शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (14:42 IST)

Tomato Price Hike : हिवाळ्यात स्वस्त असणारे टोमॅटो शंभरी पार का करत आहेत?

- दिलनवाझ पाशा
भारताच्या बहुतांश भागांमध्ये हिवाळ्यामध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांदरम्यान असतात. पण यंदा देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत.
 
अनेक ठिकाणी किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 रुपये प्रतिकिलोपेक्षाही जास्त आहे. काही दक्षिण भारतीय शहरांमध्ये तर याचे दर, प्रति किलो 120 रुपयांवर पोहोचले आहेत.
 
केरळमध्ये टोमॅटोचे दर 90 ते 120 रुपये किलो दरम्यान आहेत, तर दिल्लीत ते प्रतिकिलो 90 ते 110 असल्याचं समोर आलं आहे. पावसामुळं टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळं दर वाढल्याचं सांगितलं जात आहे.
 
एकिकडं टॉमेटोचे दर वाढल्यानं ग्राहकांवर बोझा पडत आहे, तर शेतकऱ्यांना मात्र त्यामुळं काहीसा दिलासा मिळाला आहे.
 
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळं टोमॅटोचं पिक उद्ध्वस्त झालं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला होता.
 
मात्र, आता शिल्लक असलेल्या टोमॅटोची चांगल्या दरानं विक्री होत असल्यामुळं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होत आहे.
"सध्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसात बहुतांश पिकं उध्वस्त झाली होती. आता शिल्लक असलेलं उत्पादन चांगल्या दराने विक्री होत आहे," असं उत्तर प्रदेशच्या अमरोहामधील टोमॅटोचं उत्पादन घेणारे शेतकरी आसीम पठाण म्हणाले.
 
साधारणपणे टोमॅटोला चांगला दर मिळाला तेव्हाही दर प्रति क्रेट 300 रुपये असतो. एका क्रेकटमध्ये 25 किलो टोमॅटो असतात. तर सध्या एक क्रेट 1000 ते 1,400 रुपयांपर्यंत विकलं जात आहे.
 
"गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एक क्रेट टोमॅटोचे दर एक हजारांपेक्षा अधिक झाले आहे. काही शेतकऱ्यांना तर 1400 पर्यंतचा दर मिळाला आहे," असं आसीम पठाण म्हणाले.
 
आसीम यांच्या हैबतपूर-सलारपूर गावात बहुतांश शेतकरी टोमॅटोची शेती करतात. हिवाळ्यात भारतातील बहुतांश भागात टोमॅटोची शेती केली जाते. पण उन्हाळ्यात निवडक ठिकाणी टोमॅटोची शेती होते. आसीम उन्हाळ्यातही टोमॅटोची शेती करतात.
 
"हिवाळ्यात कधीही टोमॅटोचे दर एवढे जास्त वाढत नाहीत. या दिवसांत तर टोमॅटोचा दर दहा रुपये किलोपेक्षाही कमी होतो. कारण उत्पादन जास्त असतं. पण यावेळी पावसानं पिक उद्ध्वस्त केलं आहे. बाजारात माल नाही, त्यामुळं मागणी वाढली आहे," असं पठाण म्हणाले.
 
"उन्हाळ्यात आमच्या गावाच्या जवळपास टोमॅटो पिकणाऱ्या भागात ग्राहक येत असतात. पण यावेळी हिवाळ्यात बाहेरचे व्यापारीही आलेले आहेत. ठोक व्यावसायिकांशिवाय रिलायन्स फ्रेश सारख्या मोठ्या कंपन्याही टोमॅटो खरेदीसाठी आल्या आहेत," असं आसीम म्हणाले.
 
"टोमॅटोची शेती करणं हे सोपं नाही. खर्च खूप करावा लागतो. अशापरिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला नाही, तर मोठं नुकसान सहन करावं लागतं," असं अनेक वर्षांपासून टोमॅटोची शेती करणारे आसीम म्हणाले.
 
पावसामुळं उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्याच्या स्वार भागात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोच्या शेतीचं नुकसान झालं आहे. याठिकाणी उत्तराखंडमध्ये झालेल्या पावसामुळं पूर आला होता. या भागातून दिल्ली एनसीआरमध्ये टोमॅटोचा पुरवठा केला जात होता. पण यावेळी याठिकाणचं पिक पूर्णपणे उध्वस्त झालं आहे.
 
