सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (16:01 IST)

हिंसाचाराच्या एका वर्षानंतरही मणिपूर अजून धगधगतं का आहे?- ग्राउंड रिपोर्ट

ईशान्य भारतातल्या मणिपूरमध्ये गेल्या वर्षी 3 मे ला दोन समुदायांमध्ये, कुकी आणि मैतेई, यांच्यात वांशिक संघर्ष सुरू झाला. त्या हिंसेत आजवर 200 हून अधिक जण मारले गेले. 50,000 हजार पेक्षा जास्त बेघर झाले, कोट्यवधींच्या मालमत्तेची राख झाली, पण वर्षभरानंतरही आज मणिपूर तसंच धगधगतं आहे.
 
भीती, राग, सूड, अविश्वास, आपलं स्वत:च जे होतं ते हरवल्याचं, गेल्याचं दु:ख आणि त्याच्या न थांबणाऱ्या वेदना, इथं सर्वत्र, सर्वदूर आहेत.
 
वर्षभरापासून मणिपूरची चर्चा देशभर सतत सुरू आहे. गेल्या लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात याच विषयावरुन केंद्र सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेला. त्यानंतर निवडणूक झाली.
 
तिच्या प्रचारातही, मुख्यत: विरोधकांच्या बाजूनं, मणिपूरचा उच्चारव झाला. नव्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पुन्हा एकदा मणिपूरवरुन गदारोळ झाला.
निवडणुकांचे निकाल येताच आणि पुन्हा एकदा भाजपाचं सरकार आल्यावर 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदा मणिपूरची आठवण करुन दिली.
'मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहतंय. तिथल्या परिस्थितीला प्राथमिकता द्यायला हवी,' भागवत म्हणाले होते. त्यांनी सरकारला जणू आसरा दाखवला.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नुकतेच इनर मणिपूर मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. ए. बिमोल अकोईजाम आक्रमकपणे, भावनिकपणे बोलले.
'अजूनही मणिपूर शांत, स्वस्थ का होऊ दिलं जात नाही' असा त्यांचा सवाल होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतल्या भाषणावेळेस विरोधकांनी मणिपूरवरुन गोंधळ घातला. राज्यसभेत बोलताना मोदी म्हणाले की मणिपूरमध्ये हिंसक घटना कमी झाल्या आहेत आणि तिथं शांततेची आशा दिसत आहे.
पण शब्दांचे दावे आणि मणिपूरच्या खोऱ्यातील वास्तव यात मोठं अंतर आहे. वर्षभरानंतरही तिथल्या रहिवाशांना संघर्षाचा अंत दिसत नाही. निर्वासित छावण्यांमधलं भविष्य धूसर आहे.
 
एकमेकांबद्दलच्या अविश्वासानं मनात असं टोकदार घर केलं आहे की, कधी कधी त्याची आग होऊन ती सारं ध्वस्त करायला पाहते आहे. वरवर जी शांतता दिसते, तिच्या पोटात मोठी अस्वस्थ कालवाकालव सुरू आहे.
ती अवस्थता जेव्हा आम्ही मणिपूरच्या खोऱ्यातून आणि पर्वतरांगांतून फिरतो तेव्हा पदोपदी दिसते. दोन देशांत असते तशी सीमारेषा एका राज्यात आखली गेली आहे.
 
एका बाजूला कुकी आणि दुसऱ्या बाजूला मैतेई.
 
दोन देशांची असतात, जणू तशी दोन सैन्यं, हाती शस्त्रं घेऊन, आपापल्या प्रदेशांची राखण करताहेत. त्यात निशस्त्र निष्पापांची आयुष्यं भरडून निघाली आहेत.
 
जवळपास आठवडाभर आम्ही या प्रदेशांतून फिरतो. बोलतो. जे दिसतं ते पाहतो. मणिपूरच्या जखमा खोल आहेत.
 
एक गाव, तीन परिवार, तीन दिशा
या आजही ओल्या असणाऱ्या जखमा मणिपूरमध्ये कोणत्याही दिशेला जाताना दिसतात. राजधानी इम्फाळपासून 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुगनू गावाकडे जेव्हा आम्ही जातो, तेव्हाही दिसतात. हा जिल्हा आहे चंदेल. सुगनू हे तालुक्याचं गाव.
 
एकेकाळी मैतेई, कुकी आणि काही बंगाली अशी कुटुंबं इथं एकत्र रहायची. आता इथं फक्त मैतेई आहेत आणि परिसरातले सगळे कुकी निघून गेले आहेत. सुनगूपासून थोडक्याच अंतरावर डोंगराळ प्रदेश सुरू होतो. तिथं कुकींच्या वस्त्या आहेत. आता एक अदृश्य सीमा त्यांना वेगवेगळं ठेवते.
 
गावाच्या मध्यातून मुख्य रस्ता जातो. रोजचं आयुष्य सुरू झालंय. दुकानं आहेत, बाजारपेठ आहे, शाळेकडे लगबगीनं जाणारी मुलं-मुली आहेत. पण या सगळ्यातनं नजर अडकते हिंसेच्या खुणांवर, ज्या जागोजागी विखुरल्या आहेत.
 
