गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (11:27 IST)

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गुन्हा दाखल, अमेरिकेत नेमकं काय सुरू, जाणून घ्या 7 प्रश्नांची उत्तरे..

donald trump
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका प्रकरणात गुन्हेगारी आरोप लावण्यात आले आहेत.
या प्रकरणात न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरींनी परवानगी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही केली जात आहे. या प्रक्रियेला इंडिक्टमेंट असं संबोधलं जातं. या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प हे अशा प्रकारे गुन्हा दाखल होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष (विद्यमान किंवा माजी) ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावण्यात आलेले आरोप अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
 
त्यामुळे जिल्हा सरकारी वकिलांचा त्यांच्यावर आरोप करण्याचा हेतू काय आहे, हे अद्याप स्पष्टपणे समजू शकलेलं नाही.
 
हे आरोपपत्र येत्या मंगळवारी (4 मार्च) उघड केलं जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
 
परंतु, हे प्रकरण 2016 च्या प्रचारादरम्यान प्रौढ-चित्रपट स्टारला देण्यात आलेल्या पैशांबाबतचं आहे, असं सांगितलं जात आहे.
 
संबंधित पॉर्न स्टारला तिचे ट्रम्प यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याबाबत मौन बाळगण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली, असा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे.
 
या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सध्या काय सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी खालील 7 प्रश्नांची उत्तरे आपल्याला जाणून घ्यावी लागतील.
 
1. इंडिक्टमेंट म्हणजे काय?
अमेरिकेतील ग्रँड ज्युरींनी गुरुवारी (30 मार्च) डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इंडिक्टमेंट करण्याच्या बाजूने मतदान केलं.
 
इंडिक्टमेंट म्हणजे औपचारिक लेखी आरोप किंवा अभियोग असाही असा याचा अर्थ होतो.
 
थोडक्यात, गुन्हा दाखल करणे, असंही या प्रक्रियेला संबोधलं जाऊ शकतं.
 
इंडिक्टमेंटमध्ये गुन्ह्यात दाखल आरोपांसंदर्भात सविस्तर माहिती असते. यामध्ये गंभीर गुन्हेगारी आरोपांचाही समावेश असतो.
 
या अंतर्गत दाखल गुन्ह्यात एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
 
अमेरिकेत इतर कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणांपेक्षा हे प्रकरण वेगळं मानलं जातं. कारण यासंदर्भात येथील ग्रँड ज्युरींकडून मतदान घेऊन मगच आरोप निश्चित करायचे किंवा नाही, याचा निर्णय घेतला जातो.
 
मग, आता आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे हे ग्रँड ज्युरी नेमके कोण असतात?
 
तर, ग्रँड ज्युरी म्हणजे नागरिकांचा असा एक गट जो साक्षीदारांच्या साक्षीसह पुराव्यांचं निरीक्षण करतो.
 
संबंधित बाबी एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशा आहेत की नाही, हे ठरवण्याचे अधिकारी ग्रँड ज्युरींकडे असतात.
2. ट्रम्प यांना अटक होणार का?
इंडिक्टमेंटच्या आरोपांनंतर नेहमी अटकेचीच कारवाई होते, असं नाही.
 
परंतु, सरकारी वकिलांनी ट्रम्प यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यात बोलणी झाली.
 
यानंतर, माजी राष्ट्राध्यक्षांच्या टीमने आणि इतर तज्ज्ञांनी सांगितलं की ते मंगळवारी स्वतःहून शरण जातील.
 
मात्र, ही प्रक्रिया नेमकी कशी होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.
 
परंतु, ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना इतर गुन्हेगारी प्रकरणांप्रमाणेच सर्व टप्प्यांमधून जावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
म्हणजे, एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात येत असताना त्याच्या हातात बेड्या ठोकल्या जातात, त्या पद्धतीने कायद्यानुसार ही कारवाई केली जाऊ शकते.
 
शिवाय, या दरम्यान त्यांना 'पर्प वॉक'लाही सामोरं जावं लागणार आहे.
3. 'पर्प वॉक' म्हणजे काय?
सदर आरोपांनंतर ट्रम्प हे मंगळवारी स्वतःहून आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.
 
पण, त्यानंतर सर्वप्रथम त्यांना न्यूयॉर्कच्या न्यायालयात जावं लागेल.
 
