सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (11:45 IST)

केदार दिघे कोण आहेत? ते ठाण्यात एकनाथ शिंदेंना आव्हान देऊ शकतील?

shivsena
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (31 जुलैला) केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली.
 
दरम्यान, जिल्हाप्रमुख बनल्यानंतर तीनच दिवसांनी केदार दिघे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. मुंबई पोलिसांनी (2 ऑगस्ट 2022) त्यांच्यावर बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केलाय. याबाबत केदार दिघे यांची प्रतिक्रिया अद्यापही मिळू शकलेली नाही. 
 
केदार दिघे ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था चालवतात. केदार दिघे ठाण्यात शिवसेनेसोबत जोडले गेले होते. पण त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. 
 
बलात्कार आणि धमकी देण्याप्रकरणी अडचणीत आलेले केदार दिघे कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
 
कोण आहेत केदार दिघे? 
ठाण्यात केदार दिघेंची प्रमुख ओळख म्हणजे ठाण्याचे सर्वेसर्वा समजले जाणारे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे ते पुतणे आहेत. आनंद दिघेंचा राजकीय प्रवास पाहणारे सांगतात, लहान असताना केदार दिघे अनेकवेळा आनंद दिघेंसोबत कार्यक्रमात दिसून येत. 
 
केदार दिघेंनी वयाच्या 19 व्या वर्षी आनंद दिघेंच्या पार्थिवाला अग्नी दिला होता. 
 
ठाण्यातील वरिष्ठ राजकीय पत्रकार कैलाश महापदी सांगतात, "केदार दिघे यांचा चेहरा ठाणेकरांनी पहिल्यांदा पाहिला 20 वर्षांपूर्वी आनंद दिघे यांच्या पार्थिवाला अग्नी देताना."
 
यापूर्वी केदार दिघे फारसे कोणालाच माहिती नव्हते. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर 2006 मध्ये केदार दिघेंनी राजकारणात प्रवेश केला. युवा नेते म्हणून ते शिवसेनेत दाखल झाले. ठाणे आणि पालघरमध्ये युवा सेनेअंतर्गत ते कार्यरत होते. 2013 मध्ये त्यांना युवासेनेचे निरीक्षक पद देण्यात आलं.  मुख्य प्रवाहात येण्यासाठी केदार दिघेंनी 2017 मध्ये युवासेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.
kedar dighe
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते, "वयाच्या 38 व्या वर्षी युवासेनेत रहाणं चुकीच आहे असं मला वाटलं. त्यामुळे मी राजीनामा दिला."
 
राजीनाम्यानंतर केदार दिघेंवर शिवसेनेने कोणतीही जबाबदारी दिलेली नव्हती.
 
"मी अजूनही पक्षाचा कार्यकर्ता आहे," असं ते बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.  
 
काही वर्षांपूर्वी केदार दिघे अचानक चर्चेत आले. त्यांनी आनंद दिघेंच्या स्मृती स्थळावर जाऊन आपला बॅनर लावला. त्यामुळे शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला होता. ठाण्यातील शिवसैनिक प्रचंड नाराज झाले होते. 
 
कैलाश महापदी पुढे म्हणाले, "शिवसेनेमध्ये केदार दिघे यांना कधीच स्वीकारण्यात आलं नाही. याचं कारण शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे ठाण्यात सक्रीय होते. केदार दिघे यांच्या पाठीशी आनंद दिघे यांच नाव असूनही त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत."  
 
शिवसेनेनं मला एक साधं पद दिलं नाही किंवा मुख्य प्रवाहातही सामावून घेतलं नाही, याची खंत केदार दिघे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली होती. केदार दिघे आनंद दिघे यांचे पुतणे असूनही राजकारणात फारसे सक्रिय नसल्यामुळे त्यांच्याकडे अनुभव कमी आहे, असं राजकीय जाणकार सांगतात. 
 
वरिष्ठ राजकीय पत्रकार संतोष प्रधान म्हणाले, "केदार दिघे यांनी आनंद दिघे प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकारणात स्वत:च नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, ते यशस्वी झाले नाहीत."   
 
केदार दिघे यांनी महिंद्रा, सीमेंस आणि टाटा एआयजी यांसारख्या खासगी कंपन्यांच्या विविध प्रोजेक्टवर काम केल्याची माहिती आनंद दिघे.कॉम या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 
 
"ते मातब्बर राजकारणी नाहीत. समाजकार्यात त्यांचं फारसं योगदान नाही," ठाण्याचे पत्रकार मनोज देवकर म्हणाले.  
 
ठाणे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. खासदार राजन विचारे सोडता सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोणीच बोलत नव्हतं. त्यावेळी केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
 
"एकनाथ शिंदेंचं कृत्य आनंद दिघेंना कधीच आवडलं नसतं," केदार दिघे यांनी म्हटलं.
 
"आनंद दिघेंच्या काळात मतभेद नव्हते का? नक्कीच होते पण त्यासाठी पूर्ण पक्ष वेठीस धरणं, चर्चा न करता परराज्यात निघून जाण्याचा मार्ग त्यांनी कधी स्वीकारला नसता. हे अयोग्य आहे," असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत एक मोठी पोकळी निर्माण झाली. याचा फायदा केदार दिघे यांना झाला. एकनाथ शिंदे आनंद दिघेंच नाव सातत्याने राजकारणासाठी वापरत आहेत. त्यामुळे शिंदेंच्या विरोधात दिघे कुटुंबातील व्यक्तीला पुढे करण्यात आलंय.
 
राजकीय विश्लेशक संतोष प्रधान म्हणाले, "केदार दिघेंच्या मागे आनंद दिघे यांचं नाव आहे. त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात ठाकरेंनी 'दिघे ब्रॅंड'चा वापर केलाय. शिंदेंना काऊंटर करण्यासाठी केदार यांना उद्धव यांनी पुढे केलंय."
 
केदार दिघेंना जिल्हाप्रमुख पदी नियुक्त करून त्यांना ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राजकीय जाणकार सांगतात, ठाण्यात शिवसेना आता नाममात्र उरलीये. त्यामुळे केदार दिघे यांचा फारसा फायदा शिवसेनेला होणार नाही.
 
कैलाश महापदी सांगतात, दिघे नावाव्यतिरिक्त केदार दिघे यांचं संघटनात्मक कौशल्य काहीच नाही.
 
बलात्कार आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल ठाणे जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर तीन दिवसातच केदार दिघे वादात सापडलेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर बलात्कार आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या प्रेसनोटनुसार, "23 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार रोहित कपूर आणि केदार दिघे यांच्याविरोधात कलम 376 (बलात्कार) 506 (2) (धमकी) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय." 
 
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, 23 वर्षीय महिलेने रोहित कपुर नावाच्या आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय.
 
महिलेच्या तक्रारीनुसार रोहित कपुरने केदार दिघेच्या मध्यस्तीने पैसे घेऊन या घटनेबाबत कोणालाही माहिती न देण्यास सांगितलं. या महिलेने नकार दिल्यानंतर केदार दिघे यांनी या महिलेला धमकी दिल्याचा आरोप आहे.