गावाच्या वेशीवरच एक जळालेली कार दिसते. बरोबर असलेला गावातला एकजण सांगतो, जेव्हा जाळपोळ सुरू झाली, तेव्हा पहिल्यांदा ही कार जाळली गेली. गेली वर्षभर ती तिथे तशीच आहे.
तोडलेली, जाळलेली, पाडलेली घरं सगळीकडे आहेत. त्यांच्यात आता जिवंतपणाची कोणतीही खूण नाही. जे अजूनही गावात आहेत, ते अशा घरांबाहेर राखण करत असलेले दिसतात. अशी घरं दोन्ही समुदायांच्या लोकांची आहेत. जी वाचली, तिथं आता लोक राहतात.
 
या गावाच्या एका बाजूला आसाम रायफल्सचं ठाणं आहे. त्यांची एक पेट्रोलिंग करणारी एक गाडी, ज्यावर एक जवान बंदूक सरसावून उभा आहे, बाजूनं जाते. एका दबाव जाणवतो.
 
सुगनूमध्येही आणि इथंपर्यंत येतांना रस्त्यात दिसणारी एक गोष्ट नजरेतून सुटत नाही. ती म्हणजे, प्रत्येक गावाच्या वेशीवर बायका ठाण मांडून बसल्या आहेत. राखण करताहेत. बांबू आणि प्लास्टिकच्या छपराची एक छोटी खोली उभारली आहेत आणि त्यात या बायका राहताहेत. त्यांचा मुक्कामच तिथं आहे.
 
यांना स्थानिक भाषेत 'मायरा पायबी' म्हणतात. म्हणजे हाती मशाल घेतलेल्या महिला.
 
त्यांचं काम गावात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर, व्यक्तीवर नजर ठेवायची. 'विरोधी बाजू'चा कोणी गावात येतो हे डोळ्यात तेल घालून पहायचं.
 
चोवीस तास वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये राखणदारी करत या महिला उभ्या असतात. पोलिस, सैन्याचे जवान सगळीकडे आहेत, पण प्रत्येक गावाची ही यंत्रणा आहे. या बायकांचं गेल्या वर्षभराचं हेच आयुष्य आहे.
सुनगूच्या 'मायरा पायबीं'च्या ठाण्यामध्ये बसल्या आहेत युमलेंबम मणितोंबी. साधारण पन्नाशीला पोहोचलेल्या.
 
भावना विरहित सपाट चेहरा, पण त्यात असलेली वेदना जाणवते. मणितोंबी या 29 वर्षाच्या युमलेंबम शिवा सिंगच्या आई आहेत.
 
हिंसाचाराच्या दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा गावात गोळीबार झाला, तेव्हा या गावात जे चार लोक मारले गेले, त्यात शिवा 29 मे 2023 रोजी एका गोळीला बळी पडला.
 
चेन्नईत उच्च शिक्षण घेतल्यावर तो गावी परत येऊन शिक्षक बनला होता. एक वर्षं झालं, पण मणितोंबी अजूनही तो दिवस विसरु शकत नाहीत.
 
"मला तीन अपत्यं. एक मुलगी आणि दोन मुलं. पण मोठा मुलगा शिवावरच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. तो आमचा एकमेव आधार होता. आम्हाला सांगण्यात आलं होतं की गावात राहणारे लोक सुरक्षित आहेत. काळजीचं गरज नाही. पण तरीही मी माझा मुलगा गमावला. माझ्यासाठी आता काहीच उरलं नाही. मी त्याचा विषय निघाला की अश्रू रोखू शकत नाही," असं त्या म्हणतात आणि हमसून हमसून रडायला लागतात.
बाहेर जोरात पाऊस सुरू होतो आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणीही थांबत नाही. तरीही मणितोंबी आम्हाला त्यांच्या घराकडे चला म्हणतात. जाता जाता रस्त्यात एक मोठा बोर्ड लावलाय. या हिंसाचारात राज्यात ज्या मैतेई व्यक्तींचे जीव गेलेत, त्या सगळ्यांचे फोटो लावले आहेत. त्यातला शिवाचा फोटो हात लावून त्या दाखवतात.
 
मणिपूरच्या ग्रामीण भागात असतं तसं मातीचं, शाकारलेलं मणितोंबींचं घर आहे. मध्यभागी मोठं अंगण आहे आणि त्या अंगणात आता एक स्मारक उभं आहे.
 
ते त्यांच्या मुलाचं, शिवाचं, आहे. त्याचा एक अर्धपुतळा आहे आणि खाली जन्म-मृत्यूच्या तारखा आहेत. तिथं कोरलेले काही शब्द एक धक्का देतात.
 
नावाच्या वर कोरलं आहे: 'कुकी मैतेई वॉर 2023'.
म्हणजे, जेव्हा बाहेरचं जग मणिपूरच्या वांशिक हिंसाचाराची नेमकी कारणं आणि त्याचं स्वरूप शोधायचा प्रयत्न करतं आहे, तेव्हा इथले स्थानिक त्याला दोन आदिवासी समुदायांमधलं युद्ध मानू लागली आहेत.
जेव्हा आम्ही कुकीबहुल भागात नंतर प्रवास करतो तेव्हा तिथंही असंच लिहिलेलं पाहतो. एकदम इतिहासकालात, या भागातल्या विविध जमातींच्या संघर्षाच्या काळात, गेल्यासारखं वाटतं.
मणितोंबी त्यांच्या मुलाचे फोटो आणून दाखवू लागतात. चेन्नईला शिक्षणासाठी जाण्याची, तिथून माघारी येण्याची कहाणी सांगू लागतात. जेव्हा त्याच्या पुतळ्यापाशी जातात तेव्हा पुन्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो. पुतळ्यालाच त्या मिठी मारू लागतात. मुखाची चुंबनं घेतात. जणू त्यांचा शिवा जिवंत आहे.
 
