बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. दिलीप चित्रे
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2009 (17:45 IST)

बहुआयामी व्यक्तिमत्व

- चंद्रकांत देवताले

ND
ND
मराठीतील ख्यात कवी दिलीप चित्रे यांच्या निधनाने मी व्यथित झालो आहे. त्यांचे जाणे ही माझी व्यक्तिगत हानीही आहे. भारतीय सृजनशील परिप्रेक्ष्यात ते बहुआयामी सर्जनशील आणि फार मोठे कवी होते. गेल्या काही वर्षांपासून आजारी असतानाही त्यांची सर्जनशीलता तितकीच उत्फुल्ल होती. म्हणूनच अनेक पेंटिंग्जही ते करत होते. मानवी संस्कृती संदर्भात उत्पन्न होणार्‍या धोक्यांबाबत ते फारच सावध होते, शिवाय त्या विरोधात ते आपल्या कवितांमधूनही त्यावर भाष्य करत होते. महाराष्ट्रात मनसेविरोधात त्यांनी आपला विरोध कोणत्याही दबावाविना व्यक्त केला.

मराठी व इंग्रजीत लिहिलेल्या त्यांच्या कविता खूप वाचल्या गेल्या. त्यांच्या कवितांचे भारतीय आणि परदेशी भाषांतही अनुवाद झाले. मीही त्यांच्या कवितांचे हिंदीत अनुवाद केला. 'दिलीप चित्रे की कविताएँ' या नावाने त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे. कवितांसह त्यांनी अनेक साहित्यकृतींचे अनुवादही केले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या अनेक कलाकृती त्यांनी इंग्रजीत नेल्या. त्यांच्या या कामाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले.
बडौद्यात १९३९ मध्ये जन्मलेल्या
दिलीपजींनी गोदान नावाचा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटही बनविला. त्याचे कौतुकही बरेच झाले. त्यांनी फोटोग्राफीही केली. परदेश प्रवासही बरेच केले. त्यांची प्रवासवर्णने वाचण्यासारखी आहेत. त्यांनी इंग्रजीत 'मेकिंग लव्ह लाईक ए हिंदू' ही कादंबरी लिहिली. भोपाळच्या भारत भवनमध्ये १९८४ ते ८६ पर्यंत ते संचालक म्हणूनही होते. साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांची ग्रुप फोटो नावाची कविता विलक्षण आहे. ती खूप लोकप्रिय झाली. मुंबईवर लिहिलेल्या या कवितेत ऐतिहासिक, आर्थिक व सामाजिक परिप्रेक्ष्यात मुंबई कुणा एका समूहाची नाही, तर ती विकसित करण्यात मोठी सामूहिक शक्ती सहभागी आहे, असे म्हटले आहे. प्रख्यात बंगाली साहित्यिक महाश्वेता देवी यांनीही दिलीपजींचा मराठी परंपरेचे पुरूषार्थ असा गौरव केला होता. (शब्दांकन- रवींद्र व्यास)

((श्री. देवताले हिंदीतील प्रख्यात कवी असून त्यांनी अनेक मराठी साहित्यकृतींचे हिंदीत अनुवाद केले आहेत.)