37 वर्षांची महिला 38 मुलांची आई
एखादी स्त्री तिच्या वयापेक्षा जास्त मुलांची आई असू शकते? याचे उत्तर तुम्ही नक्कीच नाही असे द्याल पण मरियमची कहाणी मात्र तुम्हाला तुमचे विचार बदलायला भाग पाडेल. युगांडाची रहिवासी असणारी 37 वर्षांची मरियम नबातांजी तब्बल 38 मुलांची आई आहे. या सर्व मुलांनी तिच्याच उदरातून जन्म घेतला. मरियमने तिच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला तेव्हा ती केवळ 13 वर्षांची होती. वयाच्या 12 व्या वर्षींच तिचा विवाह झाला होता. युगांडाच्या मुकोनो जिल्ह्यातील कबिम्बिरी गावात राहणार्या मरियमला स्थानिक लोक मुले तयार करणारी मशीन म्हणतात.
मरियमने आत्तापर्यंत सहा वेळा जुळ्या, चार वेळा तिळ्या आणि तब्बल तीन वेळा चार मुलांना एका वेळी जन्म दिला. मरियमच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनाही वेगवेगळ्या महिलांपासून तब्बल 45 मुलं होती. त्यांचेच जीन्स मरियममध्ये असल्याने ती इतक्या मोठ्या संख्येत मुलांना जन्म देऊ शकली असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुलांची संख्या वाढल्यानंतर चिंताग्रस्त मरियमने डॉक्टरांचाही सल्ला घेतला होता. परंतू डॉक्टरांनी यामुळे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो असे सांगत बर्थ कंट्रोलसाठी नकार दिला होता. परंतू डॉक्टरांचा हा सल्ला अगदी चुकीचा होता असेही इतर काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.