तुमच्या फोनची बॅटरी पटकन संपतेय का? डेटा पण लवकर संपतोय का?
तुम्ही मुळात फोनचा वापरच जास्त करत असलात तर मग बॅटरी लवकर संपण्याची शक्यता आहे आणि कदाचित तुम्हाला जास्त डेटापॅकची गरज आहे. पण जर तुमचा वापर इतका नसेल आणि तरीही हे होत असेल, तर कदाचित कोणीतरी तुमच्या फोनशी छेडछाड करतंय.
आणि कदाचित तुमची वैयक्तिक माहिती आणि प्रायव्हसी डेटा धोक्यात असण्याची शक्यता आहे.
सध्या फोन हॅक करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत आणि म्हणूनच हॅकर्सना पकडता येणं कठीण झालंय.
फोन हॅक झालाय, हे कसं समजणार?
जर तुमचा फोन खूप जास्त डेटा वापरत असेल, तर हे हॅकिंगचं लक्षण असू शकतं.
नॉर्टन या अमेरिकन कंप्युटर सिक्युरिटी कंपनीनुसार, "डेटा जास्त वापरला जाण्याची अॅप्स जास्त वापरणं किंवा इतर अनेक कारणं असू शकतात. पण जर तुम्ही फोनचा आधीसारखाच वापर करूनही खूप जास्त डेटा संपत असेल, तर मग तुम्ही हे तपासायला हवं."
फोनची किती बॅटरी वापरली जातेय याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं नॉर्टनने म्हटलंय. फोन वापरण्याचं प्रमाण बदललं नसूनही बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असेल तर मग तुमचा फोन हॅक झालेला असण्याची शक्यता आहे.
कॅस्परस्की कंप्युटर सिक्युरिटी कंपनीनुसार, "एखाद्या हॅक करण्यात आलेल्या फोनची सगळी प्रोसेसिंग पॉवर हॅकरच्या हातात असते. म्हणूनच तुमचा फोन स्लो होण्याची शक्यता असते. फोन काम करणं अचानक थांबवण्याची किंवा रिस्टार्ट होण्याचीही शक्यता असते."
म्हणूनच आपल्या फोनच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं असल्याचं कॅस्परस्की आणि नॉर्टन या दोन्ही कंपन्यांनी म्हटलंय.
फोनमधल्या या गोष्टी तपासा
तुमच्या फोनमध्ये अशी काही अॅप्स आहेत का जी इन्स्टॉल केल्याचं तुम्हाला आठवतंच नाही?
किंवा तुमच्या कॉल लिस्टमध्ये असा एखादा फोन कॉल वा नंबर दिसतोय का जो तुम्ही डायल केलेला नाही?
तुमचा ईमेल आणि सोशल मीडिया अकाऊंट तपासून पहा. पासवर्ड बदलल्याची किंवा तुम्ही न गेलेल्या वेगवेगळ्या लोकेशन्सची नोटिफिकेशन्स तुम्हाला आली आहेत का?
फोन सुरक्षित कसा ठेवायचा?
तुमचा फोन अनेक प्रकारांनी हॅक केला जाऊ शकतो. म्हणूनच कुठूनही, कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी सतर्क रहा. काही अॅप्समध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे.
म्हणूनच सहसा गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोरमधूनच अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करावीत.
नॉर्टननुसार, "तुम्ही ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला ईमेल किंवा मेसेज आला तर त्यामधल्या लिंकवर क्लिक करू नका. त्यामध्ये मालवेअर असू शकतं."
तर मॅक्अफी सिक्युरिटी कंपनीनुसार, "ब्लूटूथ आणि वाय-फायचा वापर करून तुमचा फोन हॅक करणं हॅकरसाठी सोपं असतं. म्हणूनच गरज नसेल, तेव्हा या गोष्टी बंद ठेवाव्यात."
तुम्ही तुमचा फोन कायम स्वतःपाशीच ठेवा आणि कोणतेही पासवर्ड या फोनवर सेव्ह करून ठेवू नका. फोनमध्ये असणारी अॅप्लिकेशन्स वेळोवेळी अपडेट करा.
फोन हॅक झाला तर काय करायचं?
सगळी काळजी घेऊनही फोन हॅक झालाच, तर सगळ्यात आधी तुमच्या फोन लिस्टमध्ये असणाऱ्यांना याची कल्पना द्या.
तुमचा फोन हॅक झाला असून तुमच्या नंबरवरून कोणताही मेसेज आल्यास त्यातल्या लिंकवर क्लिक करू नये, असा इशारा सर्वांना द्या.
तुमच्या फोनमधलं तुम्हाला संशयास्पद वाटणारं, कदाचित ज्याचा वापर हॅकरने केला असावा, असं वाटणारं अॅप काढून टाका. फोनमध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. म्हणजे हे सॉफ्टवेअर व्हायरस हल्ला थोपवेल वा शोधेल आणि त्याविषयी तुम्हाला अॅलर्ट देईल.
फोन री-सेट (Reset) करण्याचा पर्यायही तुमच्याकडे आहे, पण यामुळे तुमच्या फोनमध्ये असलेली माहिती, फोटो आणि इतर गोष्टी गमावण्याचा धोका असतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे सगळे पासवर्ड बदला. जर तुमच्या फोनवर अॅटॅक झाला असेल तर कदाचित तुमचे पासवर्डही लीक होऊ शकतात.