1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (10:14 IST)

जो बायडन - नरेंद्र मोदी भेटीत नागपूरच्या बायडन कुटुंबियांबाबत चर्चा

- प्रवीण मुधोळकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच भेटीत भारतातील त्यांच्या नातेवाईकांसंदर्भात किस्सा सांगितला. यामुळे नागपूरचं बायडन कुटुंब प्रकाशझोतात आलं आहे.
 
बायडन यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की जेव्हा मी 1972 मध्ये पहिल्यांदा सिनेटर म्हणून निवडून आलो, तेव्हा मला भारतातल्या एका व्यक्तीने पत्र लिहिलं होत. या पत्र लिहणाऱ्या व्यक्तीचं आडनावही बायडन होतं आणि बायडन नावाची व्यक्ती सिनेटर झाल्याने अभिनंदन करणारं ते पत्र होतं.
 
पण भारतात तुमचे कुणी नातेवाईक आहेत का? यावर बायडन म्हणाले मला या बद्दल कल्पना नाही. पण जेव्हा वयाच्या 29 व्या वर्षी 1972 मध्ये पहिल्यांदा मी निवडून आलो, तेव्हा मला बायडन आडनाव असलेल्या व्यक्तीकडून मुंबईतून एक पत्र मिळालं, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
 
2013 मध्येही अमेरिकेचा उपराष्ट्रपती असतांना मुंबईत काही नातेवाईक राहत असल्याचं मी सांगितले होतं, असे जो बायडन यांनी सांगितलं. 2017 मध्येही बायडन यांनी मुंबई आणि नागपूरमध्ये पाच बायडन कुटुंब राहत असल्याचं सांगत हे आपले दुरचे नातेवाईक असल्याचही जाहिरपणे सांगितले होतं.
 
जो बायडन यांनी उल्लेख केलेल्या 'बायडन्स' पैकी एक कुटुंब 1873 पासून नागपुरात वास्तव्यास आहे. या बायडन कुटुंबियांनी जो बायडन यांच्याशी असलेला संबंध बीबीसी मराठीला समजावून सांगितला आहे.
 
बायडन हे ब्रिटिश शासन काळात ईस्ट इंडिया कंपनी सोबत भारतात आले आणि त्यातील एक कुटुंब भारतात स्थायिक झालं. नागपूरचे बायडन यांचे पूर्वज असलेले लेस्ली बायडन यांची सून अँजेलिना बायडन त्यांचा मुलगा ईयान बायडन आणि मुलगी सोनिया बायडन - फ्रान्सिस नागपुरात राहतात.
 
पत्रव्यवहार कधी आणि कसा झाला?
जो बायडन 1972 मध्ये अमेरिकन सिनेटमध्ये पहिल्यादाच निवडून गेले होते. पुढील दहा वर्षं जो बायडन यांची लोकप्रियता सर्वदूर पसरायला लागली होती.
 
नागपूरच्या मोहन नगरातील भारत लॉज आणि हॉस्टेलचे मालक लेस्ली बायडन यांना बायडन आडनावाचा माणूस अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून गेल्याने आनंद झाला.
 
जो बायडन आणि आपला काही संबंध जुना संबंध असावा असं लेस्ली यांना वाटू लागलं. लेस्ली यांनी एप्रिल 1981 ला जो बायडन यांना पत्र लिहले आणि त्याचं उत्तरही जो बायडन यांनी पाठविलं होतं.
 
याबाबत ईयान बायडन सांगतात,
"माझे आजोबा लेस्ली बायडेन यांना Illustrated Weekly of India या नियतकालिकात जो बायडन यांच्याबद्दल पहिल्यांदा कळलं. वयाच्या 29 व्या वर्षी जो बायडन अमेरिकेच्या सिनेटमध्ये दाखल झाल्याचं कळल्याने लेस्ली आनंदात होते. लेस्ली यांनी बायडन यांना राजकारणातील यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहिलं.
 
"याच पत्रात लेस्ली यांनी जो बायडन यांना 'बायडन' कुटुंबाच्या वंशावळीची माहिती विचारली. लेस्ली यांनी जॉन बायडन नावाच्या आपल्या खापर पणजोबांबद्दल माहिती जो बायडन यांना दिली. जॉन बायडन हे भारतात ब्रिटिश शासनाच्या काळात 1848 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचाच भाग असणाऱ्या 'ब्रिटिश इंडिया टी कंपनीत' ब्रिटिश कॅप्टन असल्याची माहितीही लेस्ली यांनी जो बायडन यांना दिली.
 
"त्यावर जो बायडन यांनीही जॉन बायडन नावाचे आपलेही खापर पणजोबा होते आणि तेही ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते अशी माहिती दिली. जो बायडन यांनी आपण कायम संपर्कात राहू असं लेस्ली बायडन यांना पाठवलेल्या पत्रात सांगितलं होतं. पण 1981 मध्ये झालेला हा पत्रव्यवहार 1983 मध्ये लेस्ली यांच्या मृत्यूनंतर खंडित झाला."
 
पण पत्र लिहिणारे लेस्ली बायडेन नागपूरचे असतांना त्यांचा उल्लेख जो बायडेन यांनी मुंबईचे असा का केला?
 
1981 ला लेस्ली यांनी जो बायडन यांना जे पत्र लिहले ते नागपूरच्या पोस्ट आफिसमधून पोस्ट केलं. पण परदेशी म्हणजेच अमेरिकेत हे पत्र पाठवायचं असल्यानं मुंबईच्या जीपीओतून ते गेले आणि त्या पत्राच्या लिफाफ्यावर जीपीओ बॉम्बे असा शिक्का लागला. जो बायडन यांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यावरच्या लिफाफ्यावर बॉम्बे जीपीओ असा शिक्का असल्याने हे पत्र मुंबईतून आलं असल्याचा त्यांचा समज झाला.
 
