शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (12:54 IST)

शिवभारत अध्याय तेवीसावा

कवींद्र म्हणाला :-
नंतर ज्याच्या त्याच्या पटक्यानें दोन्ही हात पाठीमागें बांधलेले, उन्हानें म्लानवदन, बोडके, खालीं मान घातलेले, खिन्नमनस्क असे शत्रूकडील सरदार आपल्या सैनिकांनीं ओढून आणून, आपणासमोर गोळा केलेले शिवाजी राजानें पाहिले. ॥१॥२॥
मग शत्रूच्या सैन्यामधून आणलेलीं सोन्याचीं व चांदीचीं नाणीं, पेट्यांमध्यें ठेवलेल्या रत्नांच्या अनेक राशी, तसेच मोत्यांचे हार आणि सोन्याचे पुष्कळ ढीग त्यानें कुबेराच्या वाड्यासारख्या आपल्या कोषागारांत ठेवविले. ॥३॥४॥
पंडित म्हणाले :-
पायदळासह असलेल्या ह्या शिवाजी राजानें अल्लीशहाचें तें सैन्य जावळीच्या अरण्यसागरांत बुडविलें; तोंपर्यंत त्याचा सेनापति घोडदळासह कोठें बरें होता आणि त्यानें काय केलें तें, हें कवींद्रा, सांग. ॥५॥६॥
कवींद्र म्हणाला :-
अफजलखान नामक दानवास ( यवनास ) बळानें मारण्यास सज होऊन शत्रुजेता शिवाजी जेव्हां जावळीकडे निघाला, तेव्हां त्याच्या आज्ञेनें सेनापतीनें त्वरित निघून शत्रूचे प्रांत हस्तगत केले आणि नगरें उध्वस्त केलीं. ॥७॥८॥
इकडे ज्यानें स्वामिकार्यामध्येंच आपले प्राण वेंचिले त्या बाई येथील गर्विष्ठ यवनानें ( अफजलखानानें ) पाठविलेले आपलें हित करणारे व महापराक्रमी असे सरदार शिवाजीचा देश क्रमानें आक्रमूं लागले. ॥९॥१०॥
जाधवानें सुपें प्रांत, पांडर्‍यानें शिरवळ, खराट्यानें सासवड, हिलालानें पुणें हबशी सैफखानानें मराठ्यांनीं व्यापलेलें तळकोंकण यांमद्यें शिरून निग्रहानें ते प्रांत घेतले. ॥११॥१२॥
तेव्हां अफजलखानाच्या आज्ञेनें युद्धपरायण शत्रूंनीं देशाची केलेली दुर्दशा ऐकून, युद्धोत्सुक, प्रख्यात ( श्रीमान् ), स्वामिकार्यनिष्ठ, पराक्रमी, गरूडाप्रमाणें वेगवान असा शिवाजीचा सेनापति सात हजार घोडदळ, तसेंच पायदळ यांसह परतला आणि त्या पराक्रमी सरदारांस जिंकण्याच्या इच्छेनें शिवाजीच्या सुखसंपन्न ( दुःखरहित ) देशांत गेला. ॥१३॥१४॥१५॥
“ खराटे, पांडरे, अजिंक्य जाधवराव, हिलाल आणि सैफखान यांस मी यमसदनास पाठवितों ” अशी ( आपल्या ) सेनापतीची प्रतिज्ञा ऐकून शिवाजीनें स्वतः आपल्या दूतांकरवीं त्यास त्वरित असें कळविलें कीं, ॥१६॥१७॥
“ अफजलखान - नामक दुर्जय यवन दानव सैन्यासह तह करण्याच्या इच्छेनें ह्या जावळीस येत आहे.॥१८॥
म्हणून त्या तहाचा निर्णय होईपर्यंत तूं त्याच्या सैनिकांशीं युद्ध करूं नकोस पण सज्ज मात्र राहा. ॥१९॥
