सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (17:20 IST)

स्लीप पॅरालिसिस : झोपेत छातीवर भूत बसल्यासारखं का वाटतं?

- ल्यूक मिन्झ
स्लीप पॅरालिसिस म्हणजेच झोपेतून अचानक जागी होऊन चित्रविचित्र आकार, भूत-प्रेत यांच्याशी संबंधित भास तुम्हाला होतात का?
 
कधी-कधी झोपेतून जागी झालो तरी आपण तंद्रीत असतो. म्हणजे, आपण उठलो आहोत हे आपल्याला जाणवतं, पण तरीही आपण उठू शकत नाही, कोणतीही हालचाल करू शकत नाही, कुणीतरी छातीवर बसलं आहे, असं वाटतं.
 
अशा स्थितीत आजूबाजूला काय चाललं आहे, याची त्यांना कल्पना नसते. पण काही वेळानंतर ते जागे होतात.
 
ही स्थिती कशामुळे अनुभवयास मिळते, या मागची कारणे नेमकी काय आहेत, या प्रश्नावर सध्या बरंच संशोधन सुरू आहे.
 
किशोरवयात असताना मला पहिल्यांदा हा अनुभव आला होता. शाळेत जायला काही वेळ होता. मी उठलो आणि दुसऱ्या बाजूला वळण्याचा प्रय्तन केला. परंतु, माझ्या शरीराने सहकार्य केलं नाही. मला माझ्या पायाला अर्धांगवायू झाल्यासारखं त्यावेळी वाटलं.
 
माझं बेडरूम मला एखाद्या तुरुंगाप्रमाणे त्यावेळी वाटलं. मी घाबरून चिंताग्रस्त झालो. तब्बल 15 सेकंद माझं शरीर हलत नव्हतं.
 
याविषयी मी बराच विचार केला, अखेरीस काही दिवसांनी मला त्या स्थितीबाबत माहिती मिळाली.
 
माझ्यासोबत त्यादिवशी जे घडलं त्याला 'निद्रा परावतम' असं संबोधलं जातं. म्हणजेच स्लीप पॅरालिसिस. ही स्थिती प्रामुख्याने झोपेच्या वेळी जास्त उद्भवते.
 
अशा स्थितीत माझा मेंदू कार्यरत असतो, पण शरीर निष्क्रिय असल्याप्रमाणे वाटतं. यादरम्यान शरीर तात्पुरतं कडक होतं.
 
मला असं झाल्यानंतर सुरुवातीला भीती वाटली, पण 2-3 दिवसांत त्यातून मी सावरलो. यानंतर पुढे मला अनेक वेळा ते अनुभवायला मिळालं.
 
‘गंभीर परिणाम होऊ शकतो’
स्लीप पॅरालिसिसचाही आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही लोकांना यामुळे भाससुद्धा होतो.
 
या समस्येने त्रस्त असलेल्या 24 वर्षीय व्हिक्टोरियाने सांगितले की, ती 18 वर्षांची असताना पहिल्यांदा तिच्यासोबत असं घडलं होतं.
 
ती म्हणते, “मी उठले पण माझं शरीर हलत नव्हतं,"
 
“मला अचानक पडद्यामागे काही भुताटकी आकार दिसू लागले. हा आकार हळूहळू माझ्या छातीत घुसला, यानंतर एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं मला वाटलं. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं घडत असताना मला ओरडताही येत नव्हतं. हे सगळं खरोखरच घडत आहे असं मला त्यावेळी वाटत होतं,” व्हिक्टोरिया म्हणते.
 
स्लीप पॅरालिसिसदरम्यान काहींना एलियन, घरातील अज्ञात घुसखोर यांच्यासह अगदी मृत नातेवाईकांचे भास होतात.
 
अशा स्थितीत त्यांना त्यांच्या शरीराचे काही भाग हवेत तरंगताना दिसतात, काही लोकांना पलंगाच्या अवतीभोवती आवरण निर्माण झाल्यासारखं वाटतं. काहींना तर पऱ्या दिसतात. काही लोकांना आपण यावेळी भगवंताच्या प्रभावाखाली आहोत, असं वाटू लागतं.
 
