मुखर्जींनी आळवला वचनपूर्तीचा राग
संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने किमान समान कार्यक्रात दिलेली वचने पाळल्याचा दावा, हंगामी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज हंगामी अर्थसंकल्प मांडताना केला. युपीएच्या कार्यकाळात प्रती माणशी उत्पन्न ७.४ टक्क्याने वाढल्याकडे निर्देश करताना मंदीने जगाला विळख्यात घेतलेले असतानाही भारताने ७.१ टक्के विकास दर राखून दुसर्या क्रमांकाचा वेगवान विकास साधल्याचे श्री. मुखर्जी यांनी सांगितले. त्याचबरोबर भारताने सलग तीन वर्षे नऊ टक्के विकास दर राखला होता, याचाही उल्लेख त्यांनी केला. शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगून, त्यामुळेच अन्नधान्य उत्पादनात यापूर्वी कधीही नव्हती एवढी वाढ झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकारने यावेळी आर्थिक सर्वेक्षण मांडले नाही. त्याऐवजी श्री. मुखर्जी यांनी युपीए सरकारने सर्वसामान्यांसाठी काय केले याचा आढावा घेऊन ' आगामी निवडणुकीचे युपीएचे मुद्दे' मांडले. सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर नऊ टक्के विकासदराचे लक्ष्यही गाठण्यात येईल, असे त्यांनी वचन दिले.