जे काही तुमच्यासोबत, तुमच्या मुलासोबत घडलं, ते आठवून तुमच्या मनात सूडाची भावना येते का? मी मणितोंबींना विचारतो.
"माझा मुलगा आता गेला आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत त्याला विसरू शकणार नाही आणि ज्यांनी हे केलं त्यांना क्षमाही करू शकणार नाही."
"हे सुरू असलेलं युद्ध थांबावं हीच माझी एकमेव इच्छा आहे, दुसरं काही नाही," अश्रूभरल्या डोळ्यांनी आणि थंड पण स्पष्ट शब्दांत मणितोंबी सांगतात.
 
तरीही, कोणालाही माहिती नाही, शांतता परत कधी येणार? जे सीमेच्या पलीकडे राहतात, त्यांनाही नाही. या सुगनू तालुक्यातूनच सुरू झालेली दुसरीची कहाणी, दुसऱ्या दिशेकडे गेलेली, तीही अशीच आहे. अस्वस्थ आणि उत्तराविना.
 
सीमेपलीकडे...
मणिपूरचे दोन भाग झालेत. एक आहे सपाटीवरचं अथवा इम्फाळ खोऱ्यातलं मणिपूर, जे आता मैतेईंच्या ताब्यात आहे. दुसरं आहे भोवतालच्या पर्वतरांगांमधलं मणिपूर, जे कुकींच्या ताब्यात आहे. इथं नागा आदिवासी समुदायाचे लोकही राहतात. या दोन्ही मणिपूरदरम्यान आता एक अविश्वासाची भिंत उभी राहिली आहे.
 
जसं आम्ही मैतेईबहुल इम्फाळमधून आता कुकींच्या राजकारणाचं केंद्र बनलेल्या चुराचांदपूरकडे जाऊ लागतो, साधारण 40 किलोमीटरवर, बिष्णुपूरनंतर, हा सीमाप्रदेश सुरू होतो. या भागाला तिथं 'बॉर्डर' किंवा 'बफर झोन' म्हणतात.
 
दोन देशांच्या दरम्यान असतो तसा हा अक्षरश: दीड-दोन किलोमीटरचा 'नो मॅन्स लँड' आहे. इथं फक्त बंदुकधारी सशस्त्र दलांचे जवान तैनात आहेत. कोणीही कुकी वा मैतेई आपल्या प्रांतातून पलीकडच्या भागात जाऊ शकत नाही.
जसजसे आम्ही पुढे जाऊ लागतो, तशा हिंसाचाराच्या जखमा दिसू लागतात. इथं सगळी खेडी आणि वस्त्या होत्या. त्यात कुकी आणि मैतेई दोघंही रहायचे. आता सगळ्या वस्त्या मरणासन्न आहेत. घरं तोडली गेली आहेत, पडली जाळलेली आहे.
 
जळालेल्या गाड्या आजही आजूबाजूला तशाच पडल्या आहेत. जी घरं बऱ्या अवस्थेत आहेत, तो या तैनातीवरच्या जवानांनी आपला तात्पुरता निवारा बनवला आहे.
 
चेक पोस्ट्स सुरू होतात. एक नाही, अनेक दलांचे जवान एकामागोमाग एक उभे असतात. भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल, आसाम रायफल्स, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि स्थानिक पोलिसही. या प्रत्येकाच्या स्वतंत्र चेक पोस्ट. नावं लिहून घेतली जातात, कारण विचारलं जातं, फोन नंबर्स घेतले जातात. मग पुढे सरकायचं.
 
एक गोष्ट मात्र नोंदवण्यासारखी, जी नजरेत भरते. ही सीमा दोन्ही बाजूकडे फक्त इथले मुस्लीम स्थानिक ओलांडू शकतात. सगळी गावं मोकळी असली तरी या सीमेवर एक वस्ती दिसते. तिथे माणसांची वर्दळ आहे.
ती मुस्लीम समुदायाची वस्ती आहे. तेच आता दोन्ही बाजूंचा दुवा आहेत. पलीकडे जाण्यासाठी आमच्या गाडीचा ड्रायव्हरही मुस्लीम आहे.
जवानांच्या चेक पोस्ट ओलांडून कुकीबहुल भाग अधिकृतरित्या सुरू झाल्यावर अजून एक थांबा येतो. हा कुकींच्या जवानांचा. त्यांना इथे 'व्हिलेज व्हॉलेंटिअर्स' म्हणतात. का आलात, कुठून आलात, सोबत कोण आहे, हे सगळं तपासून झाल्यावर पुढे चुराचांदपूरकडे जायला प्रवेश मिळतो.
 
