1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (18:44 IST)

केव्हीएल पवनी कुमार : वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी वेटलिफ्टिंग सुरू करणारी खेळाडू

ज्या वयात अनेक मुलांना खांद्यावरच्या दप्तराचंही ओझं होत असतं, त्या वयात केव्हीएल पवनी कुमारीनं वेटलिफ्टिंगला सुरूवात केली होती.
 
इतक्या लहान वयात वेटलिफ्टिंगला सुरूवात करण्याचं श्रेय पवनी तिच्या पालकांना देते. आपल्या अत्यंत उत्साही मुलीमधल्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 
पवनीचं कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम जिल्ह्यातल्या जी कोथापल्ली गावचं. त्यांनी पवनीला 2011 साली हैदराबादला तेलंगणा स्पोर्ट्स अकेडमीमध्ये घातलं. तेव्हा ती केवळ आठ वर्षांची होती.
 
पवनी आणि तिच्या कुटुंबीयांची मेहनत सार्थ ठरली जेव्हा ती वेगवेगळ्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळायला लागली. तिच्या वयोगटातल्या स्पर्धकांवर ती वरचढ ठरत होती.
 
2020 हे वर्ष तर तिच्यासाठी खास होतं. तिनं उझबेकिस्तानमधल्या ताश्कंदमध्ये झालेल्या एशियन युथ अँड ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पिशियनशिपमध्ये ज्युनियर आणि युथ गटामध्ये दोन रौप्य पदकं जिंकली.
 
अडचणींशी झगडत झालेला प्रवास

अतिशय दुर्गम भागातून येणाऱ्या पवनी कुमारीसाठी प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा मिळवणं हे सर्वांत मोठं आव्हान होतं. त्यामुळेच लहान वयातल्या पवनीला घरापासून दूर ठेवण्याचा कठोर निर्णय तिच्या पालकांना घ्यावा लागला.
 
प्रशिक्षक पी. मनिक्याल राव यांनी पवनीकडे विशेष लक्ष दिलं. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आपली खेळाडू म्हणून जडणघडण झाल्याचं पवनी सांगते.
 
अॅकेडमीमध्ये तिचं पूर्ण लक्ष हे खेळावरच केंद्रित झालं होतं. सुट्ट्यांमध्येसुद्धा ती घरी न जाता स्पर्धांची तयारी करण्यासाठी थांबायची.
 
पवनीचं प्रशिक्षण तर योग्य दिशेनं सुरू होतं, पण आयुष्यानं जणू तिची परीक्षा पाहायचं ठरवलं होतं. तब्येत बिघडल्यामुळे तिच्या वडिलांना घरीच थांबणं भाग पडलं. शेतीवरच अवलंबून असलेल्या या कुटुंबाला त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं.
 
 
त्यामुळे पवनीला खेळावर लक्षही केंद्रित करता येत नव्हतं. तो काळ तिच्यासाठी खडतर होता. 2019 पर्यंत पवनी अडचणींशी झगडत होती.
 
पवनीच्या घरातले तिला आवश्यक ते आर्थिक पाठबळ देऊ शकत नव्हते, पण त्यांनी तिला पूरेपूर मानसिक आणि भावनिक आधार दिला.
 
कठोर मेहनतीनं मिळवलं यश

बोधगया इथं 2019 मध्ये झालेल्या युथ (सब ज्युनियर बॉईज अँड गर्ल्स), 56वी पुरूष आणि 32 वी महिला (ज्युनियर) नॅशनल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तिची कारकिर्द रुळावर आली.
 
तिथे तिनं 'बेस्ट लिफ्टर' पुरस्कार जिंकला तसंच युथ सेक्शनमध्ये खेळत असताना दोन विक्रमही रचले.
 
त्यातूनच पवनीचा आत्मविश्वास वाढला. ज्याचा फायदा तिला उझबेकिस्तानमधल्या ताश्कंदमध्ये झालेल्या एशियन युथ अँड ज्युनिअर वेटलिफ्टिंग चॅम्पिशियनशिपमध्ये झाला. या स्पर्धेत तिनं युथ आणि ज्युनिअर या दोन्ही गटातून प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं.
 
ताश्कंदमधल्या या यशानं पवनी कुमारीला प्रसिद्धीही मिळवून दिली. पण पवनीला ही केवळ सुरूवात आहे, असं वाटतं.
 
देशासाठी ऑलिंपिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकून देणं हे आता पवनीचं स्वप्न आहे. त्यासाठी कष्ट करण्याचीही तिची तयारी आहे.
 
पवनी कुमारीच्या मते कोणत्याही खेळाडूसाठी प्रशिक्षण महत्त्वाचं असतंच, पण यशस्वी करिअरसाठी नैतिक आणि आर्थिक पाठिंबा या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत.
 
खेळामध्ये करिअर करण्यासाठी धडपडणाऱ्या सगळ्या मुलींना पवनीचं एकचं सांगणं आहे... महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उत्तम करिअर घडवायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक फिटनेसला सारखंच महत्त्व देणं गरजेचं आहे.