पंकजा मुंडे यांना केंद्रात काही ना काही चांगली जबाबदारी मिळेल - चंद्रकांत पाटील
भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी घोषित झाली. त्यात पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत तातडीनं स्पष्टीकरण दिलं.
"पंकजा मुंडेंना केंद्रात काही ना काही चांगली जबाबदारी मिळणार आहे. केंद्रात पंकजा मुंडेंना जबाबदारी देऊ, असं केंद्रानं सूचवलं. राज्याच्या कोअर कमिटीच्या पंकजा मुंडे शंभर टक्के सदस्य असतील. आमच्यासोबतच त्या काम करतील. मात्र, महाराष्ट्राचं काम पाहत असताना, त्यांनी केंद्रात वेळ द्यावा, अशी केंद्राची अपेक्षा आहे," असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
चंद्रकांत पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर त्यांचे आभारही मानले आहेत. आपल्याविषयी भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार, असं ट्वीट पंकजा मुंडेंनी केलं आहे.
दुसरीकडे, पंकजा यांच्या बहिणीला म्हणजेच प्रीतम मुंडे यांना मात्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा यांनी याबाबत ट्वीट करून बहिणंचं अभिनंदन केलं आहे. तसंच एक सल्लादेखिल दिला आहे. त्या लिहितात, "प्रितम मुंडे ताईला शुभाशीर्वाद प्रदेशाचे उपाध्यक्ष मिळाल्या बद्दल अभिनंदन... मुंडे- महाजनाच्या संघटनेतील कामाचा वारसा चोख बाजावशील असा पूर्ण विश्वास. गुड लक."
भाजप कार्यकारिणीच्या प्रमुख पदांमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे.
भाजपच्या महामंत्रिपदी चंद्रशेखर बावनकुळे असतील, तर एकूण 12 जण पक्षाच्या उपाध्यक्षपदी असतील. यामध्ये राम शिंदे, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आदींचा समावेश आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये असतील,तर आयटी विभागाचे प्रमुख आशिष कुलकर्णी असतील.
तर आधीचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांना प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे.