बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मे 2018 (15:23 IST)

केरळ उच्च न्यायालयाने केले मुलाचे नामकरण

केरळमधील एका दाम्पत्याच्या वादामुळे केरळ उच्च न्यायालयानेच त्यांच्या मुलाचे नामकरण केले आहे. घटस्फोटाचा खटला सुरू असतानाच त्यांच्यात मुलाचे नाव ठेवण्यावरून वाद सुरू झाला, अखेर न्यायालयाने यात मध्यस्थी करत मुलाचे नाव ‘जोहान सचिन’असे ठेवले.
 
मुलाच्या पालकांचे २९ ऑगस्ट २०१० मध्ये ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजानुसार लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत. मात्र दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले त्यामुळे त्यांनी केरळ उच्च न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला. या वादांमुळे त्यांनी दुसऱ्या मुलाचा जन्माचा दाखला तयार केलेला नव्हता. यावर्षी त्यांच्या मुलाचा शाळेत अॅडमिशन करायचे असल्याने त्यांना जन्माचा दाखला काढायचा होता. मात्र दाखल्यावर नाव काय लिहायचे यावरून मुलाच्या पालकांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला होता. मुलाची आई ख्रिश्चन असल्याने तिला मुलाचे नाव जोहान ठेवायचे होते तर वडिलांना मुलाचे नाव अभिनव सचिन ठेवायचे होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाल्याने त्या दोघांनीही न्यायालयात याचिका दाखल केल्या.
 
या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती ए. के. जयशंकरन नांबिअर यांनी “मुलाच्या नावाशी आई वडिलांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही न दुखावता आम्ही मुलाचे नाव ठेवले आहे. मुलाच्या आईच्या इच्छेनुसार मुलाचे नाव जोहान तर वडिलांचे पहिले नाव सचिन असल्याने मुलाचे नाव ‘जोहान सचिन’ठेवण्यात आले आहे”,असे न्यायमूर्ती ए. के.जयशंकरन नांबिअर यांनी सांगितले.