शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

चंद्रावर जाण्यासाठी केलेल्या खटपटीतून लागले हे इतके शोध

"मानवाचं हे एक छोटंसं पाऊल आहे पण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे."
 
20 जुलै 1969रोजी चंद्रावर पहिल्यांदा उतरल्यानंतरचे नील आर्मस्ट्राँग यांचे हे उद्गार. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने 50 वर्षांपूर्वी गाठलेल्या मोठ्या ध्येयाला उद्देश्यून हे वाक्य होतं.
 
पण ही एक अशीही गोष्ट होती जिचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर झाला.
 
आजच्या मूल्यांमध्ये मोजायचं झालं तर या अपोलो प्रोग्रामचा खर्च होता सुमारे 200 बिलियन डॉलर्स. पण याच अपोलो कार्यक्रमामुळे असे काही बदल झाले जे आपल्या कधी लक्षातही आले नाहीत.
 
वायरींच्या गुंत्यात न अडकता साफसफाई करणं सोपं झालं
अपोलो उड्डाणांच्या आधीही कॉर्डलेस उपकरणं (वायर नसलेली) अस्तित्त्वात होती. पण त्यांचा खरा विकास झाला तो अपोलो उड्डणांनंतरच.
 
ब्लॅक अॅंड डेकर या साहित्य तयार करणाऱ्या अमेरिकन कंपनीने वायर नसलेलं ड्रिल मशीन 1961मध्ये बाजारात आणलं. पण याच कंपनीने नासाला चंद्रावरून नमुने गोळा करण्यासाठी खास ड्रिल मशीन पुरवलं होतं.
 
हे मशीन त्याचं इंजिन आणि बॅटरीज विकसित करण्यासाठी लागलेल्या माहितीच्या आधारे ब्लॅक अॅंड डेकरने बाजारात अप्लायन्सेसची एक नवी रेंज 1979मध्ये आणली. यामध्येच जगातल्या पहिल्या कॉर्डलेस कमर्शियल व्हॅक्युम क्लिनरचाही समावेश होता. 30 वर्षांमध्ये एकूण 150 दशलक्ष 'डस्टबस्टर्स' विकले गेले.
 
वेळ मोजण्याच्या पद्धती सुधारल्या
 
चंद्रावर उतरण्याच्या प्रक्रियेमध्ये अचूकपणा सगळ्यांत जास्त महत्त्वाचा होता. सेंकदाच्या काही अंशांच्या कालावधीची जरी गडबड झाली असती तरी तो चांद्रवीरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न ठरला असता.
 
म्हणूनच मग या मिशनवर लक्ष ठेवण्यासाठी नासाला अचूक घड्याळांची गरज होती. यासाठी अत्याधुनिक 'क्वार्टझ क्लॉक्स' तयार करण्यात आली.
 
पण गमतीची गोष्ट म्हणजे महत्त्वाचं काम या घड्याळ्यांनी करूनही प्रसिद्धी मिळाली ती अपोलो मिशनदरम्यान नील आर्मस्ट्राँग आणि त्यांच्यासोबत चंद्रावर उतरणाऱ्या बझ ऑल्ड्रिन यांनी लावलेल्या 'जुन्या पद्धतीच्या' मेकॅनिकल घड्याळांना.
 
आपल्याला पिण्याचं अधिक स्वच्छ पाणी मिळालं.
अपोलो अंतराळयानामध्ये तेव्हा वापरण्यात आलेलं पाणी शुद्ध करण्याचं तंत्रज्ञान आता अनेक पद्धतींनी वापरलं जातं. पाण्यातला बॅक्टेरिया, व्हायरस आणि अल्गी मारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो.
 
या अपोलो कार्यक्रमातूनच क्लोरिन-मुक्त टेक्नॉलॉजी वापरण्यास सुरुवात झाली. जगभरात अजूनही ही पद्धत मोठ्या प्रमाणावर स्विमिंग पूल्स आणि पाण्याच्या कारंजांसाठी वापरली जाते.
 
स्पेससूट्मुळे आपल्याला अधिक टिकाऊ पादत्राणं मिळाली.
अपोलो 11 मधील चांद्रवीरांचं चंद्रावर चालताना संरक्षण करण्याच्या दृष्टीने 1965मध्ये स्पेससूट तयार करण्यात आला होता. आताच्या घडीलाही अंतराळवीर घालत असलेल्या स्पेससूटचं डिझाईन 1965च्या याच मूळ डिझाईनवर आधारित आहे.
 
पण या टेक्नॉलॉजीचा फायदा शूज तयार करण्यासाठीही झाला. गेल्या काही दशकांमध्ये अधिक फ्लेक्झिबल, अधिक मजबूत आणि पायाला हिसके बसू न देणारे बूट बाजारात आलेले आहेत.
 
