सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (11:12 IST)

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचा महाराष्ट्र

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याचे उद्‌घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. 1 मे 2020 ला आपण महाराष्ट्राचा साठावा वर्धापन दिन साजरा करत आहोत. महाराष्ट्राची साहित्य-संस्कृती वर्धिष्णू राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. येथील समाज हा पुरोगामी विचारांचा, विज्ञाननिष्ठ, ज्ञानपिपासू, सदविचारी, कुलशीलाचा, आचारधर्म पाळणारा, आध्यात्मिकतेची कास धरणारा, ललितकलांचा आनंद घेणारा, असा आहे. अशा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भव्य-दिव्य स्वप्नात यशवंतरावांनी आपल्या प्रेरणा शोधल्या. महाराजांचे शौर्य, धैर्य, चारित्र्य यास विधायक दृष्टी देऊन पुन्हा महाराष्ट्रात नूतन सृष्टी निर्माण व्हावी, असे तंना वाटत असे. महाराष्ट्र राज्य हे चंद्र कलेप्रमाणे वृद्धिंगत व्हावे आणि त्याची प्रभा जगभर पसरावी अशी यशवंतराव चव्हाण यांची अपेक्षा होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी  केलेल्या भाषणात त्याचा प्रत्यय येतो.
 
महाराष्ट्राची सेवा करण्यात मी रंगून गेलो असताना मात्र दिल्लीचे बोलावणे आले. मराठी ने एकसंध करणे हे पहिले साध्य आहे. ही भावना यशवंतराव चव्हाण यांची होती. राजकारण, प्रशासन, अर्थकारण, कृषी औद्योगिक धोरण, ग्रामविकासाची संकल्पना, न्यायव्यवस्था, जलसंस्कृती, शिक्षण, जल व्यवस्थापन, समाजकारण, भाषा आणि साहित्य, कला-यामध्ये या सारख्या असंख्य विषयांवर यशवंतराव चव्हाणांनी मूलगामी विचार मांडले आहेत. सामान्यांचे कल्याण आणि मूल्यावरची निष्ठा ठेवत या विषयाकडे ते पाहात. लोकांचे समाधान ही चांगल्या राज्यकारभाराची कसोटी असते. राज्याचा बौद्धिक आणि वैचारिक आत्मा कोरडा राहणार नाही, याची ते पुरेपूर दक्षता घेत होते. आजच्या राज्यकर्त्यांमधला आणि यशवंतरावांच्या मधला हा फरक आपण आज तीव्रतेने अनुभवत आहोत. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व स्वीकारताना त्यांच्या मनात उद्याच्या महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट होते. त्यात रंग भरताना केवळ बांधेसूद प्रशासनावर अवलंबून राहिल्यास ही प्रक्रिाया यांत्रिक बनेल, प्रभावी लोकनेतृत्वाची त्याला जोड दिली तरच ती लोकाभिमुख बनेल, अशी त्यांची श्रद्धा होती.
 
यशवंतराव राजकारण व समाजकारण करीत असताना कटुता आणि आकस न ठेवता मणुसकीच्या भावनेने राजकारण करत असत. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर एकाही परराज्यातील माणसाला, कुटुंबाला मुंबई सोडून जावेसे वाटले नाही. 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 या काळात यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पुढे चीनने भारतावर केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रीय संकटाच्या मुकाबल्यासाठी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला या शब्दात त्यांची राजकीय उंची कवीने कथन केली आहे. त्यांच्यानंतर देशाच्या राजकारणात आजच्या घडीला नाव घ्यावे असे दमदार नेतृत्व आपल्याकडे निर्माण होऊ शकले नाही. आपल्याकडे राजकारणाच्या वाटेचा हा मार्ग झाला नाही, ती पायवाट झाली असेच म्हणावे लागेल.
यशवंतराव चव्हाण राजकारणातील एक उत्तुंग शिखर होते. संवेदनशीलता, सभ्यता आणि न्रमता याचे ते मूर्तिमंत राजकारणातील रूप होते. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, महाराष्ट्र हे मराठ्यांचे राज्य होणार नाही तर समस्त मराठी लोकांचे राज्य असेल. कठीण परिस्थितीतही महाराष्ट्राने शिस्तीची कास सोडली नाही. म्हणूनच महाराष्ट्राची बाजारातील पत ही नेहमीच उच्चतम प्रतीची होती. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करता आला.
 
सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी समजला जातो. अनेक नामांकित सहकारी संस्था, साखर कारखाने, पतसंस्था, सूतगिरण्या, दुग्ध उत्पादक संघ,विपणन संस्था यासारख्या संस्था महाराष्ट्रात पथदर्शक आहेत. एका अर्थाने सहकारी चळवळ ग्रामीण भागात घट्ट रोवली गेली. सहकारी क्षेत्रालाही अर्थव्यवस्थेत आढळ स्थान देण्यात आले. यातून लोकशाही प्रभावीपणे भक्कम करणे हे स्वप्न यशवंतराव चव्हाण यांचे होते. तरुण पिढीवर व त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. शिक्षणातून नवीन पिढी निर्माण व्हावी, यावर त्यांचा अधिक कटाक्ष होता. माणसांच्या मनाचा सांधा जोडण्यावर त्यांनी अधिक भर दिला होता. दुर्बलांना सामर्थ्य देण्यासाठी सहकार चळवळीचा जन्म झाला आहे, असे ते सांगत. सामान्य माणसांचे अर्थकारण सहकाराशिवाय सुटणार नाही, ही त्यांची धारणा होती. महाराष्ट्राची जडणघडण रचनात्मक व लोकाभिमुख पद्धतीने करण्यासाठी त्यांनी आपल्या राजकारणाची दिशा निश्चित केली होती.
 
यापूर्वी राजकारणात असलेली माणसे स्वच्छ, चारित्र्यसंपन्न होती. स्वतःच आदर्श प्रतिेमेला जपणारी होती. आपले कार्य लोकशाही पद्धतीने चालणारे आहे की नाही, याचे कठोर आत्मपरीक्षण करणारी होती. गरीब, शेतकरी जनतेच्या कल्याणासाठी झटत होती. नैतिकता पाळत होती. सत्ता ही विश्वस्त या नात्याने सांभाळायची असते हे तत्त्व आता राहिले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील राजकारणातील नैतिकता व जनकल्याणकारी चेहरा बराच विद्रूप झाल्याचे दिसते. पक्षांतर स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत त्यांच्या मनात लोककल्याणकारी भावना, नैतिकता, समाजाप्रती बांधिलकी यांचा अभाव दिसतो. आदर्श वाटावे असे नेतृत्व दुर्मीळ झाल्याची खंत वाटते आहे.
 
लोकाभिमुख राज्यकारभार या यंत्राचा विसर पडत आहे. म्हणून खंबीर नेतृत्व, स्वच्छ, पारदर्शक लोकशाही याची आज गरज आहे. राज्यातील एकता मजबूत केली पाहिजे. सामाजिक, आर्थिक विकास करताना मतभेद निर्माण न होता, ऐक्यास तडा जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विरोध विधायक असावा, तो आंधळा किंवा विरोधासाठी, विरोध नसावा. वादामधून तत्त्वबोध व्हावा. महाराष्ट्र राज्य हे जगन्नाथाचा रथ आहे. या रथास सर्वांचा हात लागला पाहिजे. त्यातच जनतेचे कल्याण आहे. जनकल्याणची चिंता सदैव मनात सर्वांनी बाळगूनच राजकारण केले पाहिजे. गरिबीशी आपण तडजोड करता कामा नये, त्यासाठी जिव्हाळ्याच्या शक्ती असतील त्या मोकळ्या केल्या पाहिजेत. विधायक विचाराचे बीज रक्तात भिजत घातले पाहिजे, ते रुजले पाहिजे तर त्यांना कोंबे फुटतील व कालांतराने फळे येतील. यासाठी आपण सर्वांनी आपल्या मनात विकासासाठी निर्धाराचे दुर्ग उभे केले पाहिजे.
 
बहु असोत सुंदर संपन्न की महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा,
जय हिंद, जय महाराष्ट्र.
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचा महाराष्ट्र
 
डॉ. शिवाजीराव देशमुख