शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑगस्ट 2020 (07:12 IST)

गणपतीच्या रूपाचे महात्म्य, गणेशमूर्ती आपणास अनेक संदेश देते

गणपती म्हटलं की त्याच्या मोहक कल्पनेच आपण भरावून जातो. तसं बघितलं तर गणपतीचं मोठं पोट, सोंड, एकदंत, आणि वाहन मूषक असलं तरी त्याला अतिशय गहन आध्यात्मिक अर्थ आहे. खरं तर गणपती आणि त्याची आभूषणे सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या आधारावर स्पष्ट होतात.
 
हत्तीचं डोकं
हत्ती बुद्धिमान प्राणी मानला जातो. हत्ती विशाल असतो आणि स्मृती अतिशय तल्लख असते. हत्ती सदैव आत्मविश्वासाने भरपूर आपल्याच मस्तीत आणि शाही थाटात चालत राहतो. त्याचप्रकारे ज्ञानी आणि योगी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत ती गर्भगळीत होत नाहीत. 
    
हत्तीची सोंड
हत्तीची मजबूत सोंड वृक्षही उखडते आणि सन्मान देण्याची वेळ आल्यावर सलाम करण्यासाठी वरही जाते. हत्तीच्या या सोंडेसारखी शक्ती सत्यज्ञान धारण करणाऱ्या माणसात असते.
 
सुपासारखे कान
मोठे कान हे एकाग्रतेचे प्रतीक आहेत. कान हे आपल्या शरीरातील मुख्य ज्ञानेंद्रिय आहे. गुरू मंत्र कानातच देतात. ज्ञानश्रवण देखील लक्षपूर्वत ऐकण्यासाठी कानात प्राणात आणावे लागतात. ज्ञानसाधनेत श्रवण, मनन व निदिध्यास हे तीन पुरुषार्थ सांगितले आहेत.
 
हत्तीचे डोळे
गणेशाच्या मूर्तीत हत्तीसारखे डोळे चित्रित आहे कारण या डोळ्यांना छोट्या गोष्टी मोठ्या दिसतात. हत्तीला लहान गोष्टी दिसल्या नाहीत तर त्या पायाखाली तुडविल्या जाण्याची भीती होती. ज्ञानी व्यक्तीदेखील छोट्यांमध्येही मोठेपण पाहतं. प्रत्येकातील महानता बघून त्याचा आदर करायला हवा.
 
एकदन्त
गणपतीचा एक सुळा दुष्ट लोकांना भीती दाखविण्यासाठी आहे. कारण सरळमार्गी चालणार्‍यांना त्रास देणं सोपं आहे असे समजणे नुकसान करेल. 
 
गजवदन
हत्तीचे तोंड, कान, डोळे सर्व एकत्र होऊन तोंड तयार होते. विशाल तोंड निर्भयता आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते.
 
महोदर
चांगल्या आणि वाईट अशा सगळ्या गोष्टी सामावून घेणार्‍याला मोठं पोट असणारच. यांना सांगितलेले तिसऱ्या व्यक्तींपर्यंत जाणार नाही याची खात्री असते. या प्रकारे पोटातल्या पोटात गोष्टी पचविल्या तर संबंध चांगले जमतात. ज्ञानी व्यक्ती निंदा, स्तुती, जय, पराजय, उच्च - नीच अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती आपल्याला सामावून घेतात. मोठे पोट हे ज्ञानवानाच्या या गुणाचे प्रतीक आहे.
 
एका हातात कुऱ्हाड
गणपतीच्या चार भुजांपैकी एका हातात कुऱ्हाड असते. हे मुक्तता हे प्रतीक आहे. ज्ञानी व्यक्ती मोहाची बंधने कापतात, वाईट गोष्टी मुळातून उखडण्याची क्षमता ठेवतात. अशाने जीवनमुक्ती प्राप्त करू शकतात. 
 
दुसऱ्या हातात दोरी
दुसऱ्या हातात दोरी दर्शवते की ज्ञानरुपी कुऱ्हाडीने दैहीक बंधने कापून टाकल्यावर स्वत:ला दिव्य बंधनात बांधावे. ही दोरी सरळ परमात्म्याशी जुळते. 
 
एका हातात मोदक
मोदक परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे. मोदकाचा गोडवा तेव्हा जाणवतो जेव्हा ज्ञानी अनेक संकटांचा सामना करुन तपस्वी होतो. स्वत: उंची गाठतो आणि त्याभोवती असणार्‍यांना देखील त्याचा लाभ होतो. मोदक हे ज्ञाननिष्ठा, ज्ञानरस तसेच ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित अवस्थेचा परिचय देणारे आहे. कोणतेही मनोरथ पूर्ण झाल्यास मोदक किंवा लाडू वाटप करुन आनंदा साजरा केला जातो. थोडक्यात मोदक बुद्धी, परिश्रम आणि तपस्याच्या बळावर यश मिळवण्याचे सूचक आहे. 
 
वरदमुद्रा
गणपतीचा एक हात वरदानी असणे सामर्थ्यशाली आणि पात्र असल्याचे प्रतीक आहे. निर्भयतापूर्वक वरदान देण्याइतकं सामर्थ्य असल्याचं दर्शवतं. 
 
बैठक
गणपतीचे बसणेही असे आहे की त्यांचा एक पाय उचललेला आहे व दुसरा उचलण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ ते नेहमी भक्ताच्या रक्षणासाठी तत्पर वा सिद्ध आहेत.
 
मूषक वाहन
विशाल काया आणि इतका मोठा ज्ञानी याचे वाहन मात्र मूषक हे कित्याने पचनी पडत नाही. परंतु याला आध्यात्मिक अर्थ असा लावता येईल की उंदीर आपला प्रत्येक गोष्ट कुरतडून पाहतो, तेव्हा ती गोष्ट कामाची आहे वा नाही की महागडी असो वा स्वस्त. अर्थात समाजात प्रत्येक गोष्टीवर टीका करणारे असतात. अशा प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी गणपतीचा वाहन मूषक असणे म्हणजे विवेकाचा अविवेकावर विजय सुचविण्याचे द्योतक आहे.
 
रिद्धी- सिद्धी
गणेशाच्या दोन्ही बाजूस रिद्धी आणि सिध्दी या दोन पत्नी असतात. त्या ज्ञान आणि त्याच्या आधारावरील सफलतेच्या प्रतीक आहेत. ज्ञानी दूरदर्शिपणाने कोणतेही कार्य करतात आणि निश्‍चितपणे त्यांना सिद्धी वा यश प्राप्त होतं.
 
केळीचं पान
गणपतीला केळीच्या पानावर नैवेद्य दाखवलं जातं. किंवा गणपतीच्या चित्रात केळी दाखवितात. केळीच्या झाडाची विशेषतः म्हणजे त्याचे एक पान काढले की त्याच्या मागे दुसरे असते, नंतर तिसरे असते. तसेच ज्ञानी कोणत्याही गोष्टीच्या खोलात जातात. 
 
स्वस्तिक
हे चिन्ह मंगलमयतेचे प्रतीक आहे. देवतांच्या आगमनाचे सुचिन्ह मानले जाते. स्वस्तिकाच्या उजव्या अर्ध्या भागात अमरलोक दाखविलेला आहे. त्यालाच स्वर्ग म्हणतात. 
 
एकूण गणपतीचे हे गुण धारण करून सर्व संकटांना सामोरा जाऊन स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करता येते.