शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (20:38 IST)

हाना होरका : कोव्हिड संसर्ग मुद्दामहून ओढवून घेणाऱ्या प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू

बेन टोबियास
हाना होरका या 57 वर्षीय गायिकेचं लसीकरण झालेलं नव्हतं आणि त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर यातून सावरत असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली होती. पण दोन दिवसांनीच त्यांचं निधन झालं.
 
"हाना यांच्या पतीला आणि मुलाला कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा त्यांनी जाणून बुजून कोरोनाचा संसर्ग ओढावून घेतला होता," असं त्यांचा मुलगा जॅन रेक यानं सांगितलं. कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर काही विशिष्ट ठिकाणी जाण्याची परवानगी मिळेल, यासाठी त्यांनी कोव्हिड संसर्ग मुद्दामहून ओढवून घेतला होता.
 
रेक आणि त्यांच्या वडिलांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं होतं. त्या दोघांनाही ख्रिसमसच्या दरम्यान कोव्हिडची लागण झाली होती. पण त्यांच्या आईनं त्यांच्यापासून दूर राहायचं नाही, तर उलट स्वतः विषाणूला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता.
 
"आम्ही पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं, त्यामुळं तिनं स्वतः एक आठवडा विलगीकरणात राहायला हवं होतं. पण ती पूर्ण वेळ आमच्याबरोबरच राहिली," असं ते म्हणाले.
 
झेक रिपब्लिकमध्ये बुधवारी कोरोनाग्रस्तांची विक्रमी आकडेवारी समोर आली आहे. झेक रिपब्लिकमधील नियमांनुसार सिनेमागृह, बार, कॅफे यासह अनेक सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी लसीकरण झालेलं असल्याचा पुरावा किंवा अलिकडच्या काळात तुम्हाला कोरोना संसर्ग झालेला असणं गरजेचं आहे.
 
रेकच्या आई हाना या झेकमधील सर्वात जुन्या लोककला ग्रुप असोनान्सच्या सदस्य होत्या. बाहेर फिरण्यावरची निर्बंध कमी व्हावी यासाठी कोव्हिड व्हावा, अशी त्यांची इच्छा होती, असं रेक यांनी सांगितलं.
 
मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर त्या सावरत असल्याचं म्हटलं होतं. "आता थिएटन, सॉना, कॉन्सर्ट सर्वकाही असेल," असं त्यांनी पोस्ट केलं होतं.
 
रविवारी सकाळी होरका या म्हणाल्या की, त्यांना चांगलं वाटत आहे आणि फिरायला जाण्यासाठी त्या तयार झाल्या. पण तेवढ्यात त्यांची पाठ दुखायला लागली. त्या पुन्हा बेडरूममध्ये जाऊन लोटल्या.
 
"त्यानंतर 10 मिनिटामध्ये सर्वकाही संपलं होतं. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला," असं त्यांच्या मुलानं सांगितलं.
 
आईने लसीकरण करून घेतलेलं नसलं तरी लसींबाबतच्या काही काही विचित्र कारस्थानांबाबतच्या गोष्टींवरही त्यांचा विश्वास नव्हता, असं त्यांचा मुलगा जॅन रेक यानं म्हटलं.
 
"कोरोनाच्या लसीकरणाऐवजी कोरोनाची लागण होणं हे त्यांच्यासाठी अधिक ठिक आहे, असा त्यांचा विचार होता. दुसऱ्या कोणत्याही गोष्टी त्यामागे नव्हत्या," असं ते म्हणाले.
 
या विषयाबद्दल तिच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नव्हता कारण ती फारच भावनिक होत होती, असंही त्यांनी सांगितलं. पण किमान त्यांची कथा सर्वांना समजल्यानंतर इतर लोक लसीकरण करून घ्यायला तयार होतील, असं त्यांनी म्हटलं.
 
"जर तुमच्यासमोर वास्तविक जीवनातलं प्रत्यक्ष उदाहरण असेल तर ते ग्राफ किंवा आकड्यांच्या तुलनेत कधीही अधिक शक्तीशाली असतं. आकडे पाहून सहानुभूती निर्माण होऊ शकत नाही," असं ते म्हणाले.
 
झेक रिपब्लिकमध्ये कोव्हिडच्या दैनंदिन केसेसचा आकडा बुधवारी नव्या उच्चाकांवर पोहोचला. याठिकाणी एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये बुधवारी 28,469 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
 
येथील सरकारनं या संकटाचा सामना करण्यासाठी नुकतेच नवे नियम आणि दिशानिर्देश लागू केले आहेत. त्यात कर्मचारी आणि शाळकरी मुलांच्या चाचणीचा समावेश आहे. लागण झालेल्या पण लक्षणं नसलेल्यांसाठी विलगीकरणाचा कालावधी 14 दिवसांवरून 5 दिवस करण्यात आला आहे.
 
झेक सरकारनं बुधवारी समाजातील काही घटकांसाठी लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार रद्द करत असल्याचंही जाहीर केलं. सरकार असं पाऊल उचलण्याच्या शक्यतेनं हजारो लोकांनी प्राग आणि इतर ठिकाणी आंदोलनं केली होती.
 
झेक रिपब्लिकमधील एकूण लोकसंख्या 63 टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. हे प्रमाण युरोपच्या 69 टक्क्यांपेक्षा काहीसं कमी आहे.