-अनघा पाठक
फोन वाजला तशी गेल्या चार महिन्यात ओळखीची झालेली कॉलरट्यून वाजली. 'आपल्याला रोगाशी लढायचंय, रोग्यांशी नाही. कोरोनाबाधितांना दूर लोटू नका, त्यांची काळजी घ्या.' या वाक्याला कसंतरी झालं. ज्या हर्षल नेहतेंना फोन केला होता, त्यांनाही दिवसातून 50 वेळा ही कॉलरट्यून ऐकू येत असणार. त्यांच्या मनात काय कालवाकालव होत असेल? व्यवस्थेने, रोगाने आणि गलथानपणाने त्यांच्या बाबतीत सगळंच उलटं केलंय.
त्यांच्या माणसांची ना काळजी घेतली, ना दखल, ना रोगावर इलाज केला. काळजी घेणं तर लांबच. परिवारातल्या एका बाधित व्यक्तीचा मृतदेह शौचालयात पडून राहिला तरी कोणाच्या गावीही नव्हतं.
आता तपासाची चक्र फिरतायत, लोकांच्या रोषाला शांत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना निलंबितही केलंय, पण याने कोरोनापेक्षाही भयानक असणारा अव्यवस्थेचा रोग बरा होईल का हा प्रश्नच आहे.
हर्षल नेहते यांच्या कुटुंबाने गेल्या काही दिवसात बरंच सोसलंय. मुळचे जळगाव जिल्ह्यातल्या यावलमधले असलेले हर्षल आता पुण्यात स्थायिक आहेत तर त्यांच्या घरचे गावीच असतात.
"सुरुवातीला माझ्या वडिलांना कोव्हिड झाल्याचं निष्पन्न झालं. आधी काही लक्षण दिसली नाहीत, मग आईलाही त्रास सुरू झाला. मग आईवडिल दोघांनाही भुसावळमधल्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तिथे नीट ट्रीटमेंट झालीच नाही. तीन दिवसांनी त्यांची तब्येत आणखी खालावली, मग दोघांनाही जळगावला हलवण्यात आलं. पण काही उपयोग झाला नाही. आईची तब्येत सिरीयस होती पण आयसीयूमध्ये बेडच अव्हेलेबल नव्हता. त्यातच आईचा मृत्यू झाला," ते सांगतात.
हर्षल यांच्या 60 वर्षीय आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुसरं संकट ओढवलं. 82-वर्षीय आजीचीही, मालती नेहते यांचीही तब्येत बिघडली आणि त्याही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यांनाही तडकाफडकी जळगावला हलवण्यात आलं.
"1 जूनला आम्ही आजीला जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दोन तारखेला मी आजीची विचारपूस करायला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आजीला आता 7 नंबर वॉर्डमध्ये ठेवलं आहे. तो वॉर्ड म्हणजे कोरोना संशयित पेशंट्सचा वॉर्ड असतो, आम्ही त्यांना सांगितलं की त्यांना संशयितांच्या वॉर्डमध्ये का ठेवलंय, माझ्या आजीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ती संशयित नाही, तुम्ही तिला कोरोना वॉर्डमध्ये हलवा," हर्षल माहिती देतात.
जळगावमधल्या या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या अनेक पेशंट्स तसंच त्यांच्या नातेवाईकांची तक्रार होती की नीट चाचणी न करता तसंच माहिती न घेता संशयित वॉर्डमध्ये ठेवत आहेत. अशाने जे फक्त संशयित आहेत पण ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही असे आणि ज्यांना लागण झालेली आहे असे एकाच वॉर्डमध्ये राहात आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका कैकपटीने वाढला आहे. याच भीतीपायी अनेक संशयित वॉर्डमध्ये न थांबता बाहेर थांबत आहेत.
दवाखान्यात असणाऱ्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की सुरुवातीला संशयितांच्या वॉर्डमधून पेशंट्स सतत बाहेर ये-जा करायचे. तर अपुऱ्या मेडिकल स्टाफमुळे पेशंट्सची काळजी त्यांच्या नातेवाईकांनाच घ्यावी लागे, तीही कोणत्याही सुरक्षेच्या साधनाविना.