संशोधकांच्या माहितीनुसार, “पूर्वीच्या काळी चेटकिणींच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यामागे असे भ्रमदेखील असू शकतात. अशा प्रकारच्या भासांमुळेच आधुनिक काळातही एलियनने आपलं अपहरण केलं होतं, असं काहीजण बोलत असतात.”
 
तुटपुंजं संशोधन
शास्त्रज्ञांच्या मते, “स्लीप पॅरालिसिस हा फार पूर्वीपासून मानवी जीवनाचा भाग राहिलेला आहे. साहित्यामध्येही याबाबत चर्चा करण्यात आली आहे. मेरी शेली यांच्या 'फ्रँकेन्स्टाईन' या कादंबरीतील एक प्रसंग स्लीप पॅरालिसिस पेंटिगपासून प्रेरित आहे.”
 
मात्र, स्लीप पॅरालिसिसवर फारच तुटपुंज्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. अलीकडेपर्यंत कुणीही याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण गेल्या 10 वर्षांपासून या विषयाबाबत उत्सुकतेने अभ्यास केला जात आहे, असं बालंद जलाल म्हणाले.
 
जलाल हे हार्वर्ड विद्यापीठात झोपेवर संशोधन करत आहेत.
 
वेगवेगळ्या पद्धतींद्वारे स्लीप पॅरालिसिवर उपचार करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी नुकतेच पहिली वैद्यकीय चाचणी पूर्ण केली. 2020 मध्ये त्यांनी हे संशोधन पूर्ण केलं.
 
ते स्लीप पॅरालिसिसवर अत्यंत सखोल संशोधन करत आहेत. या स्थितीची कारणे काय आहेत आणि त्याचा परिणाम काय आहे? त्यांनी ते नीट जाणून घेण्याचा दलाल यांनी प्रयत्न केला.
 
शिवाय, या परिस्थितीचा संबंध मेंदूशी कशा प्रकारे जोडलेला आहे, हेसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
 
जगात स्लीप पॅरालिसिसने कितीजण ग्रस्त आहेत, यावर कुणाचंही एकमत नाही.
 
सेंट मेरी कॉलेज ऑफ मेरीलँड येथील व्हिजिटिंग सहयोगी प्राध्यापक ब्रायन शार्पलेस यांनी याविषयी बोलताना म्हटलं, की आम्ही या आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी गेल्या दहा वर्षातील संशोधनांचा आढावा घेतला.
 
ब्रायन हे स्लीप पॅरालिसिस: हिस्टोरिकल, सायकोलॉजिकल अँड मेडिकल पर्स्पेक्टिव्स' या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत.
 
ते सांगतात, “त्यासाठी आतापर्यंत पाच दशकांतील 35 संशोधनांचा आढावा घेण्यात आला. सर्व अभ्यासांमध्ये 36 हजारांपेक्षा जास्त क्लिनिकल विषयांचा समावेश आहे.
 
ब्रायन यांच्या अभ्यासात आढळून आलं की या स्थितीने ग्रस्त असलेल्यांची संख्या पूर्वीपेक्षा काही वाढली आहे.
 
सुमारे 8% प्रौढांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी या स्थितीचा अनुभव आला आहे. हे प्रमाण विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी (28 %) तर (28%) आणि मनोरुग्णांमध्ये (32%) अधिक आहे.
 
ब्रायन शार्पलेस म्हणतात, " आपण विचार करतो तितकं हे दुर्मिळ नाही."
 
बालंद जलाल यांच्या मते, “स्लीप पॅरालिसिसबाबत अनेकांचा असा विश्वास असतो की असं घडण्यामागचं कारण दैवी शक्ती आहे. पण प्रत्यक्षात याचं कारण अगदी साधं असू शकतं.
 
ते म्हणतात, “आपल्या रात्रीच्या झोपेच्या चार अवस्था असतात. अंतिम टप्प्याला रॅपिड आय मूव्हमेंट (REM) स्लीप म्हणतात. याच टप्प्यावर आपल्याला स्वप्ने पडतात. REM टप्प्यात मेंदू आपलं शरीर गोठवतो. स्वप्नात आपण जे काही पाहतो, त्यादरम्यान आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून कदाचित मेंदूने घेतलेला हा एक सावधगिरीचा उपाय आहे.”
 