फायर रेझिस्टंट कपडे
1967मध्ये ट्रेनिंग दरम्यान अपोलो 1 यान आगीत भस्मसात झालं. यामध्ये 3 अंतराळवीरांचा बळी गेला आणि यानंतर अमेरिकेचा अवकाश कार्यक्रम मागे पडला.
 
पण यामुळेच नासाने अशा नव्या प्रकारच्या कापडाची निर्मिती केली जे फायर रेझिस्टंट (आगीमध्येही टिकाव धरणारं) होतं. आता जगभर या कापडाचा वापर सर्रास होतो.
 
अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांना थंड ठेवण्यासाठी जी पद्धत वापरण्यात येते त्याचाही फायदा सर्वसामान्यांना होतो. मल्टिपल स्क्लेरोसिसच्या पेशंट्पासून ते घोड्यांच्या शरीराचं तापमान कायम राखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.
 
आयुष्य वाचवणाऱ्या हदयरोग तंत्रज्ञानाला फायदा
 
शरीरात रोपण करता येणारे डिफिब्रिलेटर्स (ज्यांच्या हृदयाचे ठोके नियमित पडत नाहीत त्यांच्याद्वारे वापरण्यात येणारं उपकरण) पहिल्यांदा विकसित करण्यात आले ते नासामुळेच. सूक्ष्म प्रमाणातल्या सर्किटरी टेक्नॉलॉजीमध्ये नासाने केलेल्या प्रगतीचा फायदा यासाठी झाला.
 
ही सूक्ष्म उपकरणं त्या रुग्णाच्या त्वचेखाली लावून हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवता येतं आणि जर ठोके योग्य पडत नसतील तर विजेचे लहानसे झटके देऊन सुधारणा करण्यात येते. 1980च्या दशकात पहिल्यांदा अशा उपकरणाचा वापर झाला.
 
जेवण लहान पाकिटांत पॅकबंद करता येऊ लागलं
 
चंद्र गाठण्याचं ध्येय बाळगणाऱ्या नासासाठी जागेची बचत करणं आणि अंतराळयानाचं वजन फार न वाढवणं महत्त्वाचं होतं. यामुळे अन्न कसं साठवून नेता येईल यासाठी अपोलो मिशन दरम्यान संशोधन करण्यात आलं.
 
आधीच्या मर्क्युरी आणि जेमेनी अंतराळयानांच्या उड्डाणादरम्यान (1961-66) प्रवासाचा कालावधी लहान होता. पण ही चांद्रमोहीम अंतराळात 13 दिवस असणार होती.
 
म्हणून फ्रीज-ड्रायिंग प्रोसेस वापरण्यात आली. यामध्ये शिजवण्यात आलेल्या अन्नातून पाण्याचा अंश अत्यंत कमी तापमानामध्ये काढून घेतला गेला आणि हे पदार्थ खाताना अंतराळवीरांना त्यात फक्त गरम पाणी घालावं लागत होतं.
 
नील आर्मस्ट्राँगसाठी हे अन्न चांगलं होतं आणि त्याच्यानंतरच्या हायकर्स आणि कॅम्पर्सच्या पिढ्यांसाठीही हे अन्न चांगलं ठरतंय. शिवाय हे स्वस्तात विकतही घेता येतं.
 
सर्व्हायवल ब्लँकेटचा शोध
सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून अपोलोच्या अंतराळयानांचा बचाव करण्यासाठी नासाने चमकत्या इन्सुलेटरचा (प्रतिरोधक-उष्णता रोखून धरणारा थर) वापर केला. त्याला स्पेस ब्लँकेट म्हटलं गेलं. यामुळे असं वाटायचं की अंतराळयाना एका फॉईलमध्येच जणू गुंडाळण्यात आलेलं आहे. पण यातूनच आज आपण पाहत असलेल्या सर्व्हायव्हल (बचाव करण्यासाठीच्या) ब्लँकेटचा जन्म झाला.
 
प्लास्टिक, फिल्म आणि अॅल्युमिनियम पासून तयार करण्यात आलेलं हे ब्लँकेट आता अंतराळवीरांसोबतच इतरांचंही संरक्षण करतं. नासाच्या तंत्रज्ञानाचा वापर इमर्जन्सी थर्मल ब्लँकेट्स तयार करण्यासाठी होतो. अनेक बचाव कार्यांमध्ये याचा वापर केला जातो.
 
याशिवाय मॅरेथॉनमध्ये लांब पल्ल्यांचं अंतर धावणाऱ्यांना हायपोथर्मिया (शरीराचं तापमान घसरणे) होऊ नये म्हणूनही याचा वापर होतो. हॉस्पिटल आपल्या पेशंट्सची आणि कर्मचाऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून याचा वापर करतात.