Last Modified: रायबरेली , गुरूवार, 9 एप्रिल 2009 (17:05 IST)
गांधी घराण्याचा बालेकिल्ला
काही मतदारसंघ विशिष्ट घराण्यांचे म्हणून ओळखले जातात. रायबरेली आणि अमेठी हे त्यापैकीच एक. या दोन्ही मतदारसंघांवर नेहरू-गांधी घराण्याचे राज्य असते. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नाही.
रायबरेलीपासून सुलतानपूरपर्यंत प्रत्येक घराच्या छतावर कॉंग्रेसचा ध्वज फडकतो आहे. दारावर सोनिया, राहूल व प्रियंकाचे पोस्टर्स दिसत आहेत. अमेठी लोकसभा मतदारसंघातील राज्यातील सत्ताधारी बहूजन समाज पक्षाच्या ताब्यात असलेल्या गौरीगंज या विधानसभा मतदारसंघातही कॉंग्रेसचाच ध्वज फडकताना दिसतोय.
रायबरेली विधानसभा मतदारसंघात अखिलेश सिंह हे अपक्ष निवडून आले आहेत. पण तरीही या शहरात कॉंग्रेसचेच वर्चस्व आहे. स्वतः सिंह हे माजी कॉंग्रेस नेतेच आहेत. सोनिया गांधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या तेव्हा अवघे शहर जणू त्यांना पाठिंबा द्यायला रस्त्यावर आले होते.
सोनियांच्या विरोधात भाजपचे आर. बी. सिंह, बहूजन समाज पक्षाचे आर. एस. कुशवाह निवडणुकीत उतरले आहेत. अमेठीत भाजपचे प्रदीप धौरी व बसपचे आशीष शुक्ला रिंगणात आहेत. राहूल गांधींचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत कडवी टक्कर देण्याचा या दोघांचाही इरादा आहे.
रायबरेली मतदारसंघावर सुरवातीपासूनच नेहरू-गांधी घराण्याचे वर्चस्व आहे. १९५७ मध्ये फिरोज गांधी या मतदारसंघातून लञले. १९६७ मध्ये इंदिरा गांधींनी या मतदारसंघातून निवडणूक लढली. पण १९७७ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना धक्कादायकरित्या पराभव पत्करावा लागला आणि जनता पार्टीचे राजनारायण लोकसभेत जाऊन पोहोचले.
त्यानंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा जिंकल्या. पण त्या आंध्र प्रदेशातील मेंढक येथूनही जिंकल्या असल्याने त्यांनी रायबरेलीचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अरूण नेहरू जिंकले. पुढे १९९६ व ९८ च्या निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. या काळात गांधी घराण्यापैकी कुणीही निवडणुकीत उतरले नव्हते.
२००४ मध्ये सोनियांनी निवडणूक जिंकली, पण लाभाच्या पदावरून झालेल्या आरोपावरून त्यांनी राजीनामा दिला. मग पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत त्या चार लाख मतांनी विजयी झाल्या.
अमेठी मतदारसंघात १९७७ मध्ये संजय गांधींनी निवडणूक लढवली होती. १९८० मध्येही ते निवडून आले. पण त्यांच्या निधनानंतर ८१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी मोठ्या बहूमताने निवडून आले होते. १९८४ मध्येही त्यांनी येथूनच निवडणूक लढवली आणि ते निवडून गेले. आता राहूल गांधी या मतदारसंघातून दुसर्यांदा निवडून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.