Bornahan बोरन्हाण करण्याची योग्य पद्धत आणि त्यामागील शास्त्र जाणून घ्या
Bornahan घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणार्या पहिल्या संक्रातीचे खूप महत्त्व असते. त्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालवून सजवतात त्याचप्रकारे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो.
बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातले जाते. या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे.
संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवताना बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून बोरन्हाण घातले जाते. या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करतात आणि ज्याचे बोरन्हाण करवायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, भुईमूगाच्या शेंगा, बोर, हरभरा, करवंद हे हळूवार टाकले जातात. एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात अशात त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लावणे सोपे होते. मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते.
संक्रांतीच्या दिवसापासून रथ सप्तमी आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरन्हाण करता येतं. बोरन्हाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यास १-३ या वयात देखील बोरन्हाण करता येते.
या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा. हलव्याचे दागिने आणावे ज्यात तिळाचा उपयोग केला असतो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, करवंद, तिळगूळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, हरभरा आणावे. सध्या लोक त्या बिस्किट, चॉकलेट्सचा देखील समावेश करतात.
या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजार-पाजाऱ्यांना बोलावावे. खाली स्वच्छ आसान पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसवून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवार ओतावे. इतर मुलांना ते लुटायला सांगावे.
बोरन्हाण कां करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नांवाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्या नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते.
लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहानं मुलांवर बोरन्हाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात.