गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (17:21 IST)

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटशी लढण्यासाठी महाराष्ट्र किती सज्ज?

कोरोनानं नव्या व्हेरियंटच्या रूपात पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. BF.7 असं या नव्या व्हेरियंटचं नाव आहे.
 
चीन, जपान, ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्ये या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना संसर्ग वाढल्यानंतर भारतातही चिंता वाढली आहे.
 
या नवीन व्हेरियंटविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र किती सज्ज आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी संवाद साधला.
 
प्रश्न - कोरोनाचा नवीन व्हेरियंट किती धोकादायक आहे?
डॉ. प्रदीप आवटे – चीन, जपान आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये सध्या नव्या व्हेरियंटचा प्रसार होताना दिसतोय. विशेषत: चीनमधील रुग्णसंख्या वाढत आहे. यासंबंधी ज्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत, त्या भारतासाठी चिंताजनक आहेत.
 
BF.7 असं हे व्हेरियंट असल्याचं आतापर्यंतच्या बातम्यांवरून आपल्याला कळलं आहे. हा ओमिक्रॉनच आहे, नवा व्हेरियंट नाही. BA.5 या व्हेरियंटचाच उपप्रकार आहे. आपल्याकडे, महाराष्ट्रात आणि देशातही BA.5 व्हेरियंट उदंड सापडलेला आहे. पण आपल्याकडे त्याचा फार प्रसार झाला नाही, तसंच त्यानं गंभीर रूपही घेतलं नाही.
 
दुसरीकडे, BF.7 सुद्धा गुजरातमध्ये जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आढळला होता. त्यामुळे मागच्या चार महिन्यात आढळूनही आपल्याकडे फार पसरला नाही. याचा अर्थ असा की, या नव्या व्हेरियंटमध्ये महाराष्ट्र किंवा भारतात काही उलथापालथ होईल, असं दिसत नाही. हा त्यातला पहिला भाग.
 
पण असं म्हणत असताना, आपण निष्काळजीपणे बसून राहायचंय, असंही नाही. आपण म्हणजे शासन-प्रशासन म्हणून या सर्व परिस्थितीचा आढवाही घेत आहोत. आपण ज्या पाच सूत्रांचा वापर केलेला आहे. त्यात टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोव्हिड अनुरूप वर्तन या पाच गोष्टी आहेत.
 
आता लोकांच्या हातात एक गोष्ट अशी आहे की, लोकांनी घाबरण्याची गरज नाही, ‘पॅनिक बटन’ दाबण्याची गरज नाही. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, खोट्या-नाट्या बातम्या सोशल मीडियावर पाठवून, एकमेकांना घाबरवू नका.
 
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मास्क अनिवार्य नाहीय. परंतु, वरिष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं वय 60 वर्षांच्या वर आहे, तसंच ज्यांना डायबेटीस, कर्करोगासारखे आजार आहेत, त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण त्यांच्यात सौम्य आजारसुद्धा गंभीर होऊ शकतो.
 
एकतर गर्दीमध्ये जाणं टाळा किंवा मास्कचा वापर करा.
 
रुग्णालयात कुणाला भेटायला जात असाल, तर मास्क वापरलाच पाहिजे.
 
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लसीकरण पूर्ण केलं पाहिजे. प्रिकॉशन डोस राहिलेल्यांनी तो पूर्ण करावा.
 
आधीची लस या व्हेरियंटला रोखण्यासाठीही चालू शकेल की नवीन लस घ्यावी लागेल?
डॉ. प्रदीप आवटे - पहिली गोष्ट म्हणजे, जसं मी आधीही सांगितलं की, हा नवीन व्हेरियंट नाही. हा ओमिक्रॉनचाच प्रकार आहे. आपल्याकडे जी तिसरी लाट आली, ती ओमिक्रॉनमुळेच होती. त्यामुळे हा व्हेरियंट आपल्याकडे येऊन गेलाय.
 
जेव्हा तुम्ही लस घेता, तेव्हा तुमच्या शरीरातील प्रतिकार करण्याची जी यंत्रणा आहे, ती एका अर्थानं प्रशिक्षित होते. तिच्यामध्ये काही मेमरी सेल्स तयार होतात. यामुळे तुमच्या शरीरात आधीचाच विषाणू पुन्हा आला, तर त्या मेमरी सेल्स वेगानं अँटी-बॉडी तयार करतात आणि तुम्हाला आजार तेवढा गंभीर होत नाही.
 
