शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

Covid-19: कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या रोगाला अखेर कोव्हिड-19 हे नाव

आजवर हजारहून अधिक लोकांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या रोगाला अखेर एक नाव मिळालं आहे - Covid-19 (कोविड-19).
 
जागतिक आरोग्य संघटना (WHO)चे प्रमुख टेड्रॉस अॅडहॅनोम गेब्रेयेसोस यांनी जिनेव्हामध्ये एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अजूनही हजारो लोकांना या रहस्यमयी विषाणूची लागण झाली आहे.
 
डॉ. गेब्रेयेसोस यांनी या विषाणूचा जास्तीत जास्त ताकदीने मुकाबला करण्याचं आवाहन केलं आहे.
 
कोरोना विषाणू हा विषाणूंचा एक गट आहे. तो नवीन प्रकार नाही. इंटरनॅशनल कमिटी ऑफ टॅक्सोनॉमी ऑफ व्हायरस या संघटनेने कोरोना विषाणूला SARS-CoV-2 असं नाव दिलं आहे. या विषाणूच्या नावामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी संशोधकांनी ही नामावली सुचवली आहे.
 
"ज्या नावात कोणत्याही देशाचा उल्लेख नसेल, प्राण्याचं, एखाद्या व्यक्तीचं, गटाचं नाव नसेल, उच्चारायला सोपं असेल आणि या रोगाशी निगडीत असेल असं नाव आम्हाला हवं होतं," जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं.
 
"एखादं विशिष्ट नाव असेल तर गोंधळ होत नाही. अशा प्रकारचं संकट पुढे उद्भवल्यास संशोधन करण्यास सोपं जातं."
 
या रोगाला दिलेलं नाव Corona, Virus आणि Disease या तीन शब्दांतून घेतलं आहे.
 
ह्या रोगाचा प्रादुर्भाव 2019 मध्ये सुरू झाला. (31 डिसेंबरला जागतिक आरोग्य संघटनेला या रोगाच्या प्रादुर्भावाची कल्पना देण्यात आली होती.)
 
चीनमध्ये सध्या या विषाणूची लागण 42,200 लोकांना झाली आहे. सार्स या रोगाने 2002-03 मध्ये हैदोस घातला होता. त्यापेक्षाही ही साथ भयंकर आहे.
 
सोमवारी हुवैई प्रांतात 103 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत व्यक्तींची संख्या आता 1,016 झाली आहे. त्याचवेळी नवीन रुग्ण उजेडात येण्याचं प्रमाण 20 टक्क्याने कमी झालं आहे.
 
हे संकट हाताळण्यात अपयश आल्याच्या कारणावरून चीन प्रशासनावर सातत्याने टीका होत आहे. ज्या डॉक्टरने या रोगाचा इशारा दिला होता, त्या डॉक्टरचाच या रोगाने मृत्यू झाला. त्यामुळे तेथील जनता आणखीच संतप्त झाली. आरोग्य विभागातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
जागतिक पातळीवरील अनेक शास्त्रज्ञ या रोगाशी लढा देण्याच्या दृष्टीने जिनेव्हात एकत्र आले आहेत. या रोगाशी लढण्यासाठी योग्य लोकांची नियुक्ती केली तरी या रोगाशी चांगल्या प्रकारे लढता येईल, असा विश्वास WHOच्या प्रमुखांना वाटतो.
 
चीनने केलेल्या उपाययोजनांमुळे जगाच्या इतर भागात हा रोग जास्त प्रमाणात पसरला नाही, असं त्यांचं मत आहे.