गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 1 जानेवारी 2024 (13:11 IST)

नव्या वर्षात व्यायामाचा संकल्प कसा तडीस न्यायचा?

workout
नवीन वर्ष जवळ आलं किंवा नवीन वर्षाचा पहिला आठवडा सुरू असताना विचार येतो तो संकल्पाचा. नव्या वर्षी काय संकल्प करायचा. बहुतेकवेळा हा संकल्प आरोग्याशी संबंधित असतो.
 
आपली शारीरिक स्थिती काही फारशी नीट नाहीये, ती आता चांगला आहार आणि व्यायामाने दुरुस्त करायची हा विचार तसा वर्षभर मनात घोळत असतोच. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या विचाराला जोरदार गती येते.
 
त्यातही इन्स्टाग्रामवर फिटनेस इन्फ्लुएन्सर्सचे व्हीडिओ फोटो पाहून प्रेरणा मिळालेली असतेच. त्यामुळे हा विचार करणारे अनेक जण जीमचं माप या आठवड्यात ओलांडतात. पण सुरुवातीच्या दिवसातला उत्साह मात्र पुढे हळूहळू कमी होत जातो.
 
काही लोक पैसे भरलेत म्हणून जीमला थोडे अधिक दिवस जातात. पण नंतर त्यावरही मात केली जाते आणि पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात. हे संकल्पचक्र वर्षानुवर्षं असंच सुरू राहातं.
 
त्यामुळे यावर्षीही व्यायामाचा संकल्प कसा पूर्ण करायचा असे तुम्हाला वाटत असेल तुमच्यासाठी आम्ही एका पर्सनल ट्रेनरची गोष्ट सांगणार आहोत. या आहेत अॅलिस लिविएंग या पर्सनल ट्रेनर आणि इन्फ्लुएन्सर आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्या तिथं व्यायाम आणि योग्य जीवनशैलीसाठी पूरक अशा पाककृती देत असतात.
 
आपला फिटनेसच्या विश्वातला प्रवास त्यांनी उलगडून सांगितला आहे, विशेष म्हणजे हा प्रवास म्हणजे ‘परफेक्ट बॉडी’ प्राप्त करण्याचा प्रवास नाही.
 
त्या सांगतात, मी आधी नृत्याचे धडे घेतले होते. तेव्हा पहिल्या दिवशी वाटलेलं, अरे देवा मी इतरांपेक्षा एकदमच वेगळी आहे. तिथं सगळे उंच, शिडशिडीत होते आणि मी मात्र 5 फूट एक इंच उंचीची होते. त्यामुळे तेव्हाचं ते पहिलं वर्षं आत्मविश्वास अगदी तळाला गेलेला होता.
 
डान्सचे कपडे घालून मी आरशात पाहायचे तेव्हा वाटायचं या लोकांपेक्षा मी किती वेगळी आहे, मग मी तुलना करत राहायचे.
 
त्या सांगतात, त्याचं खाण्याशी एक वाईट नातंच तयार झालेलं होतं. चॉकलेट आणि फेसाळती पेयं एकापाठोपाठ रिचवत जायची अशी सवयच त्यांना लागली.
 
एकदा कॉलेजमधल्या चाचणीच्यावेळी ही बिघडलेली स्थिती त्यांच्या शिक्षिकेनं दाखवून दिली. तू आता तब्येत सुधारली पाहिजेस असं त्यांनी अॅलिस यांना सांगितलं.
 
आणि इथंच अॅलिस यांचा वेट ट्रेनिंगच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
 
वेट ट्रेनिंग सुरू झाल्यावर मला काहीतरी चांगलं हाताशी लागलं असं वाटायला लागलं. मी त्याचा आनंद घेऊ लागले.
 
22 व्या वर्षीच अॅलिस पर्सनल ट्रेनर झाल्या. परंतु यामुळे त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या प्रतिमेबद्दल त्यांच्या मनातल्या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या.
 
त्या त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्या लोकांना तुम्ही कुणासारखं तरी दिसायचं आहे म्हणून व्यायाम करू नका असं सांगतात. आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारावी आणि योग्य कारणासाठीच व्यायाम केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
 
त्या सांगतात मी सिक्स पॅक अॅब्ज मिळवले पण तेव्हा मला आजिबात आनंदी वाटत नव्हतं. लोकांना वाटतं की वजनाच्या बाबतीतलं इप्सित ध्येय साध्य केलं की आपल्याला काही धनाचा हंडाच सापडणार आहे, मात्र तसं नसतं.
 
त्यामुळे आधीच आपण व्यायाम का करत आहोत हे निश्चित केलेलं असलं पाहिजे. व्यायामामुळे मला प्रेरणा मिळणार आहे का, माझे मानसिक आरोग्य सुधारणार आहे का, आरोग्याची दीर्घकालीन ध्येयं साध्य होणार आहेत का याचा विचार केला पाहिजे.
 
सध्याच्या काळात सगळीकडे तुलना करायचा प्रघात आहे. मी जेव्हा लोकांशी बोलते तेव्हा लोकांना आपल्याकडे काहीतरी कमतरता आहे अशी खंत वाटत असते, हे जाणवतं.
 
माझ्याकडे लोक येतात आणि म्हणतात की अमूक माणसासारखं त्यांना व्हायचं, तसं दिसायचं आहे. पण हे शक्य नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही जे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात ते वास्तवाच्या दृष्टीने शक्य आहे का याचा विचार केला पाहिजे.
 
इन्स्टाग्रामवर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसारखं दिसायचंय किंवा परफेक्ट बॉडीच मिळवायची आहे असं डोक्यात ठेवून तुम्ही व्यायाम सुरू केला तर त्यासाठी लागणारी प्रेरणा फारकाळ टिकणार नाही.
 
जीम आणि एकूणच व्यायामाबद्दल लोकांच्या मनात अढी असू शकते. जीमला जाण्यासाठी आत्मविश्वास कमी वाटत असेल तर मी त्यांना घरातून व्यायाम करायला सुचवते. जिथं तुम्हाला सर्वाधीक सुरक्षित वाटतंय तिथं व्यायाम सुरू करा असं मी सांगते.
 
जर जीममध्ये जायला तुम्ही अडखळत असाल मनात थोडी भीती असेल तर मी त्यांना व्यायामाच्या किंवा योगाच्या वर्गात जायला सांगते. तिथं तुम्हाला कळेल अशा भाषेत शिकवलं जातं, तसेच पुढं जीमला जायचं असेल तर त्याची एकप्रकारची पूर्वतयारी होते.
अचानक जीममध्ये जायचं आणि मी इथं काय करतोय असा प्रश्न येणं अत्यंत वाईट आहे. त्यामुळे तुमची शारीरिक-मानसिक तयारी आधीच झालेली असली पाहिजे.
 
व्यायामाची प्रगती कशी करायची, आज कोणता व्यायाम करायचा यासाठी तुम्ही युट्यूब- इन्स्टाग्रामचा वापर केला पाहिजे त्यामुळे जीममध्ये आत जातानाच तुमच्या डोक्यात सर्व योजना तयार असेल.
 
आता कमी फीमध्येही जीम उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही कमी पैशातही जीमला जाण्याचा संकल्प तडीस नेऊ शकता.
 
 
Published By- Priya Dixit