"आजीची तब्येत सिरीयस होती. तिला आयसीयूमध्ये न ठेवता साध्या वॉर्डमध्ये ठेवलं होतं. त्याविषयी मी तक्रार केली तर दवाखान्यातल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला भुसावळवरून जे लेटर आलं त्यात असं लिहिलंय की तुमच्या आजी संशयित आहे. त्यात कुठेही लिहिलेलं नाही की या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह."
भुसावळहून आलेल्या केसपेपरवर आजीचं नाव चुकवल्याचंही हर्षल म्हणतात. त्यांनी आजीला त्या वॉर्डमधून हलवा असा आग्रहच धरल्याने 2 जूनला हॉस्पिटलचे कर्मचारी मालती नेहती यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या दुपारपासून जागेवर नाहीत. कर्मचाऱ्यांनी पूर्ण हॉस्पिटल शोधलं पण त्यांचा शोध न लागल्यामुळे रात्री उशीरा त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली.
"पण 3 तारखेला आम्ही तिथल्याच एका डॉक्टरांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची आजी सापडली आहे, आणि आम्ही त्यांना वॉर्ड नंबर 9 मध्ये हलवलं आहे. प्रत्यक्षात आजीचा शोध लागला नव्हता. आता ते डॉक्टर खोटं बोलले की त्यांचाच गैरसमज झाला हे कळायचा मार्ग नाही," हर्षल उत्तरतात.
5 जूनला मालती नेहतेंच्या घरच्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की असा पेशंट 9 नंबर वॉर्डमध्ये नाहीये. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी पुन्हा पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तपास केल्याचं सांगितलं पण हर्षल यांचा आरोप आहे की पोलिसांनीही नीट शोध घेतला नाही.
मालती यांचा मृतदेह वॉर्ड नंबर 7 च्या शौचालयात 10 जूनला सापडला. मालती नेहतेंचा मृत्यू नक्की कधी झाला? इतके दिवस त्यांचा मृतदेह शौचलयात पडून होता तरी कोणालाच कसं कळालं नाही? पोलीस आणि हॉस्पिटलने खरंच त्यांचा शोध घेतला होता का? या प्रश्नांची उत्तर नसल्यामुळे हर्षल आणखी सैरभैर झालेत.
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, डेथ सर्टिफिकेटवर मात्र लिहिलं न्यूमोनिया
चुन्नीलाल महाजन भुसावळमध्ये राहातात. त्यांच्या काकांचा मृत्यू झालाय. जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये सगळा सावळा गोंधळ असल्याचा आरोप ते करतात.
"आमच्या पेशंटचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दुसऱ्या रिपोर्टची इतकी वाट पाहिली पण तो आलाच नाही, त्याआधीच काकांचा मृत्यू झाला. बरं त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जे डेथ सर्टिफिकेट दिलं त्यात 'डेथ बाय न्यूमोनिया' असं लिहिलं होतं. मग त्यांना कोरोना झाला होता की नव्हता?" चुन्नीलाल प्रश्न उभा करतात.
पुढे ते असंही म्हणतात की त्यांच्या काकांच्या घरात न्यूमोनियाची हिस्टरी होती. त्या घरातल्या आजींचा मृत्यूही न्यूमोनियाने झाला होता. काकाही न्यूमोनियाने जवळपास महिनाभर आजारी होते. तब्येत बिघडली तेव्हा त्यांना जळगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवलं, पण तिथे दाखल करून घेण्यास नकार दिल्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं.
"काकांना प्रॉपर ट्रीटमेंट नाही मिळाली. त्यांची ना ट्रॅव्हल हिस्ट्री होती ना काही. त्यांना न्यूमोनियाच्या उपचारांची गरज होती. आम्हाला हॉस्पिटलकडून काहीच अपडेट मिळत नव्हते, त्यांची काय परिस्थिती आहे हे ही कळत नव्हतं. आम्ही रिपोर्टची वाट बघत बसलो आणि काका गेले."
आपल्या पेशंटला खरंच कोव्हिड झाला होता का? असेल तर मग न्यूमोनियाने मृत्यू असं का लिहिलं? हॉस्पिटल प्रशासनाने काहीच माहिती का दिली नाही? या प्रश्नांची उत्तर चुन्नीलाल आणि त्यांच्या कुटुंबाला मिळत नाहीयेत.
