गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं हा वाढीचा पर्याय की आत्मघात?

- मयुरेश कोण्णूर
 
राज ठाकरे आता काय करतील? त्यांच्या वाट्याला गेल्या काही निवडणुका सातत्यानं पराभव जरी येत असले, तरीही 'राज काय करणार' हा प्रश्न महाराष्ट्रातल्या कोणत्याही निवडणुकीत कमी महत्त्वाचा ठरला नाही.
 
लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचं काहीही पणाला लागलं नव्हतं. त्यांचे उमेदवारही नव्हते. पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा त्यांचा भाजपविरोधी प्रचार जास्त प्रभावी ठरला. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यांनी जे वातावरण तयार केलं ते त्यांना आता विधानसभेच्या निवडणुकीत काही जागा मिळवून देईल का? त्यांच्यासमोरचे पर्याय काय आहेत?
 
हा प्रश्न राज ठाकरेंना, 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवारांना आणि कॉंग्रेसलाही सतत विचारण्यात आला की राज यांची 'मनसे' ही विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत सामील होईल का? कोणीही स्पष्ट उत्तर दिलं नाही.
 
लोकसभेचे निकाल आल्यावर राज ठाकरे आणि शरद पवारांची भेट झाली आहे. कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरेही राज यांना भेटून आले आहेत. असं म्हटलं गेलं की लोकसभेच्या निवडणुकीतच राज यांनी आघाडीत यावं या मताचे शरद पवार होते. पण कॉंग्रेसमधनं, विशेषत: मुंबई कॉंग्रेसमधनं, त्यांना विरोध होता.
 
राज यांच्यासोबतचा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा वाद मुंबई कॉंग्रेसच्याही पथ्थ्यावर पडतो. पण आता लोकसभेच्या पानिपतानंतर कॉंग्रेसची इच्छा बदलते आहे असं दिसतं आहे.
 
अपिरहार्य तडजोड
पण प्रश्न हा आहे की कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं हा खरोखरचं राज ठाकरेंसमोर पर्याय आहे का? आघाडीत जाणं हा राज ठाकरेंसाठी वाढीचा पर्याय असू शकतो की आत्मघाताचा? सततच्या पराभवानंतर त्यांना आवश्यक असणारा तो आघात असू शकतो की अन्य कोणताही पर्याय नसल्यानं केलेली अपरिहार्य तडजोड?
 
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर घणाघाती टीका करून राज ठाकरेंनी त्यांच्या भाजपविरोध तर जाहीर केलेलाच आहे. पण त्याअगोदर झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर प्रखर टीका करून आपण या चारही पक्षांपेक्षा वेगळे असल्याचा दावा कायम केला होता. आपलं हे स्वतंत्र अस्तित्व राज ठाकरे सोडून देतील का?
 
हे समोर दिसतं आहे की विधानसभा निवडणूक ही `मनसे`साठी अस्तित्वाची लढाई आहे. राजकारणात कोणीही नामशेष होत नाही, पण सततचे पराभव राजकीय अस्तित्वाची परिणामकारता कमी करतात. लोकसभेच्या प्रचारात प्रचंड गर्दी खेचणाऱ्या सभा राज ठाकरेंनी केल्यावरही निकालांवर त्याचा कोणताही परिणाम न दिसणं हे त्याचंच लक्षण आहे. पण ती स्थिती मनसेला परत नको असेल. त्यासाठीच सगळ्या शक्यता ते पडताळून पाहताहेत. त्यातली एक शक्यता कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं ही आहे.
 
पहिला मुद्दा हा की मनसे आघाडीत गेल्यानं त्यांच्या स्वत:च्याच मतदारांमध्ये एक हिस्सा तयार होईल की, आघाडी आणि मनसे मिळून युतीविरोधातला नवा वर्ग तयार होईल? हे निरिक्षण कायम नोंदलं गेलं की राज ठाकरेंना कायम पारंपारिकदृष्ट्या जी शिवसेना आणि भाजपाची मतं होती तीच मिळाली. सुरुवातीला त्यांचं राजकारण शिवसेनेविरोधातल्या भावनिक मुद्द्यावर उभं राहिलं.
 
