शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (15:31 IST)

कोरोना : 'जगाच्या दुसऱ्या टोकाला बसून स्क्रीनवर अंत्यसंस्कार बघणं खूप विचित्र असतं', परदेशातील भारतीयांचं दुःख

रितू प्रसाद आणि सॅम कॅबराल
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू होतोय. वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत आणि त्यामुळे एकप्रकारशी दहशत निर्माण झाली आहे. या परिस्थितीत परदेशात राहणाऱ्या भारतीयांना एका वेगळ्या आणि विचित्र मानसिकतेचा अनुभव येतोय.
 
अशा संकटकाळात तुमचे सगेसोयरे तुमच्यापासून हजारो मैल दूर दुसऱ्या देशात असताना त्यांना मदत करणं खरंतर खूप अवघड असतं.
 
भारतातील जवळपास सर्वच कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची गर्दी आहे. अनेक ठिकाणी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत.
अशा परिस्थितीत हजारो किमी दूर दुसऱ्या देशात बसलेले लाखो लोक स्वतःचं घर, गाव यांची झालेली अवस्था बघून आपण काहीच करू शकत नाही, अशी लाचार अवस्था अनुभवत आहेत. बीबीसीने अशाच काही कुटुंबांशी बातचीत केली आणि त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
'सगळं एखाद्या हॉरर चित्रपटातल्या प्रसंगासारखं होतं'
श्री रंगनाथन अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील अटलांटा शहरात राहतात. त्यांचं घर तिथून 13 हजार मैलांवर असणाऱ्या भारतातल्या अहमदाबादमध्ये आहे. त्यांचे आप्तेष्ट इथे राहतात. या साथीने शहरावर अभूतपूर्व संकट ओढावल्याचं ते सांगतात.
 
त्यांच्या काकूने याचवर्षी वयाची साठी पूर्ण केली होती. गरोदर असलेल्या सूनेच्या मदतीसाठी काका-काकू दोघंही अहमदाबादला गेले.
 
या सर्वांनी कोरोना लसीचा एक-एक डोस घेतला होता. मात्र, तरीही आज सगळं कुटुंब कोरोनाबाधित आहे, असं रंगनाथन सांगतात.
 
हॉस्पिटलमध्ये गर्दी आहे आणि डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण असल्याची या कुटुंबाला पुरेपूर कल्पना होती आणि त्यामुळे शक्यतो हॉस्पिटलला जाऊच नये, यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, शेवटी काका, काकू आणि सून तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि तिघांनाही तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाले.
 
रंगनाथन सांगतात, "यानंतर जे घडलं ते एखाद्या हॉरर चित्रपटातल्या प्रसंगासारखं होतं."
एप्रिल महिन्याच्या शेवटी त्यांच्या काकूंचा मृत्यू झाला. गेल्या मंगळवारी त्यांची वहिनी म्हणजे काकांच्या सूनेचाही मृत्यू झाला. त्यावेळी वहिनी सात महिन्यांची गरोदर होती.
 
डॉक्टरांना आई आणि बाळ दोघांनाही वाचवायचं होतं. मात्र, अशा अवस्थेत कोणतं औषध द्यायचं यावरून बरीच गुंतागुंत झाली, असं रंगनाथन सांगतात.
 
ते म्हणाले, "वहिनीची प्रकृती बिघडायला लागली तेव्हा डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, कदाचित तोवर खूप उशीर झाला होता आणि करण्यासारखं काही उरलंच नव्हतं."
 
"आम्ही अमेरिकेत राहतो. मात्र, भारतातल्या ओळखीच्या मदतीने त्यांना आयसीयुमध्ये भरती करण्याचा, त्यांच्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांची व्यवस्था करण्याचा खूप प्रयत्न केला. थोडेफार प्रयत्न फळले."
 
औषध घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचंही ते सांगतात. शेवटी मस्कतमध्ये औषध मिळालं. पण, औषध भारतात पोहोचेपर्यंत वहिनींचा मृत्यू झाला.
 
आमच्या संपूर्ण कुटुंबासाठीच कोरोना एका दुस्वप्नासारखं आहे, अशी हताश भावना ते व्यक्त करतात.
 
जगभरात परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या इतर कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या तुलनेत खूप जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अंदाजानुसार 2019 साली अमेरिकेत 46 लाख भारतीय होते. या आकडेवारीनुसार अमेरिकेत दुसरा सर्वात मोठा प्रवासी समुदाय भारतीय आहे.
 
अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडामध्ये जवळपास 7 लाख भारतीय आहेत आणि ही संख्याही वाढत आहे.
'ही इमरजन्सी आहे आणि मी अशावेळी मी माझ्या कुटुंबासोबत असायला हवं'
29 वर्षांच्या पूजा (नाव बदलेलं आहे) अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये नोकरी करतात. नशीब चांगलं होतं म्हणून हवाई प्रवासावर बंदी येण्याआधीच हैदराबादला आपल्या घरी परत जाऊ शकले, असं त्या म्हणतात.
 
एप्रिलमध्ये पूजा यांचे आई-वडील आणि बहीण तिघांनाही कोरोनाची लागण झाली.
 
पूजा सांगतात, "मला कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती. कोरोनामुळे उद्भवणाऱ्या भयंकर परिस्थितीच्या अनेक बातम्या मी वाचल्या होत्या. त्यामुळे प्रवासावर बंदी आली तर दीर्घकाळ अमेरिकेतच अडकून बसावं लागेल किंवा माझ्या संपूर्ण कुटुंबालाच धोका उद्भवू शकतो, याची मला कल्पना होती."
 
त्या सांगतात, "मी लगेच कोरोना चाचणी केली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. नोकरी, व्हिझा याचा विचार करायला माझ्याकडे वेळच नव्हता. मी लगेच फ्लाईट तिकीट बुक केलं. माझ्या मनात केवळ एकच विचार घोळत होता - ही इमरजन्सी आहे आणि यावेळी मी माझ्या कुटुंबासोबत असायला हवं."
पूजा दोन आठवडे आपल्या कुटुंबीयांची काळजी घेत होत्या. शेवटी सगळे कोरोनातून बरे झाले आणि त्यानंतरच पूजा परत अमेरिकेला गेल्या. त्या अमेरिकेला पोहोचल्या आणि त्यानंतर लगेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतातून हवाई प्रवासावर बंदी घातली.
 
प्रवासबंदीमुळे न्यू जर्सीमध्ये राहणारे भारतीय चिंतेत असल्याचं त्या सांगतात. त्या म्हणतात, "भारतात जायचं असेल तरीही ते जाऊ शकत नाहीत. तुमच्या कुटुंबातल्या कुणाला काही झालं तर तुमची काय अवस्था होईल? पण, आता आमच्याकडे कुठलाच पर्याय नाही."
 
आपल्या मित्रांना हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, औषधं, अॅम्ब्युलंस यासाठी सोशल मीडियावर आवाहन करताना बघून त्रास होत असल्याचं पूजा सांगतात. त्या म्हणाल्या, "हा एक वेगळ्या प्रकारचा मानसिक ताण आहे आणि हे सगळं बघणं खूप कठीण आहे."
 
सोशल मीडियावर भारतातून अमेरिकेत गेलेल्यांचे ग्रुप आहेत. या नेटवर्कच्या माध्यमातून ते कोव्हिड-19 चा सामना करणाऱ्या कुटुंबांच्या मदतीसाठी आयसीयू बेड, औषधं आणि वाण सामानाची व्यवस्था करतात. तसंच या नेटवर्कच्या माध्यमातून या जागतिक साथीविषयी अपडेट माहितीही दिली जाते. इतकंच नाही तर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आर्थिक मदतही गोळा करत आहे.
 
भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 23 एप्रिल रोजी फेसबुकवर सुरू करण्यात आलेल्या एका फंड रेझरने आतापर्यंत 75 लाख डॉलर्स जमा केले आहेत.
 
परदेशातून मदत स्वीकारणारे फंड रेझर ग्रुप आणि स्वयंसेवी संस्थांसाठी गुगल स्प्रेडशीटवर प्रचंड ट्रॅफिक आहे. त्यामुळे स्प्रेडशीट उघडायलाही मिनिटभरापेक्षा जास्त वेळ लागतोय.
 
'तुम्हाला कायमच इतरांसाठी अधिक करण्याची इच्छा असते'
28 वर्षांच्या रुचिका तलवार भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका ग्रुपशी संलग्न आहेत. त्या मूळ दिल्लीच्या आहेत आणि सध्या अमेरिकेतील पेन्सिलव्हेनिया इथे राहतात.
 
रुचिका सांगतात, "आम्हाला सतत फोन कॉल येतात. कुणी घरी आहे, त्याला ऑक्सिजन हवंय. कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीय. कुणाचा मृत्यू झालाय."
 
भारतात कोव्हिडची परिस्थिती बिघडू लागली त्यावेळी रुचिका आणि त्यांच्या आईने दिल्लीतील गरजूंना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी त्यांच्या आईच्या मेडिकलच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क केला.
 
रुचिकाने त्यांचे आप्तेष्ट आणि मित्रांना मदतीचं आवाहन करणारा मेल पाठवला आणि तिथून या कामाची सुरुवात झाली. कुणीतरी त्यांचा हा मेसेज इन्स्टाग्रामवर टाकाला आणि बघता-बघता त्यांच्याकडे 10 हजार डॉलर्स मदतनिधी जमा झाला.
यानंतर त्यांनी GoFundMe वर एक अभियान सुरू केलं आणि हळू-हळू क्राऊड सोर्सिंगच्या माध्यमातून जवळपास 90 हजार डॉलर्सचा मदतनिधी गोळा केला. रविवारी त्यांनी भारतातील पाच शहरांसाठी 200 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर पाठवले.
 
2020 साली अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली होती त्यावेळी रुचिका यांनी तिथेही अनेकांवर उपचार केले होते.
 
त्या सांगतात, "अमेरिकेत बरीच आशा आहे आणि रुग्ण बरे होत आहेत. मात्र, मी माझ्या शहराचा विचार करते तेव्हा लोकांना कोण-कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतंय, हे बघून दुःख होतं."
 
