रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (11:10 IST)

सोनिया गांधी: उद्धव ठाकरे ते करुणानिधी – अशी बांधली वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांची मोट

- राशीद किडवई
9 डिसेंबर... काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जन्मदिन. आज वयाची 74 वर्षं पूर्ण करणाऱ्या सोनिया गांधी यांच्यासमोर आजघडीला सर्वात मोठं आव्हान आहे ते काँग्रेस परिवाराला एकसंध ठेवण्याचं आणि धगधगत्या विस्तवाचं एकप्रकारे पालकत्व सांभाळण्याचं.
 
2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. तरीदेखील पक्षात मोठी फूट पडण्यापासून काँग्रेसला वाचवण्यात त्यांना यश आलं. सोनिया गांधी यांचं मौन, अत्यंत हुशारीने आणलेली निष्क्रियता आणि देशभरातील 400हून अधिक प्रभावी काँग्रेस नेत्यांनी त्यांचा केलेला स्वीकार, या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरल्या.
 
महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय सोपा नव्हता. राहुल गांधी, ए. के. अँटोनी, डॉ. मनमोहन सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा या निर्णयाला 'स्वाभाविक' विरोध होता.
 
मात्र, खऱ्या राजकीय अर्थाने सोनिया गांधी यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. खरंतर भाजपला वाटलं होतं की काँग्रेस वैचारिक पेचात अडकून आणि शरद पवारांच्या 'दूसरा' टाकण्याचा ट्रॅक रेकॉर्डमुळे ही आघाडी प्रत्यक्षात येणार नाही.
 
मात्र, सोनिया गांधी फोकस्ड होत्या. काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाऊ नये, यासाठी उदारमतवादी डावे दबाव टाकत होते. तर दुसरीकडे ही आघाडी करणं सद्यपरिस्थितीची गरज आहे, यावर आघाडीतले मित्रपक्ष भर देत होते.
 
अशावेळी सोनिया गांधी दोन्ही बाजूंशी बोलत होत्या, सातत्याने चर्चा करत होत्या. अधिकाधिक सल्लामसलत करण्याच्या जपानी कार्यशैलीवरचा त्यांचा भर सार्थकी लागला आणि त्यांनी सर्वांमध्ये एकमत घडवून आणलं. यानिमित्ताने सोनिया गांधी यांच्या कार्यशैलीचा मोठा धडा राहुल गांधींना मिळाला.
 
काँग्रेसमध्ये जवळजवळ एकमताने हेही म्हटलं जातं की जर राहुल गांधी यांनी या वाटाघाटी केल्या असत्या तर शिवसेनेसोबत आघाडी करणं त्यांना शक्यच झालं नसतं. आणि तसं झालं असतं तरी कदाचित महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असती.
 
मात्र महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससोबत अशक्य वाटणारी महाविकास आघाडी स्थापन करून सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्या किती मुरलेल्या राजकारणी आहेत.
 
त्यांनी आधी भाजपला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या पर्यायाची चाचपणी करण्यासाठी पुरेसा वेळ घेऊ दिला. त्याच वेळी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून त्यांना हेदेखील कळत होतं की महाराष्ट्रात निवडून आलेल्या प्रत्येक काँग्रेस आमदाराची महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. शिवसेनेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला असता तर महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षात बंडाळी होण्याची दाट शक्यता होती.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळपास महिनाभर सुरू असलेल्या चर्चेवर नजर टाकली तर एक रंजक कथानक दिसून येतं. सोनियांची वैचारिक लवचिकता आणि ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल आणि 'केरळ लॉबी'मधील इतर नेत्यांची सहमती मिळवण्याची त्यांचं कसब पाहून नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नसेल.
 
इतकंच नाही तर, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या या गाडीत काँग्रेस इतक्या सहजपणे स्वार झाली की, एकीकडे उद्धव आणि आदित्य ठाकरे व दुसरीकडे राज्यातील काँग्रेस नेते यांच्यात काही पडद्यामागच्या गोष्टी आधीच तर ठरल्या नव्हत्या ना, असा प्रश्न पडावा.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आणि निवडणुकीपूर्वीदेखील शिवसेना अगदीच भाजपच्या विरोधात होती. काँग्रेस मात्र मिलिंद देवरा-संजय निरुपम यांच्यातील वादामुळे मुंबई महानगरात पूर्णपणे निष्क्रीय असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.
 
