विरोधक भांडत आहेत विरोधी पक्षासाठी - मुख्यमंत्री
भाजपाच्या हाती सत्ता येत असल्याने या निवडणुकीत चुरस उरली नाही, तर त्यामुळे काँग्रेसने हार मानल्याने आता विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. सध्या राजकीयदृष्ट्या शरद पवार यांची वाईट अवस्था झाली असून, काँग्रेसने तर आधीच हार मानली आहे. त्यामुळे द्रष्टेपणाने सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचा सल्ला दिल्याची टीकाही त्यांनी ठाण्याच्या सभेत केली. ठाण्यासाठी अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री यांनी दिले आहे.
फडणवीस पुढे म्सहणाले की, सक्षम वाहतुक व्यवस्था, दळणवळणाच्या सोयी, जलवाहतूक- मेट्रो- मोनो- बस ही वाहतुकीसाठी एक तिकीट, मेट्रोचे जाळे हे मुद्दे त्यांनी मांडले. कल्याण डोंबिवली हायब्रीड मेट्रो उभारणार, ठाणे ते बोरीवली रोप वे यांच्यासह पाच हजार ४०० कोटींच्या मंजूर प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला.
निवडणुकीनंतर पेण-वाशी-खारेपाटाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून येथील जी प्रलंबित समस्या आहे, त्याचे समाधान खारेपाटातील जनतेला मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी पेणच्या सभेत दिले. पेण शहर व संपूर्ण तालुका एमएमआरडीए अंतर्गत आल्याने पेणच्या विकासासाठी एमएमआरडीएचा खजिनाच रिकामा करणार असल्याचे आश्वासनही दिले.