पण त्यानंतर जे शहरी मध्यमवर्गीय असे भाजपाचे मतदार आहेत, विशेषत: पुणे-मुंबई-नाशिक या त्रिकोणातले, तेही राज ठाकरेंकडे वळाले. त्याचा परिणाम २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही दिसला. त्याच्या अलिकडे-पलिकडे तीनही शहरांतल्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही ते पहायला मिळालं.
 
२०१४ पासून जेव्हा नरेंद्र मोदींच्या भाजपची राज्यातली विजयी घोडदौड सुरु झाली, तेव्हापासून राज यांचं अपयश वाढतच गेलं. शिवसेनेकडून `मनसे`कडे गेलेला मतदारही परतला. ज्या निवडणुका मनसेनं लढवल्या आणि यश मिळवलं, त्याचा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या मतांवर परिणाम झाला नव्हता. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी-मनसे ही युती बेरजेची ठरेल, पण राज यांच्यासाठी किती फायद्याची ठरेल यावर निर्णय अवलंबून असेल.
 
आघाडीसोबत जाणं हा एकमेव पर्याय
"आघाडीसोबत जाणं हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो," असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात.
 
"लोकसभा निवडणुकीत त्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे राज यांना युतीकडे कोणतीही जागा राहिली नाही आहे आणि स्वतंत्रपणे लढून फारसं काही पदरी पडणार नाही. राजकारणाचं आता इतकं ध्रुविकरण झालं आहे की तिसरी स्पेस आता शिल्लक राहिलेली नाही. जी वंचित बहुजन आघाडीनं आतच्या निवडणुकीत निर्माण केली तीच एकमेव तिसरी स्पेस आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका आघाडीत सहभागी होणं हाच पर्याय त्यांच्या समोर आहे. युतीकडे जाणारे पर्याय त्यांना उपलब्धही नव्हते आणि आता बंदही करून टाकले आहेत. त्यामुळे आता आघाडीत जाऊन भाजपाविरोधी मतांमध्ये वाटेकरी होणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे," देशपांडे म्हणतात.
 
पण आघाडीसोबत गेल्यानं राज यांना किती जागा मिळणार आहेत? शिवाय, कोणत्या मुद्द्यांवर ते जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतील हाही एक प्रश्न आहेत.
 
आघाडीत जर राज ठाकरे गेले तर त्यांना कमी हिस्सा मिळेल, याबाबत 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणतात.
 
"कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनंतर ते तिसऱ्या क्रमांकावर असतील. त्यांना मिळणाऱ्या जागा या दोन्ही पक्षांचं जागावाटप झाल्यावर ज्या उरतील त्याच असतील आणि बहुतांशानं त्या जिथं शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत त्याच जागा दिल्या जातील. या त्याच जागा असतील जिथे वर्षानुवर्षं कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येत नाही.
 
त्यामुळे कमी जागांमध्ये जास्तीत जास्त रिझल्ट आपण द्यायचा हाच पर्याय त्यांच्यासमोर उरेल. शिवाय जो आघाडीचा असा जाहीरनामा असेल तोच त्यांना मानावा लागेल. जे त्यांना हवे असलेले मुद्दे आहेत पण कॉंग्रेस वा राष्ट्रवादीला ते अडचणीचे आहेत त्यांच्यावर त्यांना मर्यादा घालावी लागेल. पण या निवडणुकीत कोणीतरी आपल्याबरोबर आहे हा आधार मात्र त्यांना मिळू शकतो," प्रधान म्हणतात.
 
आघाडीसोबत गेले तर आहे ते पदरात पाडून घेणं हे मनसेसाठी पक्ष म्हणून सोयीस्कर असणार नाही.
 
"विशेषत: शहरी भागात, त्यातही मुंबईत `राष्ट्रवादी`चं अस्तित्व फारसं नाही. ठाणे जिल्ह्यातला थोडाफार भाग सोडला, जिथला त्यांचा प्रभाव आता कमी झाला आहे, तर बाकी ठिकाणी जिथं `मनसे`चं केडर अजून आहे तिथं आघाडीकडून त्यांना काही जागा सुटल्या, तर ती मतं त्यांना मिळू शकतील. तसंच राजकारण राज यांना करावं लागेल," अभय देशपांडे म्हणतात.
 