निर्णय प्रक्रियेत सोनिया गांधी नेहमी उशीर करतात असाही आरोप त्यांच्यावर होतो. महाराष्ट्रासंबंधीच्या ताज्या वाटाघाटीत त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
 
मात्र अनेक लोकांशी सल्लामसलत करण्याच्या जपानी पद्धतीचा प्रभाव आहे. राहुल गांधी आणि इतर राजकारण्यांचे निर्णय क्षणिक मोहाला बळी पडून घेतलेले असतात. आताही शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेताना त्यांनी अँटोनी आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या नेत्यांशी चर्चा केलीच, आणि मात्र त्यांनी मुस्लीम आणि इतर नेत्यांशीही चर्चा केली. त्याचा फायदा आज झालेला दिसतो.
 
सोनिया गांधी आता 'विदेशी बहु' या शिक्क्यापासून बरंच पुढे आल्या आहेत आणि त्यांच्यात राहुलच्या निर्णयांना बाजूला सारण्याची, NDAतर घटकपक्षांपर्यंत पोचण्याची आणि झटपट कृती करण्याची क्षमता आहे. आघाडीच्या राजकारणाच्या आजच्या काळात युती करणं, हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, हे तत्त्व त्या लगेच शिकल्या.
 
एक काळ होता जेव्हा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही पक्षांनी मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा दिला होता, आणि द्रमुक, अण्णाद्रमुक, काश्मिरातील PDP आणि नॅशनल कॉन्फरन्सने या सरकारच्या बाजूने मत दिलं होतं.
 
मात्र, मित्रपक्ष आणि त्यांचे नेते - जसे की शरद पवार, मायावती, स्टॅलिन, चंद्रबाबू नायडू - हाताळण्याचं त्यांचं कसब तर अटल बिहारी वाजपेयी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्याहूनही उत्कृष्ट असल्याचं यामुळे दिसून येतं.
 
अनेक वर्षांपूर्वी सोनिया गांधी आणि मुलायम सिंह यादव हे सोमनाथ चॅटर्जी यांच्या घरी एका भोजन समारंभात एकत्र आले होते. तेव्हा सोनिया या हिलसा मासा खात असताना मुलायम सिंह यादव म्हणाले, "मॅडम, जरा संभल कर. कांटे चुभ जाएंगे."
 
त्यावर क्षणाचाही विलंब न करता सोनिया म्हणाल्या, "मैं काटों से जूझना जानती हूं."
 
यातच दक्षिणेतील द्रमुक पक्षासोबत त्यांनी केलेल्या युतीचं उत्तर दडलंय. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची बाँबस्फोटाद्वारे हत्या घडवून आणणाऱ्या श्रीलंकेतील लिट्टे या कट्टरतावादी संघटनेविषयी द्रमुकला पुळका असल्याचा आरोप 1997 मध्ये काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी केला होता. मात्र 2004-2014 मध्ये सोनिया गांधी यांनी घटकपक्षांविषयी नवा दृष्टिकोन अंगीकारला आणि द्रमुकला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (UPA) सामावून घेतलं होतं.
 
याच DMKच्या ए. राजांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णयाचाही सोनिया गांधींना आणि काँग्रेसला फटका बसला. त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणीने निर्णय घेतल्यावर ए. राजांना मंत्रिमंडळात ठेवणं शक्य होणार नाही, हे करुणानिधींना कळवायला उशीर झाला. हे सगळं होण्यात अक्षम्य उशीर झाला आणि नंतर हे सगळं प्रकरण चिघळलं आणि भ्रष्टाचारी पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख निर्माण झाली हे वास्तव नाकारून चालणार नाही.
 
2008 साली अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्यांशी फारकत घेण्याचा निर्णय मात्र चांगलाच महागात पडला. या निर्णयाचे दुरगामी परिणाम झाले. जुलै 2008 मध्ये झालेल्या या घटनाक्रमात डाव्या पक्षांनी UPAचा पाठिंबा काढून घेतला तरी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. या घटनेमुळे पक्षावर असलेला नैतिकतेचा शिक्का पुसला गेला.
 
नंतर 2011 पासून मनमोहन सिंग सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लागले. त्यातून अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा उदय झाला आणि काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला.
 