म्हणजेच, लसीकरणामुळे तुमची प्रतिकार क्षमतेची यंत्रणा प्रशिक्षित झालीय, त्यात मेमरी सेल्स तयार झालेत. त्या तुम्हाला विषाणूविरोधात काम करण्यासाठी मदत करतील. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.
 
फक्त ज्यांचा प्रिकॉशन डोस राहिलाय, त्यांनी तो घ्यावा, एवढीच सूचना या घडीला आहे.
 
आता या व्हेरियंटनंतर नॅशनल टास्क फोर्ससुद्धा अभ्यास करतंय. त्यांना गरज वाटल्यास नव्या गाईडलाईन्स जारी करतील.
 
आपण किती टक्के लसीकरण पूर्ण केलंय?
डॉ. प्रदीप आवटे - बूस्टर डोसचं प्रणाम तुलनेनं कमी आहे. कारण स्वाभाविकपणे दोन डोस झाल्यानंतर बूस्टर डोसपर्यंत आपण आलो, तोपर्यंत तिसरी लाटही ओसरली होती आणि लोकांच्या मनातली भीतीही संपली होती.
 
त्यात ओमिक्रॉन नॅचरल व्हॅक्सिनेशन आहे, अशीही तज्ज्ञांची चर्चा होती. या सगळ्यांचा परिणाम म्हणून बूस्टर डोस घेतलेल्यांची संख्या कमी दिसतेय.
 
मात्र, आता या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बूस्टर डोसकडे आपण जायला हवं.
 
नवीन व्हेरियंट वेगानं पसरल्यास महाराष्ट्र तयार आहे का?
डॉ. प्रदीप आवटे - महाराष्ट्र अगदी तयार आहे. आपण तिसऱ्या लाटेपासूनच लहान मुलांपासून सर्व वयोगटासाठी रुग्णालयं सुसज्ज करून ठेवलेत.
 
आता रुग्णसंख्या कमी झालीय. महाराष्ट्रात आजच्या घडीला फक्त 20-22 रूग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे इतर बेड्स इतर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 
कुठल्याही क्षणी बेड्सची संख्या पुन्हा कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करू शकतो. पण आता ती गरज पडणार नाही, असं एकूण वातावरण आहे.
 
मधल्या काळात आपण ऑक्सिजनचे बरेच प्लांट उभे केलेले आहेत. महाराष्ट्रात 550 हून अधिक ऑक्सिजन प्लांट आजच्या घडीला आहेत.
 
6 हजार मेट्रिक टनपेक्षा जास्त मेडिकल ऑक्सिजन आपण तयार करू शकतो. एवढी आपली क्षमता आहे. म्हणजे, या अर्थानं आपली तयारी आहे.
 
पण लोकांना आश्वस्त करू इच्छितो की, या सगळ्याची गरज आपल्याला पडणार नाही. तरीही आपण निष्काळजीपणा अजिबात दाखवायचा नाही. आपल्या पातळीवर आपली काळजी घ्यायची आहे.
 
ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणं काय?
ओमिक्रॉनमध्येही कोरोना संसर्गाची यापूर्वी आढळणारी तीन लक्षणं आढळत असल्याचं युकेच्या NHSने म्हटलं आहे.
 
काही लोकांमध्ये ओमिक्रॉन हा सर्दीसारखा आढळला आहे. घसा खवखवणं, नाक वाहणं आणि डोकेदुखी ही लक्षणं ओमिक्रॉन संसर्ग झालेल्यांमध्ये आढळली.
 
आधीच्या कोव्हिड व्हेरियंट्मध्ये वास आणि चव जाणं, खोकला आणि जास्त ताप ही लक्षणं आढळली होती. आणि याबद्दलही सजग राहणं गरजेचं आहे.
 
ओमिक्रॉन आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत असला तरी तो तुलनेने सौम्य असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. ओमिक्रॉन संसर्ग झाल्याने गंभीर आजारी पडलेल्यांची वा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलेल्यांची संख्या कमी आहे.
 
ओमिक्रॉन आणि याआधी मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटमध्ये कोणती लक्षणं समान आहेत, याचा अभ्यास सध्या संशोधक करत आहेत.
 
ओमिक्रॉन आणि डेल्टामध्ये आतापर्यंत आढळलेली 5 समान लक्षणं आहेत.
 
नाक गळणं
डोकेदुखी
थकवा (सौम्य वा प्रचंड)
शिंका येणं
घसा खवखवणं
यापैकी काही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील आणि तुम्हाला कोरोना संसर्गाची शंका वाटत असेल तर चाचणी करून घेणं उत्तम.