डोंगरमाथ्यावरच्या या शहरात प्रवेश करतांनाच नजर डाव्या बाजूच्या एका भिंतीकडे जाते. ती आहे 'आठवणींची भिंत', म्हणजे 'वॉल ऑफ रिमेम्बरन्स'. एक स्मारक उभारलं गेलं आहे. त्यावर जे कुकी समुदायातल्या व्यक्ती या हिंसाचारात मारल्या गेल्या आहेत त्यांचे फोटो आणि त्याखाली नावं आहेत.
 
काही मोकळ्या शवपेट्या तिथं ठेवल्या आहेत. बाजूला मृत्यूंची संख्या, जखमींची संख्या, क्षतिग्रस्त घरांची संख्या असलेलं एक 'रनिंग क्लॉक' ठेवलंय. त्यादिवशीच्या लिहिलेल्या आकडेवारीनुसार 158 जणांना जीव गमावावा लागला आहे.
 
या सगळ्या संघर्षाचं सावट चुराचांदपूरवर दिसतं. ठिकठिकाणी पोस्टर्स लागले आहेत, भिंतींवर ग्राफिटी रंगवली आहे. हिंसाचार थांबवण्याच्या, सरकारच्या निषेधाच्या, राजकीय तोडग्याच्या, स्वतंत्र 'झोलँड'च्या, केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागण्या सगळीकडे ठळकपणे दिसतात.
 
इथले कुकी आता या शहराला चुराचांदपूर नाही, 'लामका' म्हणतात. अनेक जुन्या पाट्यांवरच्या नावांवर काळं करुन आता तिथं 'लामका' असं लिहिण्यात आलं आहे.
जेव्हा गेल्या वर्षी मे महिन्यात हा कुकी-मैतेई संघर्ष सुरू झाला, तेव्हा मैतेईबहुल खोऱ्यातल्या हजारोंची पावलं पहिल्यांदा या डोंगरावरच्या चुराचांदपूरकडे वळली. इथे कुकींची संख्या जास्त. मजल दरमजल करत, मिळले त्या साधनानं, मिळेल ती वाट पकडत लोक इकडे आले.
"पहिल्या दोन दिवसांमध्येच 4,000 विस्थापित इथं आले होते," आमच्यासोबत या शहरात फिरणारी विद्यार्थिनी मावी सांगते. त्यापुढच्या वर्षभरात चुराचंद्रपूर विस्थापितांनी भरुन गेलं.
 
ज्यांच्याकडे काही पैसे जमेला होते, नोकरी होती त्यांनी भाड्यानं घरं घेतली. ज्यांच्याकडचं सगळंच गेलं होतं, त्यांच्यासाठी निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. चुराचांदपूरच्या एका कोपऱ्यामध्ये, ओढ्याकाठानं अलीकडेच तयार झालेल्या एका वस्तीमध्ये आम्ही जातो.
 
स्वतंत्र घरं आहेत, पण सिमेंटपेक्षा लाकूड आणि पत्र्यांनी घाईघाईत ही घरं बनवलेलं डोळ्यांना दिसून येतात. इथं राहणारे बहुतेक विस्थापित आहेत. त्यातल्याच एका घरात भाड्यानं आपल्या परिवारासोबत राहणारी बॉईनू हाओकिप भेटते.
 
बॉईनू त्याच चंदेल तालुक्यातल्या सुगनूची आहे जिथे आपण सुरुवातीला मणितोंबी यांना भेटलो होतो. सुगनूमध्येच लांगचिंग नावाचं छोटं खेडं आहे. तिथे सगळे कुकी समुदायातले होते. सगळ्यांनाच तिथून जीव मुठीत घेऊन पळावं लागलं. परिस्थिती बॉईनूला वेगळ्या दिशेला घेऊन गेली.
 
"मी सुट्टीसाठी गावी आले होते. 28 मे ला सुगनूमध्ये हिंसा भडकली तेव्हा सुरुवातीला आम्ही सगळ्यांनीच गावातल्या चर्चमध्ये आसरा घेतला. मग पहाटेच्या अंधारात तिथून पळालो. मजल दरमजल करत चुराचांदपूरला पोहोचलो," बॉईनू सांगते.
 
ती एका बाहेरच्या राज्यात सामाजिक कार्य या विषयात पीएचडी करते आहे. मणिपूरचा उल्लेख आला तर त्रास होईक म्हणून कॉलेजचं नाव आणि तिचा फोटो घेऊ नका अशी विनंती ती आम्हाला करते. अनेक प्रकारची भीती आहे.
तिचे वडील शिक्षक आहेत. इथंही शिकवण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही जगण्यासाठी तिच्या परिवाराला इतरही कामं करावी लागतात. गावात सोबत जे नातेवाईक होते, ते सगळेच वेगवेगळ्या दिशांना विखुरले. तात्पुरतं जिथं स्थिरावता येईल तिथं स्थिरावले.
 
"नातेवाईकांपैकी कोणीही अशा स्थितीत नाही की ते एकमेकांना मदत करू शकतील. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काही जण बांधकामांवर बिगारी मजूर म्हणून जातात. एवढे निर्वासित या शहरात आले आहेत की कामं इथ सगळ्यांना मिळू शकत नाहीत. माझं कुटुंबही इथं एकांच्या शेतात मजूरी करायला जातं. त्यातून जे मिळतं, त्यावरच जगतो," बॉईनू सांगते.
 