शिवसेनेशी आघाडी करताना सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या मुस्लीम आणि अल्पसंख्याक पायाला धक्का न लावता, आपला पक्षाला सौम्य हिंदूवादी पक्ष म्हणून प्रोजेक्ट करण्याची तयारी दाखवली आहे.
 
राहुल गांधी यांनी 25 मे 2019 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळीदेखील सोनिया गांधी यांच्या निपुण निष्क्रियतेची प्रचिती आली होती. त्या मौन धारण करून होत्या आणि राहुल गांधी यांच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर करायला किंवा राहुल गांधी यांच्या जागी नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यासाठी पॅनल स्थापन करायला सातत्याने नकार देत होत्या.
 
काँग्रेस पक्षाला गेल्या अनेक दशकांच्या हायकमांड संस्कृतीची इतकी सवय झाली आहे की 'मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचं' धाडस कुणालाच करता आलं नाही. राहुल गांधींही आपल्या निर्णयावर अडून होते.
 
अखेर 9 ऑगस्ट रोजी 24 अकबर रोडवरच्या बंगल्यात झालेल्या बैठकीत 150 पैकी 148 काँग्रेस नेत्यांनी (काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष मिळून) गांधी घराण्यानेच पक्षाचे नेतृत्त्व करावं, असा कौल दिला, आणि सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा काँग्रेसची सूत्रं हाती घेतली.
 
झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी स्वतः 'हंगामी' अध्यक्षपदाचा त्याग करतील किंवा फेब्रुवारी 2020 पर्यंत नव्या अध्यक्षाची निवड करतील, असे संकेत मिळत आहेत. प्रतिस्पर्धी किंवा स्वतंत्र संघटनात्मक निवडणुकीअभावी राहुल गांधी 'पुनरागमन' करतील आणि आपला 'अपूर्ण अजेंडा' पूर्ण करतील, अशीच सर्वांना आशा आहे.
 
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नेहरू-गांधी घराण्यातील यापूर्वीच्या कुठल्याही अध्यक्षाच्या वाट्याला अपयश आलेलं नाही. सर्व प्रकारचे, सर्व स्तरांवरील काँग्रेसी नेते गांधी घराण्याकडेच पक्षाचं निर्विवाद नेतृत्व म्हणून बघतात. त्याबदल्यात त्यांच्याकडून निवडणुकीतील यश आणि सत्तेची स्वप्न बघतात. मे 2019 पासून सोनिया गांधी यांनी या स्वप्नाला अजूनतरी धक्का लागू दिलेला नाही.
 
काँग्रेस पक्षातील बहुतांश नेते आणि पक्षाविषयी सहानुभूती बाळगणारे सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याकडे आशेने बघतात. बाहेरून बघणाऱ्याला काँग्रेसमध्ये सध्या जे काही घडतंय तो ड्रामा किंवा चापलुसी वाटू शकते. मात्र काँग्रेस आणि गांधी यांच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे.
 
सोनिया गांधी त्यांच्या घराण्याचा काँग्रेसशी असलेल्या संबंधाकडे 'कर्तव्याचा भाग' म्हणून बघतात. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की राजकारणात प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय नेहरूवादी इंदिरा-राजीव गांधी यांच्या तत्त्वांच्या बाजूने उभं राहण्याच्या इच्छेने प्रेरित होता. "मी त्यांना संघर्ष करताना पाहिलं होतं. काही विशिष्ट मूल्यं, विशिष्ट तत्त्व रुजवण्यासाठी दिवसरात्र काम करताना पाहिलं होतं. जेव्हा माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्याला नकार देऊन मी पळपुटेपणा करत असल्याची जाणीव मला झाली."
 
भव्यतेचा हा भ्रमच सोनिया, राहुल आणि प्रियंका यांना काँग्रेस पक्ष आणि राजकारणाच्या आणखी खोलात ढकलतो आहे. सध्याचा मूड घराणेशाही विरोधातला असला तरीदेखील केवळ गांधी घराण्यातील व्यक्तीच काँग्रेसचं नेतृत्त्व करू शकते, हेच बाळकडू त्यांना मिळाले आहेत.
 
मावळणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक सोनिया गांधी इतिहासावर बारीक लक्ष ठेवून आहेत. इतिहासाने प्रेरणादायी आणि असाधारण यशोगाथा लिहिणारी महिला म्हणून आपली नोंद घ्यावी, अशी त्यांची इच्छा आहे.