रुचिका यांचं लग्न ठरलं आहे आणि या कोरोना काळात मुलाकडच्या कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्वतः रुचिकाचे नातेवाईक जे भारतात आहेत त्यापैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण, हॉस्पिटलमध्ये बेड नसल्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत.
 
त्या म्हणतात, "अमेरिकेकडे अतिरिक्त लस आहे. पण भारताकडे लसीचा तुटवडा आहे. हे बघणं दुःखद आहे. मला आणखी काही करता आलं असतं तर.. असं वाटत राहतं."
'मी माझे वडील गमावले'
कॅनडात राहणाऱ्या भारतीयांचीही अशीच अवस्था आहे.
 
अश्विनी अगरवाल मीडिया सेल्स अँड लोनमध्ये आहेत. मात्र, सध्या ते भारतातील गरजूंची मदत करण्यात व्यग्र आहेत.
 
त्यांनी कॅनडात राहणाऱ्या 125 भारतीयांना सोबत घेऊन 'My Indians in Canada Association' ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते भारतातील गरजूंची मदत करतात. सध्या ते दिल्ली आणि चंदिगडमघ्ये 100 ऑक्सिजन सिलेंडर, औषधं आणि किराणा सामान घेण्यासाठी निधी उभारत आहेत.
 
ते म्हणतात, "मला टोरंटोवरून एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने सांगितलं त्याचे आई-वडील चंदीगढला आहेत आणि दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते ऑक्सिजनची व्यवस्था करू शकत नाहीत."
"आम्ही त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सोय केली आणि त्यांना फोन केला. मात्र, तोवर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. हे खूप क्लेशकारक होतं."
 
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी परिस्थिती हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. तिथे टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. शिवाय, लसीकरणही वेगाने सुरू आहे.
 
मात्र, भारतातलं चित्र उलट आहे. इथे सोशल मीडियावर मदतीचं आवाहन असतं किंवा निधनाची वार्ता.
 
'हजारो मैलांचं अंतर असूनही मदतीचा हात'
नम्रता नारंग आयुष्यात पहिल्यांदा झूम मीटिंगच्या माध्यमातून एका अंत्यसंस्कारात सहभागी झाल्या. त्या म्हणतात, तो सगळा प्रसंग आठवून अंगावर काटा उभा राहतो.
 
बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "जगाच्या दुसऱ्या टोकाला बसून आपल्या स्क्रीनवर अंत्यसंस्कार बघणं, आपल्या प्रियजनांना रडताना बघणं, कुणी त्यांचं सांत्वन करताना बघणं खूप विचित्र असतं. ते सगळं बघून जीव कासावीस होतो."
 
26 वर्षांच्या नम्रता गेल्या 6 वर्षांपासून अमेरिकेत आहेत आणि गेल्या दोन वर्षांपासून लॉस अँजलीसमध्ये काम करतात.
 
त्यांच्या कुटुंबातल्या दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्यासाठी त्या भारतात येऊ शकल्या नाही.
 
गेल्या शुक्रवारी त्या ऑक्सिजन सिलेंडर भारतात पाठवण्यात मदत करणाऱ्या संस्थांविषयी इंटरनेटवर सर्च करत होत्या त्यावेळी त्यांना इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीच्या सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्सने सुरू केलेल्या मोहिमेविषयी माहिती मिळाली.
त्यांनी या संस्थेला 50 डॉलर दान केले. यानंतर त्यांच्या एका मैत्रिणीनेही 50 डॉलरची देणगी दिली. नारंग म्हणतात, "एकाने जेवढी देणगी दिली तेवढीच दुसऱ्याने द्यावी. याच धर्तीवर आम्ही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून अधिक मदतनिधी उभारण्याचा विचार केला."
 
रविवारी सकाळी नम्रता यांनी 100 डॉलर दान करत 12 हजार डॉलर्स जमवले. बुधवारपर्यंत ही रक्कम 25 हजार डॉलर्सपर्यंत पोहोचली. एका अज्ञात देणगीदाराने एवढीच रक्कम दान करणार असल्याचं सांगितलं.
 
नम्रता सांगतात, "मी लाचार असल्याचं मला वाटतं. मला भीती वाटते. माझी सगळी ताकद झोकून मदतीसाठी निधी गोळा करणे आणि लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. हे काम करताना मला बरं वाटतं."
 
अमेरिकेतल्या अनेकांना अजून भारतातील परिस्थितीचं गांभीर्य कळालेलं नसलं तरी अनेक मित्रांनी लगेच मदतीसाठी हात पुढे केल्याचं त्या सांगतात.
 
हजारो मैल अंतरावर असूनही अनेक जण एकत्र येऊन मदतीचा हात देत आहेत आणि आमचे प्रयत्नही फलद्रुप होत असल्याचं नम्रताचं म्हणणं आहे.
 
त्या म्हणतात, "अशा कठीण प्रसंगी तुम्हाला एकटेपणा जाणवतो, बांधल्यासारखं वाटतं. मात्र, हीच वेळ तुम्हाला एकत्र येऊन काम करण्याची संधीही देते."