तिचा 'पीएचडी'चा विषय आहे 'मणिपूरचा वांशिक हिंसाचार आणि त्याचे मानसिक परिणाम'. ती सध्या इथल्या हिंसाचारानं प्रभावित लोकांना भेटते आहे. तिच्या प्रबंधासाठी मुलाखती घेते आहे. ओढवलेल्या परिस्थितीतून आलेलं नैराश्य तिला सगळ्यांमध्ये दिसतं आहे.
 
"कधीकधी मला वाटतं, हे जे घडतं आहे, ते स्वप्नंच आहे. ते खरं नाही. पण नंतर आठवतं की आता आपल्याला परत जाण्यासाठी आपलं गाव नाही. मला काहीही भविष्य दिसत नाही. सध्या फक्त अभ्यास आणि कुटुंबाची मदत, एवढंच विचार करते आहे," ती म्हणते.
 
बॉईनू जे सांगते, ते सगळ्या मणिपूरचं वास्तव आहे. अनेक सीमा ओलांडल्या गेल्या आहेत. आता परत फिरणं त्यांना अवघड दिसतं आहे.
 
राज्यांच्याही सीमा ओलांडल्या
ज्या सुनगूमध्ये मणितोंबी राहतात आणि जिथून बॉईनू दुसरी दिशा पकडून चुराचांदपूरला राज्यांतर्गत तयार झालेली सीमा ओलांडून आली, त्याच सुगनूमधून नेगनेईं चोंग यांना तिसऱ्या दिशेनं आसरा मिळण्यासाठी त्यांच्या राज्याचीच सीमा ओलांडावी लागली.
 
52 वर्षांच्या नेंगनेई मणिपूर ओलांडून शेजारच्या मिझोराममध्ये पोहोचल्या.
 
हिंसाचार उसळल्यानंतर, जीव धोक्यात आल्यानंतर प्रत्येकानं मिळेल ती दिशा पकडली. जीव वाचवणं पहिली गरज होती. मैतेई विस्थापित इम्फाळ खोऱ्यात परतले, तर खोऱ्यातले कुकी बाहेर पर्वतरांगांमध्ये.
 
काही कुकी विस्थापित हे मिझोराममध्ये गेले कारण तिथल्या मिझो जमातीशी कुकींचे जुने नातेसंबंध आहेत. असे 12000 मणिपूरमधले कुकी विस्थापित सध्या मिझोराममध्ये आश्रयाला आहेत. त्यातल्याच एक, नेंगनेई चोंग.
नेंगनेईंचे पती भारतीय सैन्यात सुभेदार होते. 2016 मध्ये त्यांचं निधन झालं. पण मिश्र लोकसंख्या असलेल्या सुगनूमध्ये, तिथल्या लांगचिंग गावात, आपल्या दोन मुलांसह त्या रहायच्या. बॉईनूच्या कुटुंबासारखे इतरही नातेवाईक तिथे रहायचे.
 
पण आता हातचं सगळं गेलं आणि मिझोराममध्ये पुन्हा या वयात त्यांना शून्यातून सगळं सुरू करावं लागलं.
 
राजधानी आयझॉलच्या एका निर्वासितांच्या छावणीत त्या राहतात. इथं एकूण 62 कुटुंबं आहेत.
 
"मी आणि माझ्या पतींनी आमच्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन मोठं केलं होतं. इच्छा हीच होती की त्यांच्या जगण्यात एक प्रतिष्ठा असावी. पण आता ते सगळं गेलं. इथं आलो आणि रोजच्या अन्नासाठी माझ्या मुलांना रोजंदारीवर काम करावं लागतं आहे. त्यापेक्षा मला वाटतं की तिथेच घरी मेले असते तर बरं झालं असतं," हे म्हणता म्हणताच नेंगनेई बांध फुटून रडू लागतात.
 
नेंगनेईंच्याच बाजूला थोड्या अंतरावर उभे असतात 60 वर्षांचे लाला सोंगेट. वर्षभरापूर्वी इम्फाळच्या विमानतळाजवळ त्यांनी लाखोंची गुंतवणूक करुन एक कपड्याचं शोरूम सुरू केलं होतं त्यांच्या दोन मुलांसाठी.
 
पण राजधानीतही जाळपोळ सुरू झाली आणि लालांना अंगावरच्या कपड्यांसहित कुटुंबाला घेऊन मिझोरामला यावं लागलं. त्यांनी दोन्हीही मुलं, रॉबर्ट आणि हिलरी, आता आयझॉलमध्ये रोजंदारीवर कामं करतात.
एकेकाळी सधन आयुष्य जगलेले आता आर्थिक चणचणीत आहेत, रोजंदारीवर काम करण्यासाठी मजबूर आहेत आणि उत्पन्नाचा स्रोत गमावलेल्यांसाठी आवश्यक तेवढ्या आर्थिक संधी निर्माण करणं, कोणत्याही सरकारसाठी सहज सोपं नाही. ही मोठी आर्थिक समस्या मणिपूर-मिझोरममध्ये तयार झाली आहे.
 