मुंबई, नाशिक, पुणे आणि ठाणे या भागांत जिथे मनसेला गेल्या निवडणुकांमध्ये मतं मिळाली आहेत, जिथे त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आले आहेत तिथे त्यांचा दावा प्रबळ असेल. केवळ शिवसेनेची मतं आघाडीकडे ओढू शकणारा पक्ष असा त्यांचा वापर मनसे कसा होऊ देत नाही हेही पहावं लागेल.
 
स्वतंत्र अस्तित्व पणाला लागेल का?
पण जर आघाडीसोबत गेले तर राज ठाकरे मनसेचं आजही जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते पणाला लावतील का? राज ठाकरे यांनी कायम भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर टीका करत आपला पक्ष, आपलं व्हिजन त्यांच्यापेक्षा वेगळं आहे हे सांगितलं आहे. कायम आपल्या हाता पूर्ण सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी कायम केलं आहे. कोणत्याही राजकीय युतीत ते पक्षस्थापनेपासून पडले नाहीत. त्यांच्या याच मांडणीमुळे त्यांना यापूर्वी घवघवीत यशही मिळालं आहे. आता जर ते परिस्थिती तशी आहे म्हणून आघाडीत गेले तर हे वेगळेपण ते कायमचं घालवून बसतील का?
 
"आघाडीसोबत गेल्यानं त्यांचं स्वत:चं अस्तित्व जे आहे त्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही," अभय देशपांडे म्हणतात.
 
"शिवसेना युतीत २० वर्षं राहिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आणि जागाही घेतल्या. त्यामुळे आघाडीत किंवा युतीत राहून आपलं पूर्ण अस्तित्व हरवतं असं नाही. तसं असतं तर गेल्या निवडणुकीत शिवसेनेला जागाच मिळाल्या नसत्या. आघाड्यांच्या राजकारणात स्वत:ची स्पेस ठेवता येते," देशपांडे पुढे म्हणतात.
 
"त्यांनी जर स्वतंत्र अस्तित्व राखायचं असं म्हणून एकट्यानं निवडणुका लढल्या तर त्यातून फारसं काही हाती लागेल असं मला वाटत नाही. लोकसभेचे निकाल विधानसभेत तसेच्या तसे परत दिसतील हे मानायला मी तयार नाही. जसं मोदींकडे बघून आता मतदान झालं तसं फडणवीसांकडे बघून ते होणार नाही.
 
पण जसं आणीबाणीनंतर `कॉंग्रेसविरोध` या एका मुद्द्यावर अनेक पक्ष एकत्र आले तसं आता `भाजपविरोध` या एका मुद्द्यावरच सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर आता आघाडीमध्ये येणं हे राज ठाकरेंसाठी यासाठी फायद्याचं असेल की लोकांसमोर एकजिनसी समर्थ असा पर्याय उभा राहू शकतो. जर हे सगळे वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा युतीलाच होणार आहे. ते एकमेकांचीच मतं कापतील," संदीप प्रधान म्हणतात.
 
पण राज ठाकरेंना हेही पहावं लागेल की लोकसभा निवडणुकीत दिसलेलं जनमत हे जेवढं मोदी आणि भाजपाच्या बाजूचं होतं, तेवढंच ते राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातही गेलं आहे. ते केवळ या लोकसभा निवडणुकीत दिसलं नाही, तर गेल्या चार वर्षांमध्ये राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांमध्ये दिसलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांवर असलेल्या या नाराजीचा हिस्सा, जर तो विधानसभेच्या निवडणुकीत कायम राहिला तर, आघाडीत गेल्यावर राज ठाकरेंनाही आपल्या पदरात घ्यावा लागेल.
 
पण हेही महाराष्ट्रानं पाहिलं आहे की, आता शरद पवार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जवळ गेलेले राज ठाकरे हे एकेकाळी नरेंद्र मोदींच्याही जवळ गेले होते. त्यांचं कौतुक करत होते. नितीन गडकरींचेही ते निकटवर्तीय मानले जायचे. भाजपशी एकेकाळी असलेल्या जवळीकीचं राजकीय फलित मात्र काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे राज ठाकरे आता आपल्या राजकारणाची दिशा बदलत आहेत का, असंही पाहिलं जात आहे.
 
