शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (10:10 IST)

Rishi Sunak : नारायण मूर्तींचे जावई बनले ब्रिटनचे अर्थमंत्री

ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. पाकिस्तानी वंशाचे अर्थमंत्री साजिद जाविद यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
39 वर्षीय ऋषी सुनक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
 
ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरीस जॉनसन यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळात आता भारतीय वंशाच्या तिघांना महत्त्वाच्या विभागाची मंत्रिपदं मिळाली आहेत.
 
प्रिती पटेल आणि आलोक शर्मा हे दोन भारतीय वंशाचे ब्रिटीश नागिरकसुद्धा जॉनसन यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदावर आहेत.
 
47 वर्षांच्या प्रिती पटेल यांना पंतप्रधान जॉन्सन यांनी गेल्या वर्षीच ब्रिटनच्या गृह खात्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळीसुद्धा पंतप्रधान जॉन्सन यांनी साजिद जाविद यांच्याकडून गृहखातं काढून घेत प्रिती पटेल यांना गृहमंत्री केलं होतं.
 
तर मूळचे आग्र्याचे असलेले आलोक वर्मा यांना नव्या मंत्रिमंडळात व्यवसायविषयक मंत्री (बिझनेस सेक्रेटरी) करण्यात आलं आहे.
 
ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाचे 15 खासदार निवडून गेले होते.
 
ऋषी सुनक कोण आहेत?
ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक गेल्या वर्षी रिचमंडमधून (यॉर्क्स) दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले.
 
ते सरकारमध्ये ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं होतं.
 
त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मसी चालवायच्या. त्यांची पत्नी अक्षता इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.
 
अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.
 
ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या आजी-आजोबांसोबत ब्रिटनला गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.
 
त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.
 
राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सैशेमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती.
 
साजिद जाविद यांचे पंतप्रधानांशी मतभेद
माजी अर्थमंत्री साजिद जाविद आणि पंतप्रधानांचे सल्लागार डॉमिनिक कमिंग्ज यांच्यात तणाव सुरू होता आणि म्हणूनच साजिद जाविद यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं.
 
साजिद जाविद यांच्याशी संबंधित सूत्राने सांगितलं, "त्यांनी अर्थमंत्री हे पद सोडलं. पंतप्रधानांनी त्यांना आपल्या सर्व विशेष सल्लागारांना काढून पंतप्रधान कार्यालयातील विशेष सल्लागारांना नियुक्त करण्यास सांगितलं होतं. मात्र, स्वाभिमान जागृत असलेला कुठलाही मंत्री असं करणार नाही, असं साजिद जाविद यांनी म्हटलं होतं."
 
साजिद जाविद यांच्या राजीनाम्यावर लेबर पक्षाचे खासदार मॅकडोनल्ड म्हणाले, "सत्तेत आल्यावर दोनच महिन्यात संकटात सापडलेल्या सरकारचा हा एक ऐतिहासिक विक्रम असेल. डॉमिनिक कमिंग्ज यांनी अर्थ मंत्रालयाचं संपूर्ण नियंत्रण मिळवण्याची लढाई जिंकली आहे, हे स्पष्ट दिसतंय."
 
प्रिती पटेल आणि आलोक शर्मा
गृहमंत्री प्रिती पटेल यांचा जन्म लंडनमधलाच. त्यांचे आई-वडिल मूळ गुजरातचे आहेत. मात्र, गुजरातहून ते युगांडाला गेले.
 
प्रिती पटेल गेल्या वर्षी जुलैमध्ये ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या पहिल्या गृहमंत्री बनल्या.
 
बोरीस जॉनसन यांचे नवे बिझनेस मंत्री आलोक शर्मा पूर्वी याच सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय विकास मंत्री होते.
 
51 वर्षांचे आलोक शर्मा यांचा जन्म आग्र्यात झाला. मात्र, ते पाच वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील ब्रिटनच्या रेडिंगला गेले होते.
 
आलोक शर्मा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. राजकारणात येण्यापूर्वी तब्बल 16 वर्ष ते बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत होते.