शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

राज्यात कॉंग्रेसला 'सोनिया'चे यश

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने देशातील जनतेच्या सुरात सुर मिसळत कॉंग्रेसला संधी दिली आहे. यंदा कॉंग्रेसने मागच्या संख्येत चारची भर घालत १७ जागा पटकावून कामगिरी सुधारली आहे. तर पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात असलेला या पक्षाचा साथीदार राष्ट्रवादी कॉंग्रेसला जेमतेम ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीला एक जागा गमवावी लागली आहे.

भाजपला यावेळी चांगलाच फटका बसला असून गेल्या वेळी १४ जागा जिंकणार्‍या भाजपला यावेळी ९ जागांपर्यंतच मजल मारता आली आहे. त्या तुलनेत शिवसेनेने उजवी कामगिरी करून ११ जागा मिळवल्या आहेत. मात्र, मागच्यापेक्षा त्यांना एक जागा कमीच आहे. शिवसेना आणि भाजप दोघांनाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक येथे मनसे उमेदवाराने युतीला पडणारी मोठी मते खाल्ली असून त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा येथून तीन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या पवारांच्या पारंपरिक बारामती मतदारसंघातून सहज विजयी झाल्या. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल भंडार्‍यातून तर बीडमधून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे विजयी झाले. नागपूरहून केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व रामटेकमधून मुकूल वासनिक विजयी झाले. पुण्यातून सुरेश कलमाडींनीही विजयाला गवसणी घातली. नाशिकमधून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न अखेर कामास आले आणि पुतण्याला विजीय करण्यात ते यशस्वी ठरले. इथे मनसेचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला. शिवसेनेला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित नंदुरबारहून कडवी लढत देत अखेर नवव्यांदा लोकसभेत जाऊन पोहोचले आहेत. नारायण राणे यांनीही चिरंजीव नितिस राणे यांना लोकसभेत पाठविले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पराभव पहावा लागला आहे. मात्र कोकणातील अन्य एका जागेवर कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक खात्याचे विद्यमान मंत्री ए. आर. अंतुले यांना शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत केले.

छत्रपती शिवरायांच्या वंशजांपैकी उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकीटावर सातार्‍यातून सहज विजयी झाले. मात्र कोल्हापूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजीराजे भोसलेंना अस्मान दाखवले. शेजारच्या सांगलीतही महसूलमंत्री पतंगराव कदम यांनी थयथयाट करूनही वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील पुन्हा एकदा विजयी झाले. हातकणंगलेत विद्यमान खासदार निवेदिता माने यांना पराभव पहावा लागला. स्वाभीमानी संघटनेचे राजू शेट्टी येथे विजयी झाले. पालघरमधून बहूजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी विद्यमान खासदार दामू शिंगडा यांना पराभूत केले.

पक्षीय बलाबल असे
कॉंग्रेस- १७
राष्ट्रवादी कॉंग्रेस-८
शिवसेना-११
भाजप ९
इतर- ३