गुलालवाडी व्यायामशाळेची वैभवशाली परंपरा
- जितेद्र तरटे
प्रत्येकावर काळाचा प्रभाव असतो. याला तरुणाईही अपवाद नसतेच. जागतिकीकरणाच्या या युगात लाईफ स्टाईल बदलत आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळही असाच होता. इंग्रजांच्या अत्याचाराला झुगारून लावण्याच्या ध्येयाने देशातली तरुण पिढी इथून-तिथून झपाटली होती. राष्ट्र कार्य करायचे तर विचारासोबत कृतीही महत्त्वाची. येईल त्या परिस्थितीला सामोरे जायचे तर शारीरिक बळही तितकेच महत्त्वाचे, यासाठी जुन्या नाशकाच्या गल्ली बोळातून सोमवार पेठेतील श्रीधर गायधनी यांच्या वाड्यात व्यायामाच्या निमित्ताने समविचारी तरुण एकत्र येण्यास सुरुवात झाली.गायधनींना स्वतःला व्यायामात रस होता. ध्येयाने प्रेरित झालेल्या तरुणांना त्यांनीही हिरीरीने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. पुढे पुढे याच वाडात शिस्तबध्द व्यायामास सुरुवात होऊन रोजच कुस्तीचे आखाडे, कबड्डी, रस्सीखेच, सूर्यनमस्कार, दंड, बैठका, जोर आदी व्यायाम प्रकार व क्रीडा प्रकार रंगू लागले. यातून निर्माण झालेल्या प्रतिमेमुळे दिवसेंदिवस या वाडात तरुणांची संख्या वाढतच राहिली... नकळत रोवल्या गेलेल्या बिजातून कित्येक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेली, राष्ट्रकार्यात ध्येयवान तरुणांना प्रसवलेली आणि शरीरबळासोबत मनाचीही मशागत करून राष्ट्रास संस्कारित तरुण पिढी देणारी ऐतिहासिक व्यायामशाळा जन्मास आली. नाशिकचा किंवा नाशिकच्या गणेशोत्सवाचा इतिहास जिच्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही ती 'गुलालवाडी व्यायाम शाळे'च्या जन्माची ही कहाणी.व्यायामशाळेत नियमित येणार्या युवकांच्या व्यायाम अनुसंधानास स्वातंत्र्याच्या विचारांचा स्पर्श झालेला असल्याने समाजात व्यायामशाळेविषयी आदराची प्रतिमा निर्माण झाली होती. यामुळे व्यायामशाळेत जाणार्या तरुणांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही सकारात्मक होता. १९२१ साली कोठावरचे गायधनी यांनी व्यायामासाठी मैदान उपलब्ध करून दिले. येथे आजची व्यायामशाळा उभी राहिली. या व्यायामशाळेच्या जडण-घडणीसाठी अनेकांचे योगदान लाभले.या व्यायामशाळेतील विशेष उल्लेखनीय ऐतिहासिक घटना म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यायामशाळेस दिलेली भेट. या भेटीत स्वातंत्र्यवीरांनी तरुणांना बंदूक चालविण्याची कल्पना मांडली. याच दरम्यान 'लेखण्या मोडा, बंदुका जोडा' असे आवाहन त्यांनी सशस्त्र क्रांतीस चालना मिळण्यासाठी केले होते. त्यांच्याच प्रेरणेने येथे त्या काळात तब्बल २०० तरुणांना बंदुकांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली होती. ही ऐतिहासिक घटना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरूजी यासारख्या महान राष्ट्रपुरुषांनी येथील तरुणांचे स्फुलिंग चेतविण्यासाठी येथे येऊन आपल्या विचारांचेही योगदान दिले.
निर्माण झालेल्या आदर्श व्यायामशाळेची परंपरा आजतागायत पुढील पिढ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे जिल्हाबाहेरील वर्तुळातही नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेचा दबदबा कायम आहे. आधुनिक काळाशी स्वतःस अधिक सुसंगत करून घेत येथे येणार्या विविध वयोगातील मुलांना घडविण्याचे शक्तीकेंद्र म्हणून या व्यायामशाळेची ओळख कायम आहे. येथे सध्या चालविण्यात येणार्या विविध उपक्रमांमध्ये स्केटिंग, ज्युदो-कराटे प्रशिक्षण, कबड्डी इतकेच नव्हे तर रायफल शुटिंगचेही प्रशिक्षण व्यायामशाळेतर्फे देण्यात येते. याशिवाय मुलांसाठी वासंतिक शिबिराचे आयोजन एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान करण्यात येते. येथे मुलांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात येते. या व्यायामशाळेने आजवर देशास आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडूही दिले आहेत. विशेष म्हणजे, व्यायामशाळेत केवळ शारीरिकदृष्टा असाच निकष न लावता मतिमंद मुलांनाही विविध शिबिरांमध्ये सहभागी करून घेण्याचे समाजकार्य करण्यात आले आहे. हा उपक्रम सध्याही सुरू आहे. मानाचा शहरातील तिसरा गणपती म्हणून लौकिक असलेल्या व्यायामशाळेचा शिस्तबध्द मिरवणुकीच्या वैशिष्टांमुळे अनेकदा नामांकित संस्थांनी गौरवही केला आहे. येथील गणेशोत्सवात सर्वधर्मीयांचा असणारा सहभाग हे देखील गुलालवाडी व्यायामशाळेचे वैशिष्ट आहे. यंदाच्या गणेशोत्वाच्या मिरवणुकीची वैशिष्टे म्हणजे वाद्यपथकामध्ये ४०-५० महिलांचा सहभाग असणार आहे व अशी सुमारे १२५ पथके सादर करण्यात येणार आहेत. या मिरवणुकीदरम्यान लेझीम पथके आदी आकर्षणाबरोबरच स्केटिंग, भरतनाटम्, ज्युदो कराटे आदी क्रीडा प्रकारही सादर करण्यात येणार आहेत.