तिथे जात असताना त्यांना प्रथम न्यायालयाबाहेर जमलेल्या पत्रकारांच्या गर्दीतून जावं लागेल. या प्रक्रियेला "पर्प वॉक" असं संबोधलं जातं.
 
पर्प म्हणजे पर्पेट्रेटरचं लघु रुप आहे. इंग्रजीत पर्पेट्रेटरचा अर्थ गुन्हेगार असा होतो.
 
यादरम्यान, काही गुन्हेगारांना पोलीस पकडून नेतात, तर काहीवेळा त्यांना एकटेच जाण्यास सांगितलं जातं.
 
अमेरिकेत पर्प वॉकदरम्यान केलं जाणारं गुन्हेगारांचं चित्रीकरण करण्याला प्रचंड महत्त्व आहे. एकूणच हा संपूर्ण प्रकार माध्यमांसाठी अविस्मरणीय मानला जातो.
 
हॉलिवूडमधील एक माजी चित्रपट निर्माता हार्वे वाईन्सटाईन याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप होते. अटकेनंतर, वाईन्सटाईनला न्यूयॉर्क पोलिसांत नेण्यात आलं, तो क्षण अजूनही MeToo चळवळीच्या दृष्टीकोनातून सर्वात लक्षवेधी असा ठरला होता. आजही या चित्रीकरणाचा उल्लेख MeToo चळवळीबाबत आयकॉनिक दृश्ये म्हणून केला जातो.
 
आणखी एका प्रसिद्ध पर्प वॉकमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडचे (IMF) माजी प्रमुख डॉमिनिक स्ट्रॉस-कान यांचा समावेश होतो.
 
स्ट्रॉस-कान यांच्यावर मोलकरणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.
 
प्रतिष्ठेच्या पदावर काम करणारे स्ट्रॉस-कान पर्प वॉकदरम्यान घामाघूम आणि थकलेले दिसत होते.
 
नंतर त्यांनी तक्रार केली की अशा प्रकारे हातात बेड्या ठोकून माध्यमांसमोर परेड काढणं हा प्रकार अन्यायकारक आहे.
 
याबाबत अमेरिकन वृत्तवाहिनी CNN शी बोलताना 2013 साली त्यांनी म्हटलं होतं, "जोपर्यंत तुम्ही न्यायालयामार्फत दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही निर्दोषच आहात, असं मानलं जातं. मात्र, पर्प वॉकमधून जात असलेला प्रत्येक आरोपी हा गुन्हेगार असल्याचं दर्शवण्यात येतं. त्याच्यावरील आरोप खरे की खोटे हे त्यावेळी कुणालाच माहीत नसतं.”
 
डॉमिनिक स्ट्रॉस-कान यांच्यावरील आरोप नंतर मागे घेण्यात आले. पण, त्यांना या प्रकरणानंतर नोकरी सोडावी लागली होती. नंतर फिर्यादीसोबत काही गुप्त रकमेचा व्यवहार करून हे प्रकरण निकाली काढण्यात आलं होतं.
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱ्यांनीही पर्प वॉक केल्याचं दिसून येतं.
 
योगायोगाने, कधीकाळी ट्रम्प यांचे कायदेविषयक सल्लागार असलेले माजी यूएस अटर्नी रुडी जिऊलियानी यांनीच 1980 आणि 90च्या दशकात पर्प वॉकची संकल्पना लोकप्रिय केली होती.
 
आरोपीला माध्यमांसमोर हातात बेड्या ठोकून उभं केल्यास त्याच्या जनमानसातील प्रतिमा आणि जनसंपर्क मूल्यांवर त्याचा नक्की परिणाम होतो, हे त्यांना माहीत होतं.
 
4. ट्रंप यांना जामीन मिळू शकतो का?
एखाद्या खुल्या न्यायालयात ट्रम्प यांच्यावरील आरोपांचं वाचन केलं जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.
 
यानंतर ट्रम्प किंवा त्यांच्या वकिलांना गुन्हा मान्य आहे किंवा नाही, हे विचारलं जाईल.
 
यादरम्यान, न्यायाधीशांनी परवानगी दिली तर कोर्टरूममध्ये कॅमेरे असू शकतात.
 
