रेल्वे अर्थसंकल्पाविषयी काय वाटते?
अत्यंत निराशाजनक ते सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प या टोकाच्या प्रतिक्रिया रेल्वे अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केल्या जात आहेत. सामान्यांसाठी सुविधा दिल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यात फारसे काही नाही, असे मत काहींनी व्यक्त केले. तर नवीन रेल्वेमार्ग, जुन्या मागण्या यांचा विचारच यात केला गेला नाही, असे काही म्हणाले. महाराष्ट्रातून सर्वाधिक पैसे रेल्वेला मिळतात, असे असताना त्या मानाने महाराष्ट्रासाठी कोणत्याही नव्या योजना राबविण्यात आल्या नसल्याची प्रतिक्रिया परभणीच्या डॉक्टर आर आर कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. वयस्कर आणि महिलांना सवलत देण्यात आल्याचे त्यांनी स्वागत केले आहे.तसेच एड्स रुग्णांना प्रवासात सवलत मिळाल्याचेही त्यांनी स्वागत केले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अरुण कचरे यांनीही रेल्वे अर्थसंकल्पाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचा अन्याय केला जात असल्याचे ते म्हणाले. राज प्रकरणाचा फारसा परिणाम अर्थसंकल्पावर दिसून आला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाहतूकी साठी लालूंनी काही सुविधा देणे गरजेचे होते असे सोलापूरच्या विलास आम्ले यांचे मत आहे. मी एक व्यावसायिक आहे, मला नेहमी प्रवास करावा लागतो, माझ्या सोबत मला नेहमी दुकानात लागणार्या सामानाची ने आण करावी लागते, यात काही सवलत देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.रेल्वेचा हा अर्थसंकल्प कसा आहे? तुम्हाला काय वाटते? खाली चौकटीत मत मांडून आपणही या चर्चेत सहभागी व्हा.