जेव्हा 'बीबीसी'ची टीम आयझॉलच्या या शिबिरात इतरांना भेटते, तेव्हा बहुतांशांकडून एकच तक्रार आहेत की आम्ही आवश्यक तेवढं कमावू शकत नाही आणि सरकारनं मदत दिलेलं अन्न पुरेसं नाही.
 
"इथं राज्यात नवं सरकार आहेत आणि आमचे स्वत:चे आर्थिक स्रोतही मर्यादित आहेत. आमचं सरकार अनेक आर्थिक कसरती करतं आहे. केंद्र सरकारला आम्ही मदतीसाठी वारंवार विनंती करतो आहोत. त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं तर या विस्थापितांना मदत करणं सोपं होईल," असं लालवेचुंगवा म्हणतात. ते आयझॉलचे स्थानिक आमदार आहेत आणि इथल्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत.
 
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, मणिपूरच्या विस्थापितांसोबत म्यानमारमधून आश्रयाला आलेले जवळपास 35 हजार शरणार्थी मिझोराममध्ये आहेत आणि इथल्या सरकारला त्यांचीही काळजी घ्यावी लागते आहे.
मिळेल त्या दिशेला विखुरलेल्या परिवारांना आता कल्पना नाही की ते परत कधी एकत्र येतील. त्यांनी ती कल्पना करणंही सोडून दिलं आहे. मिझोराममध्ये गेलेल्या लाला सोंगेट यांचे मेव्हणे, जे इम्फाळला शेजारी रहायचे, ए. रामथांग आम्हाला चुराचांदपूरमध्ये भेटतात.
 
ते सैन्यात होते आणि 28 वर्षांची सेवा देऊन निवृत्त झालेत. ते म्हणतात, "मी लालांना म्हणतो की तुम्ही परत इकडे या. जे काही आहेत ते दोन घास मिळून खाऊ. पण ते आता परत येण्यासाठी धजावत नाहीत."
 
रामथांग 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात रणभूमीवर होते. काश्मीरच्या बर्फाळ हिमालयात सीमेवर असतांना 'फ्रॉस्टबाईट'मुळे, म्हणजे बर्फात मानवी अवयव कधी काळ राहिल्यानं झालेली जखम, त्यांच्या पायाची काढलेली बोटं ते दाखवतात.
 
त्यांना एकच शल्य आहे ते म्हणजे, इम्फाळचं घर केवळ अंगावरच्या कपड्यांनीशी सोडतांना त्यांना मिळालेली शौर्यपदकं तिथेच राहिली. ती आता त्यांना कधीच पाहता येणार नाही.
 
निर्वासितांच्या छावण्यांची न ओलांडता येणारी कुंपणं
मणिपूरचा प्रश्न कधी सुटेल याचं एक उत्तर दुसऱ्या एका प्रश्नात दडलं आहे. तो म्हणजे इथल्या निर्वासितांच्या छावण्यात असलेला मुक्काम कधी संपणार आणि त्यातले लोक आपापल्या घरी परत कधी जाणार?
याचं उत्तर कोणाकडेही नाही आणि वर्षभरात कितीही प्रयत्न केले, तरीही छावण्यांची ही कुंपणं बहुतांशांना ओलांडता आली नाहीत.
लेम्बी चिंगथांगची कहाणी त्याचं एक उदाहरण आहे. ती आम्हाला इम्फाळच्या आकम्पात या भागातल्या 'आयडियल गर्ल्स कॉलेज'मध्ये सध्या उभारल्या गेलेल्या शिबीरामध्ये भेटते.
 
लेम्बी मोरेह नावाच्या शहरातली आहे. कुकी सीमेच्या जवळ असलेल्या या शहरात 2023 च्या मे महिन्यात हिंसाचार उफाळला आणि तिच्या कुटुंबाला मोरेह सोडून पळण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही.
 
तिची आई दोन मुली, एक छोटा मुलगा आणि म्हातारी आई यांना घेऊन इम्फाळच्या या शिबिरात आली. त्याअगोदरच्या एप्रिलच्या महिन्यातच लेम्बीची 12 वीची परिक्षा झाली होती आणि 91टक्के मार्क्स मिळवून ती तिच्या शाळेत पहिली आली होती.
 
आता ती डॉक्टर होण्याचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी 'नीट' परीक्षेची तयारी करणार होती. पण एका रात्रीत आयुष्य बदललं, स्वप्न खुंटलं.
 
लेम्बी इथंही येऊन परिक्षेची तयारी करू लागली, पण शिबिराच्या गर्दीत, अस्वच्छतेत, कोपऱ्यातल्या जागेत आणि अभ्यासाला कोणत्याही प्रकारे पोषक नसणाऱ्या परिस्थितीत तिचा अभ्यास होणं शक्यच नव्हतं. आई आणि बहिणीनं काहीतरी करुन तिला एका बोर्डिंगमध्ये काही काळ ठेवलं. पण पैसे पुरेनात तसं ती पुन्हा एकदा शिबिरात परतली आहे.
 
कोचिंग क्लाससाठी पैसे नाहीत, म्हणून अभ्यासही थांबला. तिला माहीत नाही की ती कधी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल किंवा नाही.
लेम्बीची आई शिबीरातल्या इतर बहुतांश महिलांसारखी साबण, अगरबत्त्या, मेणबत्त्या बनवते आणि नंतर बाहेर शहरात जाऊन विकते. त्यातून जे मिळतं त्यात गुजराण चालते. तिची बहिण सुनीता, मोरेहमध्ये शाळेत शिक्षिका होती. तिला नुकतीच इथे इम्फाळमध्ये एका शाळेत नोकरी मिळाली आहे.
 
