मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 मार्च 2008 (16:24 IST)

कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी आता स्पर्धा

शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीनंतर आता या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. कॉंग्रेसने आपल्याला शेतकर्‍यांची किती कळवळा आहे, हे दाखवायला सुरवात केली, तर विरोधकांनी हा कॉंग्रेसचा जाहीरनामा असल्याचे म्हटले आहे.

कॉंग्रेसच्या 'भाट' खासदारांनी तर सोनियास्तुतीसाठी काहीच कसर काल बाकी ठेवली नाही. कर्जमाफीचा निर्णय होताच, काही नेते हजारो शेतकर्‍यांना घेऊन सोनियांच्या घरी गेले आणि त्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम आजही सुरू होता. आज आलेले शेतकरी इतर राज्यांतील होते.

दुसरीकडे शेतकरी पुत्र, शेतकर्‍यांचा 'जाणता राजा' अशी उपाधी मिळालेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या घटनेचे भांडवल करताना या निर्णयाचे श्रेय आपल्या पक्षाच्या नेत्याला दिले आहे. 'राष्ट्रवादी'ने मोठमोठ्या वर्तमापत्रात जाहिराती देऊन पवारांनी 'वचनपूर्ती' केली असे म्हटले आहे.

पवार हेच शेतकर्‍याचे कसे तारणहार आहेत, हे दाखविण्याची संधी या जाहिरातीत सोडलेली नाही. पवार कॉंग्रेस फोडून पुलोद सरकारचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनीही १९७८ मध्ये कशी कर्ज माफी योजना आणली होती, याचाही उल्लेख जाहिरातीत आहहे. या जाहिरातीत सोनिया गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचेही 'विशेष आभारी' म्हणून फोटो आहेत.

दुसरीकडे शिवसेनेने मुंबईत कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर जल्लोष केला. शिवसैनिकांनी पेढे वाटले. कारण गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी 'देता का जाता' असे आंदोलन करून अवघा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आता निर्णय झाल्यानंतर तो आमच्यामुळेच झाला, याचे श्रेय घेण्यासाठी ते तरी मागे कसे राहातील. त्यामुळे राज्यभर शिवसैनिकांनी या निर्णयात शिवसेनेचा कसा 'हात' आहे, हे दाखविण्यासाठी जल्लोष केला.