राज्यात सर्वाधिक मृत्यूदर
जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 ने मरण पावणाऱ्या लोकांचा दर सर्वाधिक, म्हणजे 10.4 टक्के इतका आहे. त्याच्या तुलनेत देशाचा मृत्यूदर 2.8 टक्के तर राज्याचा मृत्यूदर 3.4 टक्के इतका आहे.
दीपकुमार गुप्ता जळगावमधले सामाजिक कार्यकर्ते आहेत. जळगावमधल्या परिस्थितीच विश्लेषण करताना ते म्हणतात, "इथल्या नागरिकांच्या मनात आता भीती बसलीये की कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे कुठला पेशंट जर सरकारी दवाखान्यात दाखल झाला तर तो काही जिवंत परत येत नाही. इतकी वाईट व्यवस्था इथे आहे. इथल्या लोकांकडे ना स्थानिक प्रशासनाचं लक्ष आहे ना डॉक्टरांचं. टेस्टचे रिपोर्ट येण्यात अक्षम्य दिरंगाई होते.
"इथे सेंट्रलाईज ऑक्सिजनची व्यवस्था नाही. त्यामुळे पेशंटचं ऑक्सिजन सिलेंडर वारंवार बदलावं लागतं आणि कित्येकदा हे सिलेंडर पेशंटचे नातेवाईकच बदलतात. कोणाचा कोणाला धरबंद नसल्याने कोव्हिड वॉर्डमधले पेशंट्स बाहेर येतात. अनेकदा संशयित पेशंट भीतीने कॉरिडॉरमध्ये बसलेले असतात. कोव्हिड पेशंटला वेळेवर सुविधा मिळत नाहीत. ऑक्सिजन प्लस मीटरची इथे कमतरता आहे. पण सगळ्यांत मोठं आणि जीवघेणं कारण आहे, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची अनास्था. "
सरकारी हॉस्पिटलच्या शौचालयात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सरकारी पातळीवर धावपळ उडाली आहे. याप्रकरणी मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. भास्कर खैरे यांच्यासह आणखी दोघा डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. कोव्हिड हॉस्पिटलमधले डॉक्टर्स वॉर्डमध्ये राऊंड्स घेतात की नाही हे पाहाण्यासाठी प्रत्येक वॉर्डच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचं अॅडमिनिस्ट्रेटर डॉ बी. एन. पाटील यांनी सांगितलं.
मालती नेहतेंचा मृतदेह अनेक दिवस शौचालयात पडून होता आणि कोणालाही कळलं नाही ही बाब गंभीर असल्याचं जळगावचे कलेक्टर अविनाश ढाकणे मान्य करतात. "सिव्हिल हॉस्पिटलकडून अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. ज्या शौचालयांची दिवसातून कमीत कमी दोनदा साफसफाई व्हायला हवी तिथे 6 दिवस मृतदेह पडून असतो आणि ते कळत नाही हे गंभीर आहे. याची पूर्ण चौकशी होईल आणि दोषींवर निश्चित कारवाई होईल."
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसंच जिल्ह्यात नवीन डीन नेमले जातील आणि अधिकचे डॉक्टर्स, इतर नर्सिंग शेजारच्या जिल्ह्यांमधून आणले जातील अशी माहिती दिली.
हर्षल याच्या वडिलांना जळगावच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला तेव्हा त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण त्यांचा अशक्तपणा गेला नव्हता. त्यांना बरं वाटत नव्हतं. पण सरकारी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बेड्सच्या कमतरतेमुळे त्यांना घरी जाण्यासा सांगितलं. पत्नी आणि आईच्या माघारी या वृद्ध माणसाची काळजी घ्यायला कोणी नव्हतं ना त्यांना कोणतं खासगी हॉस्पिटल ठेवून घ्यायला तयार होतं. शेवटी नाशिकमधल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलं.
आपल्या आई आणि आजीच्या अंत्यसंस्काराला हर्षल उपस्थित राहू शकले नाहीत, आपल्या वडिलांची काळजी घ्यायला येऊ शकले नाहीत कारण ते पुण्यात आहेत, त्यांची पत्नी 9 महिन्यांची गरोदर आहे आणि तिचे दिवस भरलेत. अशा परिस्थिती ते पत्नीला एकटी सोडून येऊ शकत नाहीत.
दोषारोप होत राहतील, कारवाईची मलमपट्टी होईल, नवीन माणसंही येतील पण यात भरडल्या जाणाऱ्या माणसांच्या वेदनांचं काय?