शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (17:19 IST)

नांदेड : वडील-भावाने आधी तिचा खून केला, मग प्रेत जाळून राख नदीत फेकली

shubhangi
नांदेडमध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. नांदेडच्या पिंपरी महिपाल गावातील 23 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे.
 
शुभांगी जोगदंड असं मृत तरुणीचं नाव आहे. गावातील तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. याला कुटुबीयांच्या विरोध होता. या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच शुभांगीची हत्या करून प्रेत जाळल्याची घटना समोर आली आहे.
 
23 वर्षीय शुभांगी ही नांदेड येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. गावातील तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. पण कुटुंबीयांना ते मान्य नव्हते.
 
त्यामुळे शुभांगीच्या कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे तिची सोयरिक जुळवून दिली होती. काही दिवसांवर लग्न आले असताना काही कारणामुळे आठ दिवसापूर्वी सोयरिक मोडली. त्यामुळे शुभांगीच्या कुटुंबीयांना राग अनावर झाला.
 
मुलीमुळे गावात बदनामी झाली या कारणानं त्यांनी गेल्या रविवारी रात्री कुटुंबीयांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला. राख बाजूच्या ओढ्यात फेकून दिली.
 
शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता असून, ती नातेवाईकांकडेही नाही याची चर्चा महिपाल पिंपरी गावात सुरू होती. गावातील काही नागरिकांनी गुरुवारी 26 जानेवारीला लिंबगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांना माहिती दिली. त्यांनी गोपनीय पद्धतीने चौकशी केली असता, शुभांगीच्या आई- वडिलांनी मामा, काका व काकाच्या दोन मुलांच्या मदतीने शुभांगीचा खुन करून पुरावा नष्ट केल्याची बाब समोर आली आहे.
 
याप्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून, खुनातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या खुनामध्ये एकूण पाच आरोपी असून, अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांनी सांगितलं आहे.
 
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माध्यमांना याविषयी माहिती देताना सांगितलं की, “पिंपरी महिपाल गावाची 22 वर्षीय तरुणी जी बीएएमस शिकत होती, तिला घरच्याच लोकांनी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 26 तारखेला ही माहिती देणारा फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलीस गावात पोहोचले आणि मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
 
"पोलिसांच्या चौकशीत त्यांनी कबूल केलं की, मुलीचं एका तरुणासोबत अफेयर होतं. यामुळे तिचं लग्न तुटलं होतं. यामुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. मग अंत्यसंस्कार करून तिची राख नदीत फेकून दिली. तरुणीच्या कुटुंबीयांनी हे कबूल केलं आहे.”
 
“ज्या ज्या ठिकाणी राख मिळाली आहे, ती ठिकाणं पोलिसांनी पाहिली आहेत. नदीत काही सामानही मिळालं आहे. ते तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवला आहे. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढची चौकशी सुरू आहे,” असंही कोकाटे यांनी सांगितलं.
Published By -Smita Joshi