आणि ज्या दिवशीं त्याची व माझी भेट होईल, त्याच दिवशी तूं बाईस निःसंशयपणें जावेंस. ” ॥२०॥
याप्रमाणें शिवाजी राजानें स्पष्ट आज्ञा केल्यामुळें पुढें शत्रूंशीं न लढतां तो मध्येंच राहिला. ॥२१॥
पुढें ज्या दिवशीं शिवाजी व अफजलखान या दोघांमध्यें युद्ध झालें, त्याच्या पुढच्या दिवशींच सेनापति ( नेताजी पालकर ) वाईस आला. ॥२२॥
त्यानें धरले नाहींत, म्हणून ते मुसेखानप्रभृति दुर्जय दानव ( यवन ) दाही दिशांस पळाले. ॥२३॥
पंडित म्हणाले :-
ती ( खडी ) चढण ! ती ( घसरगुंडी ) उतरण ! ती ( बिकट ) वाट ! तें महारण्य ! तो ( भयंकर ) शत्रु ! तो घेर ! ती भीषण रात्र ! तो पूर्ण पराभव ! ती कापाकापी ! ती घाबरगुंडी ! आनि ती असहाय स्थिति ! असें असतां ते ( अफजलसैन्य ) जावळीच्या समंतात् प्रदेशांतून कसे पळाले ? ॥२४॥२५॥
कवींद्र म्हणाला :-
त्या अफजलखानास शिवाजीनें ठार केलें असतां पळणार्‍या यवनांस शिवाजीच्या पदातींनीं चोहोंकडून घेरलें. ॥२६॥
मुसेखान, हसन, याकुत, आणि अंकुश यांस शत्रूंनीं केलेला मोथा अपमान सहन झाला नाहीं. ॥२७॥
तिसर्‍या प्रहरीं त्यांच्या त्यांच्यामध्यें म्हणजे मुसलमान व मराठे यांच्यामध्यें वर उडणार्‍या व खालीं पडणार्‍या शस्त्रांच्या मोथ्या उत्पातामुळें भयंकर असा मोठा संग्राम झाला. ॥२८॥
तो डोंगराळ प्रदेश पदातींस अनुकूल पण घोडेस्वारांस प्रतिकूल होता. म्हणून त्या यवनांचा मोड होऊन ते भीतिसागरांत मग्न झाले. ॥२९॥
एकमेकांशीं एकचित्त होऊन, एकमेकांचें रक्षण करीत, शत्रु अंगावर येईल या बुद्धीनें दाही दिशांस पाहात ते अति धिप्पाड दानव ( यवन ) हत्ती, अति सुंदर घोडे, अपार कोष ( खजिना ) आणि प्रिय परिवारसुद्धां टाकून त्या युद्धांतून पळाले. खिन्न झालेले, तामसबुद्धीचे, झाडांच्या मधून भटकणारे, अत्यंत घाबरलेले, शत्रूंची दृष्टि चुकविणारे कांट्यांनीं सर्वांग विद्ध झालेले, रक्तानें भिजलेले, नष्टवल झालेले, दगडांवर ढुंगण व गुडघे फुटलेले, मार्ग शोधण्यांत गढलेले, अक्षुद्र पण क्षुद्र बनलेले अशा त्या यवनांनीं, घाबरलेला, दृष्टि विफल झालेला, दोनतीनच माणसें बरोबर असलेला व त्वरेनें पळत सुटलेला असा चंद्ररावाचा भाऊ प्रतापराव समोर पाहिला. ॥३०॥३१॥३२॥३३॥३४॥३५॥
तेव्हां सर्व सैनिक एकदम खवळून जाऊन “ ह्यास मारलें पाहिजे ” असें मोठ्यानें म्हणत ते त्यास बोलले :- ॥३६॥
पूर्वीं चुगलखोर म्हणून वारंवार येऊन, नेहमीं खोटें बोलून व आपलें कपट छपवून त्या महासेनापति अफजलखानास आणून आमच्यासह त्याची प्रलयाग्नीच्या मुखांत एकदम आहुति दिलीस. ॥३७॥३८॥