“परंतु, कधी कधी REM स्थितीतून मेंदू लवकर बाहेर येतो. मात्र, हे असं का घडतं, याविषयी शास्त्रज्ञांना पुरेशी माहिती नाही. याच प्रक्रियेदरम्यान आपण झोपेतून उठतो. मात्र, मेंदूचा खालचा भाग REM अवस्थेत कायम असतो. दुसरीकडे शरीर स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक ते न्यूरोट्रान्समीटर पाठवत राहतो. या अवस्थेत मेंदूचे काही भाग सक्रिय होतात. याचा अर्थ तुमचा मेंदू कार्य करतो, परंतु शारीरिकदृष्ट्या तुम्ही निष्क्रिय असता, ” बालंद जलाल म्हणाले.
 
मी 20 वर्षांचा असताना दर दोन-तीन दिवसांना मला 'स्लीप पॅरालिसिस' व्हायचा. पण तरीही माझ्या आयुष्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. खरं तर या स्थितीबाबत माझ्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना सांगणं, ही माझ्यासाठी त्यावेळी मनोरंजक गोष्ट होती. त्यामुळे या दृष्टिकोनातून माझा अनुभव अगदी सामान्य आहे.”
 
ऑक्सफर्ड विद्यापीठातील झोपेच्या औषधाचे प्राध्यापक कॉलिन एस्पी म्हणतात, "या स्थितीतील बहुसंख्य लोकांसाठी ही थोडी विचित्र भावना आहे. हा प्रकार म्हणजे झोपेत चालण्याची सवय असल्यासारखा आहे. म्हणजे त्या व्यक्तींना हा गंभीर आजार आहे, असं वाटत नाही. मात्र, इतरांसाठी ते त्रासदायक असतं. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम.”
 
नार्कोलेप्सी
काही गंभीर प्रकरणांमध्ये स्लीप पॅरालिसिसवेळी जाणवणारी स्थिती ही नार्कोलेप्सी नामक आजारात दिसून येणाऱ्या लक्षणांपैकी एक मानली जाते.
 
नार्कोलेप्सी हा झोपेसंदर्भात एक गंभीर आजार आहे. यामध्ये मेंदू आपली झोप आणि चालणं यांच्या गंभीर विकार आहे. यामध्ये आपला मेंदू आपली झोप आणि जागी होणं यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
 
परिणामी, हा आजार असलेल्या लोकांना झोपेतून उठल्यानंतर काही वेळाने पुन्हा थकवा जाणवतो, दिवसभर त्यांना झोप येत असते. पुरेशी झोप न झाल्याने हे परिणाम दिसून येतात.
 
स्लीप पॅरालिसिससुद्धा पुरेशी झोप न मिळाल्याने होतो, असं डॉक्टरांचे म्हणणे आहे.
 
स्लीप पॅरालिसिसवरचा उत्तम उपचार म्हणजे याबाबत जागरुकता पसरवणे हा आहे. रुग्णांना या स्थितीच्या कारणांबद्दल सांगितले पाहिजे. ते धोकादायक नाही, याचा विश्वास त्यांना द्यायला हवा.
 
स्लीप पॅरालिसिसवर उपचार म्हणून कधी कधी ध्यानधारणा करण्यास सांगितलं जातं. झोपायला जाण्यापूर्वी काळजी-विचार कमी करणं, ही स्थिती उद्भवली तर घाबरून न जाता शांत पडून राहणं, असे काही उपाय याबाबत सांगितले जातात.
 
तर, प्रकरण गंभीर असल्यास औषधंही देण्यात येतात. सामान्यतः नैराश्यावर वापरली जाणारी काही औषधे यादरम्यान दिली जातात.
 
स्लीप पॅरालिसिस गंभीर कधी बनतो?
स्लीप पॅरालिसिसदरम्यान जेव्हा भास होऊ लागतात, ती स्थिती सर्वाधिक गंभीर मानली जाते.
 
