रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (11:57 IST)

या गणेशमूर्ती प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात, एकाच ठिकाणी आहेत 6000 गणेश मूर्ती

-नितेश राऊत
अमरावती जिल्ह्यातील चिखलदराजवळ एक अनोखं मूर्ती संग्रहालय आहे. तिथं तब्बल 6000 पेक्षाही अधिक नक्षी काम केलेल्या मूर्ती आहेत.
 
इंडोनेशिया, नेपाळ, सिंगापूर, चीन, बँकॉकसह वेगवेगळ्या देशांमधून आणलेल्या गणेशमूर्ती तिथं लोकांना पाहाण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
 
अकोला येथील व्यावसायिक प्रदीप नंद यांनी हे संग्रहालय उभारलं आहे. बालपणापासून त्यांनी या मूर्ती गोळा गेल्या आहेत.
 
एकएक करून तब्बल दोन हजार मूर्ती संकलित केल्यांनतर त्या ठेवायच्या कुठे असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. तेव्हा त्यांना या संग्रहालयाची संकल्पना सुचली
 
ते म्हणतात “ मला अगदी बाल वयापासून गणेश मूर्ती आकर्षित करायची. त्यामुळ मिळेल तेथून गणेश मूर्ती उचलून घरी आणायचो. सावर्जनिक गणेश मंडळाचे ज्यावेळी सदस्य होतो तेव्हाही विविध प्रकारचे गणपती निवडण्यासाठी मी जायचो. तेव्हापासूनच गणपती संकलनाची आवडणं निर्माण झाली, ती आजतागायत निरंतर सुरू आहे.”
“जेव्हा 2000 गणेश मूर्ती घरात आणल्या तेव्हा आणखी मूर्ती ठेवायच्या कुठे असा प्रश्न होता. मग चिखलदऱ्यात आमची जमीन होतीच, तेव्हा ती जमीन न विकता, संग्रहालय सुरू केलं,” नंद सांगत होते.
 
चिखलदरा नजीक मोथा या गावाजवळ 2021 मध्ये जवळपास 2.50 एकरात हे संग्रहालय उभारण्यात आलं. वेगवेगे धातू, काच, माती, दगड, लाकूड तसंच पेन्सिलसह वेगवेगळ्या वस्तूंपासून तयार करण्यात आलेले गणपती इथं ठेवण्यात आले आहेत.
 
सलमान खानच्या वॉन्टेड या चित्रपटात वापरण्यात आलेली 21 मुखी गणरायाची मूर्तीसुद्धा इथं ठेवण्यात आलीय.
 
आसाम, वाराणसी, ओडिशा, कर्नाटक, केरळसह इतर राज्य आणि शहरांमधल्या वेगवेगळ्या शैलीतील गणपतींच्या मूर्ती नंद यांनी जमा केल्या आहेत.
 
काश्मीरचे राजे करणसिंह यांच्या काळातील बेगलबॉक्सवरील गणपतीची मूर्ती या संग्रहालयात आहे. श्रीलंकेतून आणलेली दहा हातांची तसंच कोणार्कच्या मंदिरासाठी वापरलेल्या दगडापासून बनवलेली गणेश मूर्ती या संग्रहालयात आहेत.
 
नंद यांच्या संग्रहालयात आता काही लोक स्वतःहून गणपती मुर्ती आणून देतात. कोलकात्यातल्या एका महिला वकीलने अडीच फुटाची सुंदर गणेश मूर्ती संग्रहालयाला भेट दिली आहे.
 
या संग्रहालयात चार दालनं आहेत.
 
गणपतीची विविध नाणीही याठिकाणी बघायला मिळतात.
खेळ खेळणारा, सनई, तबला, हार्मोनियम वाजवणारा, वाचन करणारा अशा गणपती आपल्याला इथं पाहायला मिळतो.
 
गणेशाच्या काही पेंटिंग्जही इथं ठेवण्यात आल्या आहेत.
 
अतिशय सूक्ष्म म्हणजे दुर्बिणीतून पाहता यावे इतके सूक्ष्म गणपतीही इथे आहेत. तीळावर, मोहरीवर, पेन्सिलच्या टोकावर, तांदळावर आणि औषधांचा गोळ्यांवर कोरलेल्या गणेशमूर्ती इथलं आकर्षण आहेत.
 
संग्रहालय उभारण्यात मित्र माधव देशपांडे यांच मोठं सहकार्य लाभल्याचं नंद सांगतात.
 
माधव देशपांडे बीबीसी मराठीशी बोलतांना सांगतात, “गणपतीच्या 64 कला आणि 21 विद्या याठिकाणी साकारण्यात आल्या आहे. 64 कला जशा आहेत तश्याच गणेश मूर्ती इथं आहेत.”
 
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनेही या संग्राहलयाची नोंद घेतली आहे.