राजकीय भवितव्याचा प्रश्न
"२००७ पासून २०१२ पर्यंत, म्हणजे पक्षस्थापनेपासून पुढची पाच वर्षं, त्यांना जे मिळालं होतं ते सगळं पुढच्या काळात गेलं. २०१४ नंतरच्या राजकारणात त्यांना कुठे तरी जाणं भाग होतं. २०१२च्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी गुजरातचा दौरा करून मोदींची खूप स्तुती केली. पण त्याचा म्हणावा तेवढा फायदा त्यांना झाला नाही. सेना-भाजपाची सत्ता परत आली.
 
आता शिवसेना भाजपाची युती झाली, त्यांनी एकत्र लोकसभेच्या निवडणुकाही लढवल्या आणि विधानसभेच्याही ते एकत्र लढवतील. त्यामुळे ऐन विधानसभेच्या निवडणुकीवेळेस भूमिका घेण्यापेक्षा, राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक आपली भूमिका बदलण्यासाठी वापरली. त्यांच्यामुळे आघाडीच्या जागा किती निवडून आल्या, मतं किती ट्रान्सफर झाली यापेक्षा राज हे त्या बाजूचे या बाजूला येऊन बसण्यात यशस्वी झाले हे नक्की," अभय देशपांडे म्हणतात.
 
पण केवळ विधानसभेच्या निवडणुकीचाच नव्हे तर त्यापुढच्या राजकीय भवितव्याचाही प्रश्न राज यांच्यासमोर आहे. जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा त्याच्या अगोदर कित्येक वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही नवीन पर्याय नव्हता. एका प्रकारची निर्वात पोकळी निर्माण झाली होती. बंडखोर म्हणून आलेले, प्रस्थापित झाले होते. राज यांनी ते नेमकं हेरून आपल्या पक्षाची संकल्पना मांडली, रचना केली. त्याचं त्यांना फळ पक्षस्थापनेनंतर लगेचच मिळालं.
 
आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात तशीच राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. जे जुने प्रस्थापित होते, ते विरोधी पक्षांमध्ये गेले आहेत. पण त्यांना पर्याय म्हणून स्वीकारलं जात नाही आहे. ते विश्वासार्हतेसाठी लढताहेत. ती पोकळी भरण्याची राज यांना संधी आहे.
 
त्याच्या बाजूने आलेल्या मतदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी राजही लढताहेत, पण अजूनही तिसरा पर्याय म्हणून त्यांनी स्थापनेच्या वेळेस निर्माण केलेला दावा अद्यापही जिवंत आहे. जर आता ते आघाडीत गेले आणि त्याच प्रस्थापितांसोबत बसले तर त्यांच्या तो दावा कायमचा संपेल का असा प्रश्नही आहे.
 
जर ते स्वतंत्र अस्तित्व आणि दावा तसा ठेवायचा असेल तर सध्या तरी राज ठाकरे यांच्या व्यक्तिगत करिष्म्याशिवाय कोणतंही भांडवल मनसेकडे नाही. पण बहुमताच्या सरकारांसोबत सध्याचा काळ व्यक्तिगत करिष्म्याचाही आहे. देशात आणि बहुतांश राज्यांमध्ये ते दिसतं आहे.
 
महाराष्ट्रात युती देवेंद्र फडणवीसांचं नाव आणि चेहरा पुढे करून लढणार हे निश्चित आहे. विरोधात इतर कोणताही चेहरा नाही. असला तरी त्यावर एकवाक्यता नाही. ही व्यक्तिकरिष्म्याची लढाई मनसे खेळेल का? ती खेळायची असेल तरी अर्थात संघटन उभं करावंच लागेल. प्रश्न इतकाच आहे की राज कोणतं पिच खेळण्यासाठी निवडतात. करिष्मा दाखवण्याचं की तूर्तास अस्तिवाच्या लढाईसाठी आघाडीच्या तडजोडीचं.