शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (11:33 IST)

कार्तिक पौर्णिमा पूजा विधी आणि कथा

भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. 
 
कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात. 

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ म्हणूनही संबोधलं जातं. या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.
 
या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात अर्थात उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.
 
कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते. 

या दिवशी गंगा स्नान, दीपदान, होम, यज्ञ आणि उपासना करण्याबाबत शास्त्रात नमूद केले आहे.
 
कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र असल्याचे मानण्यात येते. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्याने भगवान श्री शंकर व त्यांच्या परिवाराची विशेष अनुकंपा प्राप्त होते.
 
या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. या दिवशी लक्ष्मी-नारायण पूजन तसेच शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही करणे उत्तम मानले गेले आहे. कार्तिक पौर्णिमेला आवर्जुन दीपदान करावे.
 
बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.
 
या दिवशी काय करावे- 
सकाळी उठून ब्रह्मा मुहूर्तमध्ये गंगा नदीत स्नान करावे. असे शक्य नसल्यास घरात अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे.
भगवान विष्णुची उपासना करावी. श्री विष्णु सहस्त्रनाम वाचावं किंवा भगवान विष्णु यांचे मंत्र वाचावे.
श्री शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय ह्यांची पूजा अवश्य करावी.
या दिवशी शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे पूजन करावे.
‘नमो हंस अनंत साहित्य सहंग्य, सहस्त्रक्षक्ष शिरो बहाव
सहस्त्र नाम पुरुष सशतेता, सहस्त्रकोटी युग धरत नमह.’
शक्य असल्यास घरात हवन करवावे.
संध्याकाळी मंदिरात जाऊन दिवा लावावा.
गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई व तांदूळ ह्यांचे दान जरूर करावे.
या दिवशी शिव आणि विष्णुची भेट होते म्हणून बेल, तुळस वाहून पूजा करण्याची प्रथा आहे.
 
कथा
या दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.
 
प्राचीन काळात तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी एक लाख वर्षांपर्यंत प्रयागराज येथे कठोर तपश्चर्या केली. थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. त्यांनी ब्रह्मांकडून कधीही नष्ट न होण्याचे वर ‍मागितले आणि त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानांची मागणी केली. ही तीन स्थानं ‘त्रिपुरे’ म्हणून ओळखली जायची.
 
दिलेल्या वर प्रमाणे हजारो वर्षांनी जेव्हा मध्यान्ह समयी, अभिजीत मुहूर्तावर, चंद्र- पुष्य नक्षत्रावर ही शहरे एका ठिकाणी यावीत तेव्हा आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट होऊ शकतील, नाहीतर ती कधीही नष्ट होणे शक्य नव्हते.
 
हे वरदान मिळाल्यावर त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. देवांनी मदतीसाठी महादेवांचा धावा केला आणि त्यांनी एका बाणात त्रिपुरीचा संहार केला.