सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: ब्रिटन , गुरूवार, 17 जानेवारी 2019 (14:13 IST)

ब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळला ब्रेक्झिट करार

पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ब्रेक्झिट करार ब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळून लावला आहे. ब्रिटनच्या संसदेत कनिष्ठ सभागृहात यावर मतदान घेण्यात आले. या कराराविरोधात 423 खासदारांनी मत दिले, तर केवळ 202 खासदारांनी कराराच्या बाजूने कौल दिला.
 
ब्रिटनच्या जनतेने युरोपियन युनियन सोडण्याचा कल जवळजवळ अडीच वर्षांपूर्वी दिला होता. 29 मार्च 2019 रोजी युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार असे निश्चित  झाले होते, पंरतु त्याआधीच ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. ब्रिटनने लिस्बन कराराचे 50 वे कलम लागू करून ब्रेक्झिटच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी सौहार्दपूर्ण संबंध राहावेत यासाठी करार केला जात आहे. 
 
ब्रसेल्स परिषदेत युरोपियन युनियन नेत्यांनी ब्रेक्झिटला संमती दिली. युरोपियन युनियनच्या मान्यतेनंतर आता या कराराला ब्रिटनच्या संसदेची मंजुरी मिळणे अनिवार्य आहे. परंतु, ब्रिटनमधील अनेक खासदारांनी या कराराला विरोध दर्शवल्याने ब्रेक्झिटचा प्रश्र्न आणखी चिघळला. शेवटी, मतदानात खासदारांनी हा करार फेटाळून लावला.
 
हाऊस ऑफ कॉमन्स
 
ब्रिटनच्या संसदेच्या या कनिष्ठ सभागृहात एकूण 650 खासदार आहेत. पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला कराराचा मसुदा पारित होण्यासाठी 318 मतांची गरज होती. परंतु, मंगळवारी झालेल्या मतदानात केवळ 202 खासदारांनी कराराच्या बाजूने कौल दिल्याने 318 चा आकडा गाठता आला नाही.