-नीलेश धोत्रे
"आता आमचं ठरलं आहे आम्ही निलेश लंके यांच्या बरोबर राहणार आहे. शिवसेनेनं परत बोलावलं तरी जाणार नाही. आम्ही पदाचा राजीनामा देऊ, पण शिवसेनेत परत जाणार नाही," पारनेरचे नगरसेवक नंदकिशोर देशमुख यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याआधी बरोबर 24 तास आधी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली होती.
मग फक्त 24 तासांमध्ये असं काय घडलं की हे पाचही नगरसेवक पारनेरमधून थेट मुंबईत पोहोचले आणि नंतर पुन्हा शिवसेनेत गेले. महत्त्वाचं म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांच्यासाठी या मंडळींनी शिवसेना सोडली होती, तेच राष्ट्रवादीचे निलेश लंके त्यांना मातोश्रीवर शिवसेना प्रवेशासाठी घेऊन गेले हे विशेष.
प्रथम दर्शनी सध्या तरी शिवसनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि मग ते पुन्हा शिवसेनेत गेले असं सरळसोपं दिसत असलं तरी ते तितकं सोपं आणि सरळ खरंच आहे का की त्यामागे खूप मोठं राजकारण आणि राजकीय खेळी आहे, हेच आपण तपासून पाहूया.
त्याआधी थोडी क्रोनोलॉजी समजून घेऊया.
पारनेर घटनेची क्रोनोलॉजी
निलेश लंके आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते आधी शिवसेनेचे पारनेर तालुका प्रमुख होते. तत्कालीन स्थानिक शिवसेना आमदार विजय औटी यांच्याविरोधात जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2019ची विधानसभा निवडणूक लढवली.
स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये विजय औटी यांच्याविरोधात नाराजी होती. तसंच बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांनीसुद्ध ते निलेश लंके यांचे जुने कार्यकर्ते असल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
त्यातच पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीला अवघे 3 महिने असताना 5 शिवसेना नगरसेवकांनी लंकेंच्या साथीनं राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये तो झाला सुद्धा. आमचा विरोध स्थानिक माजी आमदारांना आहे उद्धव ठाकरेंना नाही असं त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं.
या प्रवेशाआधी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 26 जून रोजी पारनेरचा दौरा केला. पण त्यांची ही कौटुंबिक भेट असल्याचा दावा निलेश लंके यांनी केला होता. त्यानंतर 4 जुलैला बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनाच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
स्थानिक पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याचं या नगरसेवकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं. पुढे 2 दिवसांना म्हणजेच 6 जुलै रोजी खुद्द शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली.
7 जुलैला सकाळपासून शिवसेनेच्या अधिकृत सुत्रांच्या हवाल्यानं उद्धव ठाकरे यांनी त्यांचे 5 नगसेवक पुन्हा पक्षात पाठवण्यासाठी अजित पवारांकडे निरोप पाठवल्याचं वृत्त आलं.
त्यानंतर आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा घेणारे नगरसेवक मुंबईत पोहोचले, त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि नंतर मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
पण यातून एक मुलभूत प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं कारण काय?
यामागे नेमकं काय राजकारण आहे?
थेट मुख्यमंत्र्यांना भेटून पाणयाचा प्रश्न निकाली नाही काढता आला असता का? या सर्व घडामोडींमागे नेमकं काय राजकारण आहे, त्याचा नेमका अर्थ काय, नेमकं कोण कुणाला काटशह देण्याचा प्रयत्न करत आहे? यामुळे राज्यातलं सरकार अस्थिर होईल का?
या घटनेमुळे सरकार लगेचच अस्थिर होईल असं राजकीय विश्लेषकांना वाटत नाही, पण यामुळे समन्वय आणि प्रतिष्ठेचा मुद्दा मात्र नक्की उपस्थित होतो.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी हे फारच लहान प्रकरण आहे असं राजकीय विश्लेषक दीपक भातुसे यांना वाटतं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं. "ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. पारनेरच्या नगरपंचायतीतून शरद पवार कुणाचा काटा काढतील असं वाटत नाही. पण राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला हवी होती. दोन पक्षांमधला हा विसंवाद दिसून आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक परत आलेच पाहीजेत हा प्रतिष्ठेचा विषय केला. पण यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा धोक्यात आली हे नक्की."
'उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा विषय?'
उद्धव ठाकरे यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्यानेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत यावर चर्चा झाली असणार असं दिसून येत आहे, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.
ते सांगतात, "शरद पवार यांनी या प्रकणात लक्ष घातलेलं दिसतंय, शिवसेनेला दुखावणं राष्ट्रवादीला परवडणारं नाही हे शरद पवार यांना वाटलं असणार. म्हणून हे सगळं घडून आल्याचं दिसत आहे."
शरद पवार यांचा अजित पवार यांना काटशह?
पण या सर्व घडामोडींनतर अजित पवार यांच्या आक्रमक राजकारणाला शरद पवार यांनी खो घातल्याची चर्चा आहे. त्याचं कारण ठरतंय ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना सविच मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांना निरोप पोहोचवल्याच्या आलेल्या बातम्या.
नगरसेवक शिवसेनेत परत गेल्यामुळे हे प्रकरण अजित पवार यांच्या अंगाशी आल्याचं हेमंत देसाई यांना वाटतं.
"ही कामगिरी यशस्वी झाली असती तर पार्थ पवार यांना त्याचं श्रेय मिळालं असतं, पण हा डाव आता पहाटेच्या शपथविधी प्रमाणे अजित पवार यांच्या अंगाशी आल्याचं दिसत आहे," असं ते सागंतात.
पण अजित पवार यांनी ही आक्रमक भूमिका का घेतली असा सवाल उपस्थित होतो.
त्याचं विश्लेषण करताना देसाई सांगतात, "सरकार चालवताना राष्ट्रवादीचे असलेले आक्षेप, त्यांच्या भूमिका आणि समन्वय साधण्याचं काम अजित पवार यांच्या मार्फत शरद पवार करू शकतात, पण ते स्वतःच उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क ठेवून असतात. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद तर दिलंय, पण त्यांना पॉवरलेस ठेवण्यात आलं आहे. हे जाणीवपूर्वक करून अजित पवार यांना त्यांची जागा दाखवू देण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं."