गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : गुरूवार, 13 जानेवारी 2022 (13:06 IST)

मकर संक्राती संपूर्ण माहिती

मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो.
 
तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात, उत्तरायणही याच दिवशी होते हा गैरसमज आहे. पण मकर संक्रांत ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे.
 
मकर संक्रांतीचे विविध प्रकार
मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे. भारत आणि नेपाळमधील सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चालीरीतींनी हा भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

मकर संक्राती महत्व
या दिवशी जप, तप, दान, स्नान, श्राद्ध, तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.
 
मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाला तीर्थराज प्रयाग आणि गंगासागर स्नानाला महास्नान असे नाव देण्यात आले आहे. सामान्यतः सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो, परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी आहे. ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया सहा महिन्यांच्या अंतराने होते. भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे. सामान्यतः भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर ठरतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरते.
मकर संक्राती धार्मिक महत्व
मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारताच्या विविध भागात आणि विशेषतः गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर स्वतः त्यांचा मुलगा शनीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगाजीने भगीरथाच्या मागे जाऊन कपिल मुनींच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रात भेट दिली होती.
 
मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्त्व
तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला, यामागील शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात आणि खातात. शिवाय या सणानिमित्ताने कटू आठवणींना विसरून गोडवा भरण्याचा प्रयत्न केला जातो.
मकर संक्रांतीला दान
मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचा सण असेही म्हणतात. या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे, तसेच तीळ, गूळ, खिचडी, फळे यांचे दान केल्यास राशीनुसार पुण्य प्राप्त होते. या दिवशी केलेल्या दानामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात, असाही समज आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते.
 
मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व
मकर संक्रांत हा एकमेव सण असावा ज्यात काळा रंग आवर्जून वापरला जातो. या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हळदी-कुंकूवाचा समारंभ आयोजित करतात. मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या दिवशी सुवासिनींना वाण देण्या-घेण्यासाठी बोलावलं जातं. या सणाला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा. तसं तर सणासुदीला काळा रंग वर्ज्य मानला जातो परंतु मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येत असल्याने या काळात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान करण्याची पद्दत आहे. याशिवाय मकर संक्रातीला लग्न झालेल्या नवीन जोडप्याला तसंच घरातील नवीन बाळाला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात.
मकर संक्रांतीला पारंपरिक हलव्याचे दागिने
मकर संक्राती या सणाला हलव्याचे दागिने तयार करण्याची पद्धत असते. हे दागिने नव्या नवरीसाठी तसेच लहान मुलाचे बोरन्हाण असल्यास त्यांच्यासाठी तयार केले जातात. काळ्या कपड्यांवर हलव्याचे दागिने शोभून दिसतात. या सणाला घरात आलेल्या नव्या सुनेचं अथवा जावयाचं आणि लहान बाळाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केलं जातं. जन्मभर संसारातील गोडवा वाढावा म्हणून लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालतात. लहान मुलांचंही बोरन्हाण या दरम्यान केलं जातं.
 
मकर संक्रांतीला खिचडीचं महत्त्व
मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्य देव त्यांच्या पुत्र शनीच्या घरी जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते. अशा स्थितीत या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. तसेच तांदूळ हा चंद्राचा, मीठाचा शुक्र, हळद हा गुरु, हिरव्या भाज्या बुध कारक मानले जातात. त्याच वेळी उष्णतेशी संबध मंगळाशी निगडित आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते.
मकर संक्रांतीला पतंग का उडवतात
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करण्याची प्रथा प्रचलित आहे. पतंग उडवण्याची प्रथा मकर संक्रांतीशी संबंधित आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक अनेकदा घराच्या छतावरून पतंग उडवून हा सण साजरा करतात. या दिवशी त्यांच्या शरीराला सूर्यप्रकाशाचा फायदा होतो.
 
असे म्हणतात की हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि इतर अनेक संसर्गामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. सूर्याच्या उतरत्या वेळी सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरासाठी औषध म्हणून काम करतात. त्यामुळे सतत पतंग उडवणाऱ्यांच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते.
 
एका मान्यतेनुसार, त्रेतायुगात भगवान रामाने आपल्या भावांसह आणि श्री हनुमान यांच्यासह मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली होती, म्हणून तेव्हापासून ही परंपरा जगभर प्रचलित आहे. प्राचीन भारतीय साहित्य आणि धार्मिक ग्रंथांमध्येही पतंग उडवण्याचा प्रकार आढळतो.
भारतात वेगवेगळी नावे
मकर संक्रांती : छत्तीसगड, गोवा, ओडिशा, हरियाणा, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि जम्मू
ताड़ पोंगल, उझवर तिरुनल : तमिळनाडू
उत्तरायण : गुजरात, उत्तराखंड
उत्तरैन, माघी संगरांद : जम्मू
शिशूर संक्रांत: काश्मीर खोर्‍यात
माघी : हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब
भोगली बिहू: आसाम
खिचडी : उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार
पौष संक्रांती: पश्चिम बंगाल
मकर संक्रमण: कर्नाटक
 
भारताबाहेरील विविध नावे
बांगलादेश : शकरैन / पौष संक्रांती
नेपाळ: माघे संक्रांती किंवा 'माघी संक्रांती' 'खिचडी संक्रांती'
थायलंड : सॉन्गकरण
लाओस : पी मा लाओ
म्यानमार: थियान
कंबोडिया: मोहा संगक्रान
श्रीलंका: पोंगल, उझावर तिरुनल
 
पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान पृथ्वीवर अवतार घेतात आणि आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.