फुलपाखरे झाली मराठी, जवळपास तीनशे फुलपाखरांची नावे बदलली
"नीलवंत हे नाव तुम्हास ठाऊक आहे का ?’’ निलवंत हे ब्ल्युमॉरमॉन या राज्य फुलपाखराच्या प्रजातीला दिलेले मराठी नाव असून, हे नामकरण महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
देशात आढळून येणाऱ्या १५०० आणि महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या २७९ फुलपाखरांची नावे इंग्रजीत आहेत. ही नावे मराठीत का असू नयेत असा विचार करून श्री. बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलपाखरांच्या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले. यातूनच त्रिमंडळ, तरंग, मनमौजी, यामिनी, रुईकर, रत्नमाला, तलवार, पुच्छ, गडद सरदार, भटक्या, मयुरेश, नायक यासारखी आकर्षक मराठी नावे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींना देण्यात आली. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.
मराठी नावांमध्ये फुलपाखराचे रुप दडलेले असले पाहिजे, ते लोकांना आपले वाटले पाहिजे या सगळ्या बाबींचा त्यात विचार करण्यात आला. मग पाच प्रकारात फुलपाखरांची नावे मराठीत आणण्यात आली. यात फुलपाखराचा रंग, रुप, पंख याचा विचार झाला. त्यातून त्रिमंडल, तरंग सारखी नावे पुढे आली. नामकरण करण्यासाठी फुलपाखरांच्या सवयी, त्यांचे पंख उघडण्याची, मिटण्याची लकब, बसण्याची पद्धत याचा विचार करण्यात आला. त्यातून "मनमौजी" सारखे नाव ठेवले गेले. फुलपाखरांना मराठी नाव देण्यासाठी ज्या वनस्पतींचा त्यांना खाद्य म्हणून उपयोग होतो त्यातून यामिनी, रुईकर ही नावे पुढे आली. गवतावर बसणाऱ्या फुलपाखराचे नाव ‘तृणासूर’ करण्यात आले. फुलपाखरांच्या अधिवासाचाही यात विचार करून त्यातून "रत्नमाला" हे नाव ठेवण्यात आले.
निलवंती, तलवार, पुच्छख् गडद सरदार, भटक्या, मयुरेश, नायक यासारखी नावे फुलपाखरांच्या दिसण्यावरून ठेवण्यात आली. यामफ्लाय फुलपाखरांची खाद्य वनस्पती आहे म्हणून त्याचे नाव "यामिनी" ठेवण्यात आले. ग्रास डेमन या फुलपाखराचे नाव "तृणासूर" असे भाषांतरीत झाले. ब्ल्यूओकलिफ नावाच्या फुलपाखराचे "नीलपर्ण" नावाने बारसे झाले.
जैवविविधता बोर्डाच्या मंडळीनी फक्त फुलपाखराचेच मराठीत नामकरण केले असे नाही तर त्यांनी त्यांचे कुळ ही मराठीत आणले. म्हणजेच निम्फालिडी या फुलपाखरू कुळाचे नाव कुंचलपाद असे झाले. हेस्पिरिडीचे "चपळ" कुळ झाले तर लायसनेडीचे "नीळकुळ" झाले. अशाच पद्धतीने पुच्छ, मुग्धपंखी, कुळ अस्तित्त्वात आले आहे. राज्यातील फुलपाखरे आणि त्यांची मराठी नावे याची माहिती देणारे पुस्तक उत्तम छायाचित्रांसह वन विभागाने नुकतेच प्रकाशित केले आहे.