याप्रमाणें बोलून मारण्यासाठीं शस्त्रें उगारलेल्या व क्रुद्ध अशा त्या सैनिकांस त्या प्रतापराव मोर्‍यानें हात जोडून पुनः पुनः प्रणाम केला. ॥३९॥
नंतर तेथें त्यास काकुळतीच्या स्वरानें बोलतांना पाहून मुसेखानानें आपला स्वर हलका करून त्यास अगदीं करुणापूर्वक म्हटलें :- ॥४०॥
मुसेखान म्हणाला :-
हें गहन व दुर्गम अरण्य तूं पूर्वीं पाहिलेलेंच आहे. म्हणून पुढें होऊन ( आमचा मार्गदर्शक होऊन ) कोणत्या तरी मार्गानें आम्हांस बाहेर घेऊन चल. ॥४१॥
वाई प्रांतास गेल्यावर आम्ही तुज प्राणदात्यावर एकनिष्ठ मित्राप्रमाणें प्रेमानें उपकार करूं. ॥४२॥
मुसेखानाच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून  ‘ तसें करितों ’ असें वचन देऊन अत्यंत निश्चिंत होत्साता तो प्रतापराव कोणासहि माहीत नसणार्‍या व पूर्वीं पाहिलेल्या वाटेनें त्यांस शिवाजीच्या प्रांतांतून त्वरित बाहेर घेऊन गेला. ॥४३॥४४॥
तशा प्रकारें धाकट्या भावास टाकून आल्यानें लज्जित झालेला अफजलखानाचा पुत्र, बापानें पूर्वीं वाईस ठेवलेले हत्ती, घोडे, सामग्री, जनाना, खजिना व कांहीं योद्धे घेऊन दुःखित अंतःकरणानें तेथून त्वरित निघून गेला. ॥४५॥४६॥
वेगानें पळून चाललेल्या त्यांचा पाठलाग करूनसुद्धां जेव्हां त्यांची गांठ पडली नाहीं, तेव्हां सेनापति नेताजी पालकर हा पुनः बाईस आला. ॥४७॥
बलाढ्य व प्रतापी शिवाजीहि आपला द्वेष करणार्‍या व अत्यंत दुष्टबुद्धि अल्ली आदिलशाहापासून बलानें देश झटपट हस्तगत करण्यास उद्युक्त होऊन, प्रस्थानदुंदुभीच्या निनादानें दिशा दुमदुमवून, बरोबर पुष्कळ सैन्य घेऊन वाईस प्राप्त झाला. ॥४८॥४९॥
तेव्हां आपल्या प्रभावानें कृष्णाथडी निष्कंटक झालेली व ब्राह्मण आनंदित झालेले पाहून त्यास आनंद झाला. ॥५०॥
मग आपल्या त्या सेनापतीस पुढें पाठवून त्या पराक्रमी शिवाजीनें दुसरा देश आक्रमण करण्यास आरंभ केला. ॥५१॥
पुधें शत्रुसैन्यानें रक्षिलेल्या चंदनवंदन ह्या दोन्ही किल्यांस त्याच्या सैन्यांनीं वेढा दिला. ॥५२॥
साक्षात् लक्ष्मीपति असा तो राजा केवळ नांवानेंच शत्रूंस पळवून लावून लक्ष्मीचें आगर असें जें आलय नांवाचें नगर तेथें प्राप्त झाला. ॥५३॥
नंतर अफजलखानाच्या नाशामुळें धैर्य गळालेल्या, निराधार झालेल्या, नायक नांवाच्या दोघां राजांस जाधवरावासह भोंसल्यांच्या सैन्यानें पुणें प्रांतांतून पिटाळून लावल्यामुळें त्यांणीं, खेलकर्णाचा क्रीतपुत्र जो प्रसिद्ध हिलाल त्यास पुढें करून, ( त्याच्याद्वारें ) अभयदान मिळवून, थोर मनाच्या व अत्यंत कल्याणकारक ( दयाळू ) शिवाजीस शरण येऊन त्याचा आश्रय केला. ॥५४॥५५॥५६॥