त्यामुळे भारतातील हे बायडन कुटुंब मुंबईत असल्याचं बायडन यांच्या स्मरणात राहिलं. अमेरिकेचे 47वे उपराष्ट्रपती म्हणून जो बायडन 2013 मध्ये पहिल्यांदा भारतात आले होते, तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यक्रमातील भाषणात लेस्ली बायडन यांच्या पत्राचा उल्लेख त्यांनी केला होता. लेस्ली बायडन यांची नात सोनिया बायडन-फ्रान्सिस यांनी या पत्राची प्रत प्रकाशित न करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला दाखवली.
 
'जो बायडन आणि आमचे थेट नातेसंबध असल्याचा आमचा दावा नाही'
"जरी लेस्ली बायडन आणि जो बायडन यांच्या पत्रव्यवहारातून हे सिद्ध होत असले की दोघांचेही खापर, खापर पणजोबा जॉन बायडन होते तरी आम्ही नागपूरचे बायडन असा दावा करू इच्छित नाही की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आमचे थेट नातेवाईक आहेत," असं ईयान बायडन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलंय.
 
ते म्हणतात, "आम्हाला आमची पूर्ण वंशावळ माहीत आहे आणि त्याची फॅमिली ट्री सुद्दा आम्ही जपून ठेवली आहे. आमच्या बायडन खानदानातील सदस्य भारत, इग्लंड, न्युझीलंड, ॲास्ट्रेलिया आणि अमेरिकेत वास्त्यव्यास आहेत.
 
पण आम्ही सारे बायडन हे जो बायडन यांच्या कुटुंबाशी संलग्न आहोत का? तर हा दावा करणं कठिण आहे," असं ईयान बायडन यांनी सांगितल.
 
नागपूरचे 'बायडन' शपथविधीसाठी अमेरिकेत का गेले नाही?
सोनिया बायडन-फ्रान्सिस सांगतात,
 
"मुळात आम्ही अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे नातेवाईक असल्याचा कधीच दावा केलेला नाही. स्वत: जो बायडन यांनी आमचे आजोबा लेस्ली बायडेन यांच्या सोबतच्या पत्रव्यवहाराच्या आठवणी सार्वजनिक केल्या. जो बायडन हे राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त झाल्याने आमच्याकडेही माध्यमांचा फोकस आला. पण आम्ही आधी कुटुंबात चर्चा करायचं ठरलं आहे. आपल्या पूर्वजांची आणखी माहिती जमा करू नंतर सर्व गोष्टी जगजाहिर करू."
 
"आता प्रश्न आला तो जो बायडन यांच्या राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीला जायच्या संदर्भात त्यावर आमच्या जो बायडन यांना कायम शुभेच्छाच आहेत," असं सोनिया यांनी म्हटलं.
 
जगभरातील बायडन कुटुंबीय एकत्र केव्हा आले होते?
2018 मध्ये लेस्ली यांचे नातू ईयान यांचे चुलत भाऊ डेव्हिड यांच्या लग्नासाठी जगभरातील बायडन कुटुंबीय नागपूरमध्ये एकत्र जमलं होतं. 2013 मध्ये जेव्हा सर्वांत आधी जो बायडन यांनी भारतातील बायडन कुटुंबियांबद्दल जाहिररित्या वक्तव्य केलं, तेव्हापासून सर्व बायडन कुटुंबीय आपल्या पूर्वजांबद्दल आणखी माहिती जमवण्याचं काम करताहेत.
भारतातील बायडन कुटुंबीयांची माहिती घेण्याची आपणास उत्सुकता आहे, पण राजकीय व्यग्रतेमुळे ते शक्य झालं नाही, असं जो बायडन यापूर्वी म्हणाले आहेत, अशी माहिती बायडन कुटुंबीय देतात.
 
क्रिस्टोफर - रॉयल जॉर्ज जहाजाचे मुख्य खलाशी (1815)
क्रिस्टोफर हे मुख्य खलाशी म्हणून भारतात आले होते. प्रिसेंस ॲाफ शार्लेट ॲाफ व्हेल्स या बोटीचे ते कप्तान होते.
 
त्यांनी खलाशी आणि सागरी जहाजावरील नाविकांसाठी अनेक सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. 'Biden Home For The Destitute Seamen' या संस्थेची स्थापना रायलपूरम, मद्रासमध्ये केली. 1858 मध्ये त्यांचं निधन झालं. क्रिस्टोफर यांचे स्मारक सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये उभारण्यात आलं आहे.
 
क्रिस्टोफर यांचा तिसरा मुलगा चार्ल्स बायडन हे सरकारच्या माहिती विेभागातून निवृत्त झाले. चार्ल्स यांनी नागपूरच्या इविथ यांच्या सोबत लग्न केलं होतं. इविथ या नागपूरच्या मेयो रुग्णालयात मुख्य परिचारिका होत्या. चार्ल्स यांना जुळी मुलं झाली. लेस्ली आणि आर्थर अशी त्यांची नावं. लेस्ली पाच वर्षांचे असतांना चार्ल्स यांचा मृत्यू झाला.
 
तर क्रिस्टोफर यांचा दुसरा मुलगा सॅम्युअल आणि त्याची पत्नी अगस्टा बायडन हे 1873 मध्ये हैदराबाद हून नागपूरला स्थायिक झाले. दोघंही नागपूरच्या सेमिनरी हिल्सच्या एसएफएस महाविद्यालयात प्राध्यापक होते. 1891 मध्ये सॅम्युअल यांचा मृत्यू झाला. सॅम्युअल नागपूरच्या सी सी प्रेसमध्ये कंपोझिटरही होते.