ट्रम्प यांच्यावरील सुनावणीदरम्यान त्यांना जामीन द्यायचा की नाही, हे ठरवण्यात येईल. म्हणजे त्यांना स्वतःहून दरवेळी कोर्टात हजर राहण्याचं वचन देऊन तुरुंगात जाण्यातून सूटही मिळू शकते.
 
अमेरिकेतील माध्यमांच्या मते, केवळ किरकोळ स्वरुपातील गुन्ह्यांमध्येच जामीन मिळण्याची शक्यता असते.
 
परंतु, गंभीर गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारे जामीन मिळण्याची विनंती मान्य होण्याची शक्यता कमी असते.
5. ट्रम्प यांच्यावरील आरोप काय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नेमके कोणते आरोप लावण्यात आले आहेत, याविषयी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही.
 
मात्र, 2016 च्या निवडणुकीपूर्वी प्रौढ-चित्रपट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला कथितरित्या दिलेल्या पैशांचं हे प्रकरण असू शकतं.
 
कारण, स्टॉर्मी डॅनिअल्स शांत राहावं, यासाठी पैसे दिल्याप्रकरणात ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन यांची चौकशी सुरू होती.
 
2006 मध्ये ट्रम्प यांच्यासोबत अफेअर असल्याचं स्टॉर्मीने सांगितलं होतं. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे प्रकरण चर्चेला येऊ नये, यासाठी कोहेन यांच्यामार्फत ट्रम्प यांनी तिला पैसे देऊ केले, असा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात येत आहे.
 
पण, दुसरीकडे तिला करण्यात आलेलं पेमेंट हे बेकायदेशीर नव्हतं, असं ट्रम्प यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांनी कोहेन यांना संबंधित पैसे हे वकिलीची फी म्हणून दिल्यांची नोंद त्यांच्या खात्यात करण्यात आलेली आहे.
 
मात्र, हे रेकॉर्डच पूर्णपणे खोटे असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.
 
दुसरं आणखी एक मोठं पेमेंट प्लेबॉय मासिकाची मॉडेल कॅरेन मॅकडौगल हिला करण्यात आल्याचाही एक आरोप आहे.
 
तिनेही ट्रम्प यांच्यासोबत अफेअर असल्याचा दावा केला होता, हे विशेष.
6. इतर आरोप काय असू शकतात?
आरोपपत्रावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं आहे, मात्र इतर काही मुद्दे आहेत, जे भविष्यात पुढे येऊ शकतात.
 
यामध्ये सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे 6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी यूएस कॅपिटॉलवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना जोमाने लढण्याचं आवाहन केलं होतं.
 
या प्रकरणातील आरोपांना ट्रम्प यांना सामोरं जावं लागणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.
 
शिवाय, ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानी सापडलेल्या काही दस्तऐवजांचंही एक प्रकरण आहे.
 
तसंच, 2020 निवडणुकीत जो बायडेन यांच्याविरोधात जॉर्जियाच्या सचिवांवर दबाव आणल्याचंही एक प्रकरण आहे.
 
7. आता ट्रम्प 2024ची निवडणूक लढवू शकतात का?
होय. ट्रम्प हे अजूनही 2024 ची निवडणूक लढवण्यास पात्र आहे.
त्यांच्यावरील कोणतेच आरोप त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाहीत.
अमेरिकेच्या घटनेनुसार, राष्ट्राध्यक्ष होण्यासाठीच्या पात्रता निकषांमध्ये स्वच्छ गुन्हेगारी रेकॉर्डचा उल्लेख नाही.
महाभियोग चालवून अपात्र ठरलेल्यांना आपलं पद नक्कीच गमवावं लागतं. मात्र, ट्रम्प यांनी त्यांच्यावरील दोन्ही महाभियोग चाचण्यांमधून सहीसलामत सुटका करून घेतली होती.
 
बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झुर्कर यांनी अधिक माहिती दिली.
 
ते म्हणतात, “खरं तर, अमेरिकेच्या कायद्यात एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या उमेदवाराला प्रचारापासून रोखणं किंवा निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करणं, असं कुठेही म्हटलेलं नाही. अगदी तुरुंगात गेला तरी त्याला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही, असं काहीही कायद्यात सांगितलेलं नाही.”
 
Published By- Priya Dixit