नौली व कपालभाती हे षटकर्म आहेत. हठयोग प्रदीपिकामध्ये दहा बंध मुद्रांचा उल्लेख असून त्याच्या अभ्यासवर भर देण्यात आला आहे. महामुद्रा, महा बंध, महावेधश्च, खेचरी, उड्डीयान बंध, मूल बंध, जालंधर बंध, विपरीत करणी, वज्रोली, शक्ती चालन या दहा मुद्रा दिव्य अनुभूती देणार्‍या आहेत. बंध चार व मुद्रा सहा असतात.

हठयोगाची सुरवात-
भगवान शंकराला हठयोगाचा प्रणेता मानले जाते. ऋग्वेदात वृषभनाथांचा उल्लेख आहे. ते दिगंबर हठयोगी होते. प्राचीन काळात मार्केंडेय ऋषी या योगाचे साधक होते.

मच्छिंद्रनाथांप्रमाणेच गोरखनाथ, चर्पटी, जालंधर, कनेडी, चतुरंगी, विचारनाथ, आदी नाथ संप्रदायी साधूंनी हठयोगाचा अंगीकार केला. त्याचा प्रचार व प्रसार केला. हठयोग्यांकडे हातात चिमटा व समोर धुनी असते. ते एकांतप्रिय व फिरस्ते असतात. शिवाची भक्ती ते करतात.

हठयोगाचे ग्रंथ-
गोरक्षशतक, गोरक्षसंहिता, सिद्धि-सिद्धांत पद्यति, सिद्धि-सिद्धांतसंग्रह, गोरक्षसिद्धांतसंग्रह, अमनस्क, योग-बीज, हठयोगप्रदीपिका, हठतत्वकौमुदी, घेरंडसंहिता, निरंजनपुराण हे हठयोगाचे ग्रंथ आहेत.

आधुनिक युगात हठयोग-
हठयोगाच्या अभ्यासातून अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते. या योगाच्या अंगीकारामुळे मानसिक व शारीरिक शक्ती वाढते. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणला जातो. स्वतःला बदलण्याची प्रक्रिया म्हणजे हठयोग आहे. आजच्या काळात त्याला 'पॉवर योगा' म्हणूनही ओळखले जाते.