नजराणे अर्पण करून प्रणाम करणार्‍या त्या बलवान् ( पराक्रमी ) सरदारांस श्रीमान् शिवाजीनें आपलेपणानें संपत्ति देऊन समृद्ध केलें. ॥५७॥
नंतर खटाव ( खट्वांगक ), माथणी ( मायावनी ), रामापूर - कलेढोण ( कलधौत ), वाळवें ( बाल्लव ), हलजयंतिका, अष्टी ( अष्टि ), वडगांव ( वटग्राम ), वेलापूर, औदुंबर ( उदुंबरं ), मसूर, कर्‍हाड, सुपें ( शूर्पं ), तांबें ( ताम्रं ), पाली ( पल्लिका ), नेरलें, कामेरी ( कामनगरी ), विसापूर ( विश्रामपुरं ), सावे ( सवाहं ), उरण, कोळें ( कोलं ), आणि कोल्हापूर ( करवीरपुरं ) ह्या स्थळांवर बलवान वीरानें सैन्यासह हल्ला करून त्यांजपासून पुष्कळ खंडणी घेतली आणि त्यांस अभय देऊन तीं स्थळें आपल्या सत्तेखालीं आणिलीं. ॥५८॥५९॥६०॥६१॥
मग आपलें सैन्य सभोवतीं योग्य रीतीनें ठेवून त्या राजानें पन्हाळगडास अचानक वेढा दिला. ॥६२॥
गडास वेढा पडलेला पाहून गडकरी ताबडतोब तटावर चढून मेघांप्रमाणें गर्जना करूं लागले. ॥६३॥
त्यांनीं असंख्य शस्त्रांचा, प्रचंड दगडांचा व भयंकर उल्का बाणांचा ( दारूच्या ) शत्रूंवर पाऊस पाडला. ॥६४॥
तोफांच्या तोंडांतून निघून पसरणार्‍या धुराच्या लोटांनीं मेघांप्रमाणें आकाश अगदीं आच्छादून टाकलें. ॥६५॥
नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबाप्रमणें लाल अशा, तोफांमधून सुटणार्‍या लोहगोलांच्या वर्षावानें युद्धास आश्चर्यकारक शोभा प्राप्त झाली. ॥६६॥
विजेप्रमाणें अतिशय कडाडणारे, शिवाजीच्या सैनिकांनीं वर फेंकलेले उल्काबाण तेथें इतके पडले कीं, शत्रूंना त्यांची कल्पनाहि करवेना ! ॥६७॥
नंतर शस्त्रें फिरविणार्‍या त्या समस्त शत्रूंकडून अडविले जात असतांहि शिवरायाचे योद्धे त्या गडाव्र जोरानें चढले. ॥६८॥
चोहोंकडून उड्या मारून हल्ला करणारे व गरूडाप्रमाणें वेगवान अशा शिवसैनिकांच्या घातुक ( भयंकर ) तरवारींनीं व तीक्ष्ण बानांनीं शत्रूंचे प्राण घेतले. ॥६९॥
शिवसैनिकांनीं सोडलेल्या बाणांच्या योगे मरणार्‍या गडकर्‍यांनीं - जणू काय ऋणकोप्रमाणें भोगलेलें धन धनकोस परत दिलें ! ॥७०॥
शत्रूंना असह्य अशा ह्या सह्याद्रीच्या स्वामीशिवाजीनें त्यांच्यापासून बळानें तत्काळ घेतलेल्या त्या विंध्याचलतुल्य पन्हाळगडावर आरूढ होऊन तो पाहिला. ॥७१॥
आपल्या सैनिकांसह पन्हाळगडावर गर्वानें येऊन तेथें सैन्य ठेवून शिवाजीनें ती सबंध रात्र दिवसाप्रमाणें घालवून तट, वाडे, विहिरी, सुंदर बागा, अपार तलाव यांच्या योगें वृद्धिंगत अशी ती गडाची अप्रतिम शोभा वारंवार पाहिलेली असूनहि पुनः पाहिली. ॥७२॥