आता नोकरी आहे, मग तुम्ही बाहेर नवं घर घेऊन शिबीरातून जाणार का? मी सुनीताला विचारतो. "आम्ही घरात चार महिला आहोत आणि शाळेतला छोटा भाऊ आहोत. बाहेर सुरक्षित वाटत नाही. आम्ही इथे शिबिरातच थांबणार आहोत," सुनीता सांगते.
 
तेवढ्यात काही शाळकरी मुलं मुली गोळा व्हायला लागतात. त्यांच्या हातात पुस्तकं, वह्या, पाट्या आहेत. ती गोल करुन बसतात. हे लेम्बीचे विद्यार्थी आहेत. ती शिबिरात परत आल्यापासून या मुलांच्या शिकवण्या घेते. स्वत: शिक्षण तूर्तास सुटलं असलं, तरीही बाकी मुलांना मदत करते.
 
लेम्बीशी बोलता बोलता, या निर्वासितांच्या शिबिराकडे लक्ष जातं. कधी काळी कॉलेज होतं. आता इथल्या एकेका वर्गात 4-5 कुटुंब दाटीवाटीनं राहतात. जशी जागा मिळते तशी. एका खोलीत अनेक संसार उभे राहिले आहेत.
 
चादरी दोऱ्यांना टांगून, त्यांना भिंती बनवून, खोल्या केल्या आहेत. कपडे, अंथरुणं, स्वयंपाक, पुस्तकं सगळं काही एका ठिकाणी. याच्या खोल्यांमध्ये कोणी किराण्याचं, गृहोपयोगी वस्तूंची दुकानं टाकली आहेत.
स्वच्छता म्हटली तर नावालाच आहे. घाणीचं साम्राज्य सर्वदूर आहे. त्यात पावसानं सगळं भिजवल्यानं एक कुबट वास सर्वत्र भरुन राहिला आहे. त्यातल्या मोकळ्या जागेत मुलं खेळताहेत. त्यातली काही आजूबाजूच्या शाळांमध्ये जातात. काहींची शाळा सुटली आहे.
 
"जीव वाचला हेच पुरेसं आहे," गेल्या 11 महिन्यांपासून इथे राहणारे कोबा सिंग सांगतात.
 
ते सुद्धा मोरेहचेच आहेत. स्वत:चा व्यवसाय होता. त्यांचे कुकी बिझनेस पार्टनर्ससुद्धा होते. पण आता सगळं बदललं. ते आम्हाला सगळी छावणी फिरुन दाखवतात.
 
"दिवसातले कित्येक तास वीज नसते. पाऊस आला तर छत गळतं. लोक अक्षरश: कोंबून कोंबून बसवलेत इथं. पण जाणार कुठे काहींना बाहेर काम मिळतं. ते करुन परत इथेच येतात. गावी परत जाण्याची इच्छा होते, पण ती आता पूर्ण होईल असं वाटत नाही," कोबा सिंग हताश आवाजात म्हणतात.
 
इथं एका खोलीत बऱ्याच महिला एकत्र बसून काही काम करतांना दिसतात. तो त्यांच्या उद्योग आहे. फरशा पुसण्याची, गाड्या धुण्याची, कपडे धुण्याची घरगुती साबणं तयार करणं चालू आहे. ते काही जणी करत आहेत.
 
बाकी काही जणी अगरबत्त्या वळतांना दिसतात. काही त्यांची प्लास्टिकच्या पिशव्यांत घालून विकण्यायोग्य गठ्ठे बनवतात. जगण्यासाठीच याच उद्योगावर बरेच जण अवलंबून आहेत. काही तयार करतात, उरलेले विकतात.
इम्फाळच्या रस्त्यांवर फिरतांना अनेक चौकांमध्ये, बाजारांत हे विस्थापित हातात शिबिरांमध्ये तयार झालेली उत्पादनं घेऊन विकतांना पहायला मिळतात.
 
हातामध्ये आम्ही हिंसाचारग्रस्त विस्थापित आहोत असा बोर्ड असतो, गळ्यात कोणत्या शिबिरामध्ये आहेत याचं ओळखपत्र असतं आणि ठिकठिकाणी उभे राहून, येणाजाणाऱ्यांना थांबवून विकणं सुरू असतं. काही शहरांमध्ये आता विस्थापितांचे वेगळे बाजारही सुरू झाले आहेत.
 
अशाच एका रस्त्यावर आम्हाला थाऊनाओजाम रमेशबाबू भेटतात. ते चुराचांदपूर जिल्ह्यातून विस्थापित होऊन इम्फाळमध्ये आलेत. सोबत त्यांच्या गावातल्या चार महिला आहेत. जवळच्या एका निर्वासितांच्या शिबिरात राहतात आणि या रस्त्यावर येऊन उत्पादनं विकतात.
 