अचानक कधीही रात्री हा भास होऊ शकतो आणि आपली घाबरगुंडी उडते.
 
त्याचवेळी स्लीप पॅरालिसिस मानवी मेंदूबाबत काही रंजक तथ्यही समोर आणतो.
 
उदा. स्लीप पॅरालिसिस होतो, तेव्हा तुमच्या मेंदूतील मोटर कॉर्टेक्स शरीराला हालचाल करण्यासाठी सिग्नल पाठवतं. पण शरीरातील नसा अर्धांगवायू झाल्यामुळे मेंदूकडे परत येण्याचे संकेत मज्जातंतूंकडून मिळत नाहीत.
 
येथे एक प्रकारचं असंतुलन आहे. आपण जे विचार करतो त्याची जाणीव तुटलेली आणि विस्कटलेली असते,” बालंद जलाल म्हणाले.
 
अशा स्थितीत मेंदू ‘रिक्त जागा भरतो’ आणि मज्जातंतू का हलत नाहीत याची स्वतःची समज तयार करतो.
 
म्हणूनच या परिस्थितीत अनेकदा असा भ्रम होतो की कुणीतरी तुमच्या छातीवर बसून तुमच्या शरीरावर दबाव टाकत आहे.
 
युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या गोल्डस्मिथ कॉलेजमधील अनोमॅलिस्टिक सायकोलॉजी रिसर्च युनिटचे प्रमुख ख्रिस्तोफर फ्रेंच यांनी याबाबत एक संशोधन केलं आहे.
 
ख्रिस्तोफर यांनी स्लीप पॅरालेसिसमुळे भ्रमात असलेल्या लोकांशी बोलण्यात, दरम्यान त्यांचे रेकॉर्डिंग करण्याच्या संशोधनात दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ घालवला आहे.
 
यादरम्यान, भीतीदायक काळी मांजर पाहणे, झाड छातीवर पडणे, असे भास झाल्याचं संबंधितांनी सांगितलं.
 
स्लीप पॅरालिसिसवरील संस्कृतीचा प्रभाव
शिवाय, अशा स्थितीत आजूबाजीच्या सांस्कृतिक वातावरणाचाही यावर परिणाम होऊ शकतो.
 
कॅनडातील नागरिकांनी माझ्या छातीवर एक ‘वृद्ध स्त्री’ बसल्याचं म्हटलं, तर मेक्सिकन म्हणतात की त्यांच्या छातीवर ‘एक मृतदेह’ बसलेला आहे.
 
तसंच सेंट लुसियामध्ये बाप्तिस्मा न झालेल्या लहान बालकांना झोपेत गुदमरल्यासारखं वाटतं असं म्हटलं जातं.
 
तुर्की लोकांच्या मते, झोपेत त्यांना 'करबसन' नामक भूतासारखा प्राणी दिसतो. तर इटालियन लोकांना स्लीप पॅरालिसिसदरम्यान चेटकिणीचा भास होतो.
 
बालंद दलाल म्हणतात, “जे लोक अलौकिक शक्तींवर विश्वास ठेवतात आणि त्यांना घाबरतात त्यांना स्लीप पॅरालिसिसची अधिक भीती असते. हीच भीती स्लीप पॅरालिसिसची स्थिती वारंवार घडणाऱ्या घटनांचं कारण ठरते.”
 
ते पुढे म्हणतात, “तुम्ही खूप चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त असाल तर तुमचं झोपेचं चक्र बिघडतं. स्लीप पॅरालिसिसची शक्यता यामुळे वाढते. उदा. परिसरात एखादा प्राणी आहे, तो रात्री हल्ला करतो, असं तुम्हाला कुणीतरी सांगितलं. तर अशा वेळी तुम्हाला भीती वाटत नाही का? या भीतीने तुम्ही रात्री जास्त सक्रिय असता. भीतीशी संबंधित मेंदूचे काही भाग यादरम्यान अतिक्रियाशील असतात. अशा स्थितीत झोपेच्या REM च्या टप्प्यात तुम्हाला तोच प्राणी आला आहे की काय, असं वाटू लागतं.”