"या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचं पिकं घेतलं जातं. ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांना टोमॅटोचं शेत अक्षरशः नांगरावं लागलं आहे. एखादं-दुसरं शेतच यातून वाचलं आहे.
 
"याठिकाणी अनेक लोक जमीन भाडे तत्वावर घेऊन टोमॅटोचं उत्पन्न घेतात. त्यांना प्रचंड नुकसान झालं आहे. याठिकाणी पिक नष्ट झालं, त्यामुळंच टोमॅटोचे दर वाढलेले आहेत," असं रानिश म्हणाले.
 
दक्षिण भारतात दर गगनाला भिडले
तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर 100 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. चेन्नईत एक किलो टोमॅटोसाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत.
 
बुधवारी याठिकाणी टोमॅटोचा ठोक बाजारातील भाव 100-110 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 125 ते 140 रुपये किलो राहिला आहे.
 
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसामुळं याठिकाणच्या पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळं दर वाढलेले आहेत. दर वाढल्याचं एक कारण वाहतुकीला लागणारा उशीर, डिझेलचे वाढलेले दर हेदेखील असल्याचं म्हटलं जात आहे.
जोरदार पावसामुळं तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात टोमॅटो पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
 
टोमॅटो म्हणजे नवं पेट्रोल
भारतात पेट्रोलचे दरही ऐतिहासिक उंची गाठत आहेत. प्रतिलीटर शंभर रुपयांचा आकडा पेट्रोलनं ओलांडला आहे. त्यानंतर आता टोमॅटोचे दर वाढल्यानं लोक सोशल मीडियावर याची गंमत उडवत आहेत.
 
सार्थक गोस्वामी यांनी, "मित्रांनो टोमॅटो म्हणजे नवं पेट्रोल आहे, दर शंभरच्या पुढं गेले", असं ट्विट केलं आहे.
 
दुसऱ्या एका यूझनं टोमॅटो आता इतर वस्तूमच्या दराच्या शर्यतीत खूप पुढं गेल्याचं म्हटलं आहे.
 
भारतात स्वयंपाकाचा गॅस आणि खाद्य तेलांच्या किमती आधीच गगनाला भिडल्या आहेत. आता टोमॅटोचे वाढलेले दर पाहता, कुटुंबांचं आर्थिक गणितही बिघडलं आहे.
 
साधारणपणे हिवाळ्यात 20-30 रुपये प्रति किलोनं विकणारा टोमॅटो आता लोकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं चित्र आहे.
 
टोमॅटो देशी की विदेशी
भारतीय टेलिव्हिजन शो "द करीज ऑफ इंडिया"च्या निर्मात्या रुची श्रीवास्तव यांच्या मते, सर्व भारतीय पदार्थांनी टोमॅटोचा स्वीकार केला आहे.
 
टोमॅटोचं रोप हे दक्षिण अमेरिकेतून दक्षिण युरोप मार्गे इंग्लंडला पोहोचलं होतं. 16 व्या शतकात इंग्रजांनी ते भारतात आणलं होतं.
 
श्रीवास्तव यांच्या मते, रेस्तरॉ आणि हॉटेलने गेल्या 100 वर्षांमध्ये लाल कढी सॉसला 'भारतीय' म्हणत लोकप्रिय केलं बनवलं आहे.
 
"ज्या लोकांना भारतीय पदार्थांबाबत फारशी माहिती नाही, त्यांच्यासाठी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही क्लासिक आहे," असं त्या म्हणाल्या.
 
श्राद्ध संस्कारानंतर केल्या जाणाऱ्या भोजनात भारतीय उपखंडाच्या स्वदेशी जैवविविधतेची झलक पाहायला मिळते. त्यात कच्चे आंबे, कच्ची केळी, गवारीच्या शेंगा, सफरचंद, रताळे, केळीचे खांब, अरबी यांचा समावेश होतो.
 
हे पदार्थ काळे मीरे आणि मीठाबरोबर शिजवले जातात. मूग दाळीच्या माध्यमातून प्रोटीनची कमतरता दूर केली जाते.