"आमच्या आया, बहिणी, नातेवाईक, जे कोणी या शिबिरात आहेत, ते रात्रंदिवस ही उत्पादनं तयार करण्यात व्यग्र आहेत. आम्ही ती बाहेर येऊन विकतो. दुसरा कोणता पर्याय आमच्यासमोर आहे? सांगा ना. सुरुवातीला इथले लोक आस्थेनं थांबायचे. आमच्याकडून काहीतरी विकत घ्यायचे. पण आता वर्षभरानंतर तेही कमी होत चाललं आहे. माहीत नाही आम्ही कसे दिवस काढणार आहोत," रमेश बाबू म्हणतात.
 
तेवढ्यात एक कार येऊन थांबते आणि ते काही विकलं जातं आहे का ते पहायला पळत जातात.
यापेक्षा काही वेगळी परिस्थिती कुकीबहुल पर्वतरांगांच्या प्रदेशात नाही. किंबहुना त्यापेक्षाही अधिक गंभीरही आहे. इम्फाळ ही राजधानी असल्यानं, इथं विमानतळ असल्यानं अनेक सुविधा इथं पहिल्यापासून आहे.
 
पण आता इम्फाळची दिशा चुराचांदपूर वगैरे कुकी भागाला बंद आहे. त्यांना मदत मिझोरमच्या आयझॉलकडून मिळू शकते. पण तो 10-12 तासांच्या डोंगरी रस्ता आहे.
 
त्यामुळे मुख्यत्वे वैद्यकीय आणि अत्यावश्यक सुविधा मोठ्या अडचणीत आहेत. तिथल्या अनेक निर्वासित छावण्यांना भेट दिल्यावर ते दिसतं. तिथं जर कोणाला तातडीची वैद्यकीय मदत हवी असेल किंवा मोठी शस्त्रक्रिया असेल तर अगोदर रस्त्यामार्गे आयझॉलला जावं लागतं.
 
तिथेही शक्य नसेल तर आयझॉलहून विमानाने आसामच्या गुवाहाटीला जावं लागतं. ज्यांना हे शक्य होत नाही, त्यांना सोसावं लागतं.
 
या सगळ्या संघर्षाचा, हिंसेचा, आर्थिक आणीबाणीचा पहिला बळी स्त्रिया आणि लहान मुलं ठरतात. हा जगाचा इतिहास आहे आणि मणिपूरचं वास्तव आहे. ज्यांना घरं, गावं सोडावी लागली आहेत, ज्यांच्या पतींचा हिंसेत मृत्यू होऊन वैधव्य आलं आहे, त्या दोन्ही समुदायांतल्या स्त्रियांची अवस्था अत्यंत हलाखीची आहे.
"इथला समाज पितृसत्ताक असला तरीही महिला काम करतात. स्वत: कमावतात. त्या कायम आघाडीवर असतात. पण आता अनेकींनी उदरनिर्वाहाचं साधनच गमावल्यामुळे त्या कमालीच्या असुरक्षित बनल्या आहेत. अनेक जणी गंभीर मानसिक रोगांना, कौटुंबिक हिंसेला आणि काही लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत," इम्फाळमध्ये भेटलेल्या राजकीय शास्त्राच्या अध्यापिका श्रीमा निगोम्बम सांगतात.
 
त्यांच्या अभ्यासाचा विषय मणिपूरच्या महिलांच्या समस्या आहे.
 
"ज्या महिला निर्वासित छावण्यांमध्ये राहताहेत त्यांनी त्यांचं स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि सन्मान पूर्णत: गमावलेला आहे. या महिला गावाकडे निर्सगाजवळ होत्या. त्यावर त्यांची उपजिविका आधारलेली होती. त्यापासून त्या तोडल्या गेल्या. त्यामुळे आता सगळं पूर्वीसारखं होणं, याला खूप वेळ लागेल," श्रीमा म्हणतात.
त्या पुढे जे सांगतात, ते जास्त गंभीर आणि भयानक आहे.
"जर कोणी त्यांच्या मूळ गावाजवळ, त्यांच्या स्वत:च्या परिसरात स्थलांतरित झालं तर तिथं काही नव्यानं सुरू करणं सोपं असतं. पण तुम्ही त्यांना एकदम परग्रहावर वाटावं अशा ठिकाणी, अशा गर्दीत आणून टाकलं तर त्या काय करतील?"
 
"मला ही रास्त भीती वाटते की हे असंच चालू राहिलं, तिथेच अडकले, तर या महिल्यांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ होत जाईल. आणि त्यांना काही आधार मिळाला नाही तर त्यांच्यातल्या काही जगण्यासाठी शरीरविक्रयाकडेही वळतील," श्रीमा बजावतात.
 
निराशा, उद्विग्नता, राग आणि त्याला शस्त्रांची जोड, हे चक्र कसं तुटणार?
मणिपूरमध्ये जे घडलं ते का घडलं, जे अजूनही होतं आहे ते का होतं आहे, याची कारणं शोधण्याचे प्रयत्न आणि दावे एक वर्षांनंतर आजही सर्वत्र होत आहेत. इम्फाळमध्ये, चुराचांदपूरमध्ये, दिल्लीमध्ये आणि इतरत्रही.
 
निमित्त एका न्यायालयाच्या निर्णयाचं झालं, पण त्यासोबतच त्याला वर्चस्ववादाचे, सांस्कृतिक वेगळ