शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (17:42 IST)

MBAची डिग्री घेऊन फिरली, पण 2 फूट उंचीमुळे नोकरी मिळाली नाही; आता इतरांना देते रोजगार

gita
मला कोणीही काम दिलं नाही. माझी क्षमता न बघता प्रत्येकाने केवळ माझी उंची पाहिली.
BBC
भारतातील तामिळनाडू राज्याच्या इरोड जिल्ह्यातील गीता कप्पुसामी यांचे हे अनुभव आहेत. त्यांनी त्यांच्याच शब्दात याविषयी सांगितलं.
 
गीता यांनी एमबीए म्हणजेच मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनसह डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचा अभ्यास केला आहे.
 
त्या 31 वर्षांच्या असून त्यांची उंची केवळ दोन फूट आहे.
 
कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना नोकरी करायची होती. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. पण त्यांच्या उंचीमुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही.
 
नोकरीच्या शोधात त्या कोणाकडे गेल्या की फोनवरून कळवतो असं म्हणत त्यांच्याकडे पाठ फिरवली जायची. त्यानंतर मात्र त्यांना कोणताच फोन यायचा नाही.
 
अनेक अपयशानंतर गीता यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 
एकेकाळी बेरोजगार असलेल्या गीता आता त्यांच्या कपड्यांच्या व्यवसायातून इतरांनाही रोजगार देतात.
 
गीता यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष त्यांच्या दुकानात बसून सांगितला. या दुकानाच्या भिंती आकाशी रंगाच्या होत्या.
 
दुकानातून शिलाई मशीनचा सतत आवाज येत होता आणि सर्वत्र कपड्यांचा ढीग पडला होता.
 
गीता यांनी दिव्यांगांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला...
गीता सांगतात की, एका ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला.
 
त्यांनी सांगितलं, "मी ज्योती आणि मणीला भेटले आणि नंतर त्या माझ्या मैत्रिणी झाल्या. त्यांच्याकडे शिलाई मशीन होती. आम्ही मिळून अपंगांना कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला. आम्ही एक दुकान शोधून आमच्यासारख्या लोकांना कामावर ठेवलं."
 
गीता यांच्या संस्थेत चालता येत नसलेले अपंग आहेत.
 
इथे एका गतिमंद मुलीची आई देखील काम करते.
 
गीता सांगतात की, जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या देणं हे त्यांचं ध्येय आहे. यासाठी त्यांना एक छोटं कापड युनिट (कपड्यांचा व्यवसाय) सुरू करायचं आहे.
 
महिलांना घर चालवण्यासाठी गीताने आधार दिला
गीता यांच्या दुकानात ईश्वरी नावाची महिला काम करते.
 
ईश्वरी यांना चालता येत नाही. त्या सांगतात, "माझा नवराही अपंग आहे. दोन वेळच्या जेवणासाठी आमची धडपड सुरू होती. आम्ही कुठेही नोकरीच्या शोधात गेलो की आम्ही अपंग असल्याचं सांगून आम्हाला नकार दिला गेला. तुम्ही वेळेवर कामाला येऊ शकत नाही नीट काम करू शकत नाही अशी कारणं दिली गेली."
 
त्या सांगतात, "मग गीताने आम्हाला सांगितलं की तिने कपड्यांचं एक युनिट सुरू केलं आहे. त्यानंतर आम्ही इथे काम करायला सुरुवात केली. यामुळे मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला मदत मिळते."
 
दुसरी महिला ज्योती लक्ष्मी सांगते, "मला दोन मुली आहेत. मोठी मुलगी अपंग आहे, ती चालू शकत नाही. पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे."
 
"माझी परिस्थिती अशी आहे की मी माझ्या मोठ्या मुलीला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आता गीता दिव्यांगांना नोकरी देते. माझ्या मुलीला काम करता येत नसल्याने मी काम करते. आता मी माझ्या मुलांची चांगली काळजी घेऊ शकते."
 
तुमच्यात आवड आणि क्षमता असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल
एकेकाळी स्वतः नोकरी शोधणाऱ्या दोन फूट उंचीच्या गीताने आज अनेकांना रोजगार दिला आहे.
 
गीता सांगतात, "मला असं वाटतं की माझ्याप्रमाणे कोणत्याही अपंग व्यक्तीला कामाच्या ठिकाणी नाकारलं जाऊ नये. म्हणून मी अधिकाधिक अपंग लोकांना कामावर घेत आहे. यात असे लोक आहेत ज्यांना नाकारलं गेलंय."
 
शारीरिक अपंगत्व हा मोठा अडथळा नाही, प्रत्येकामध्ये काही ना काही क्षमता असतेच असं त्यांचं म्हणणं आहे.
 
"मी अपंग आहे असा विचार करत राहिले तर मी काहीही करू शकत नाही. माझा स्वतःवर विश्वास होता कारण माझ्यात कौशल्य आणि आत्मविश्वास होता. मी गारमेंट युनिट सुरू केलं आणि माझ्यासारख्या लोकांना काम दिलं."
 
गीता यांनी तिच्या अपंगत्वाचं दडपण घेतलं नाही. त्यांनी इतरांनाही रोजगार दिला असून प्रोत्साहनही देत आहेत.
 
त्यांनी त्यांच्यासारख्या लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.
 
गीता सांगतात, "तुम्हीही जीवनात यशस्वी होऊ शकता. फक्त तुमचं अपयश किंवा उणिवा तुमच्या मनावर स्वार होता कामा नये. तुमच्यात आत्मविश्वास आणि क्षमता असेल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. मी स्वतः त्याचं जिवंत उदाहरण आहे."