गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (10:00 IST)

मनोज जरांगे : 2 एकरवाला माणूस दोनच महिन्यात 'लाखोंना त्यांचा पोशिंदा' का वाटतोय? - ग्राऊंड रिपोर्ट

manoj jarange
श्रीकांत बंगाळे
“ओ मीडियावाले, बाजूला व्हा. माझ्या बाळाला मनोजभाऊंना पाहू द्या,” एका महिलेचा मोठ्यानं आवाज आला आणि जरांगेंसमोर गर्दी करून बसलेले पत्रकार बाजूला झाले.
 
महिलेनं तिच्या बाळाला खांद्यावर उचलून घेतलं आणि म्हणाली, “ते बघ बाळा जरांगे पाटील. जे आपल्यासाठी लढत आहेत, जे रोज टीव्हीवर दिसत आहेत.”
 
त्यानंतर ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेनं उपोषणस्थळ दुमदुमून गेलं.
 
मागील आठवडाभर मी अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन कव्हर करत होतो.
 
पहिल्याच दिवशी (28 ऑक्टोबरला) मी हा प्रसंग अनुभवला.
 
जालना जिल्ह्यातल्या ‘अंतरवाली सराटी’ गावात दोन महिन्यांहून अधिक काळापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठीचं आदोलन सुरू आहे.
 
मनोज जरांगेंनी तूर्तास त्यांचं दुसऱ्या टप्प्यातलं आमरण उपोषण मागे घेतलं असलं, तरी त्यांनी साखळी उपोषण कायम ठेवलं आहे. या सात दिवसांत मी जे काही अनुभवलं ते इथं मांडत आहे.
 
28 ऑक्टोबरला दुपारी बाराच्या सुमारास कडकडीत उन्हात बीडच्या बंगाली पिंपळा गावचे सुरेश नवले डांबरी रस्त्यावर लोंटागण घालत जरांगेंना भेटण्यासाठी आले होती.
 
जवळपास 50 किलोमीटरुन ते असं लोटांगण घेत येत होते.
 
त्यांना पाहण्यासाठी आलेली एक महिला म्हणाली, “सरकारनं मराठ्यांचा अंत पाहिलाय. आता आपणही मतदान करायचं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची.”
 
अंतरवाली सराटीत यावेळी काही बदल दिसत होते. सप्टेंबरमध्ये आम्ही या गावात आलो होतो, तेव्हा रस्त्याच्या कडेला दुकानं नव्हती. पण यावेळेस नागरिकांनी चहा-नाश्त्याची दुकानं थाटल्याचं दिसत होतं.
 
28 तारखेला अंतरवालीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू होतं. श्यामसुंदर तारख यांच्या घरावरती काही कॅमेरे बसवले जात होते.
 
त्यांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले, “वीसपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेत. कोण काय विचारानं गावात येईल सांगता येत नाही.”
 
जरांगेंच्या आंदोलनाला उपस्थित तरुण प्रस्थापित मराठा समाजातील नेत्यांविरोधात प्रचंड रोष व्यक्त करत होते.
 
अभिमान जरे हा तरुण बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या अमळनेर गावातून आला होता.
 
सभास्थळी मागच्या बाजूस ठेवण्यात आलेल्या बाकावर बसून आम्ही दोघं चर्चा करत होतो.
 
तो म्हणाला, “मराठा आमदार आहेत पण बहुतेक सगळेच घोटाळेबाज आहेत. म्हणून आरक्षणावर काहीच बोलून नाही राहिले. पण याचा निवडणुकीवर नक्की परिणाम होईल.
 
“आमच्याकडे ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलंय. जिथं मराठा समाज जास्त तिथं इलेक्शनच होणार नाही आणि जिथं मराठा कमी तिथं 200-200, 300-300 जण उमेदवारी अर्ज भरणार आणि निवडणूक रद्द होणार.”
 
अभिमानसोबत माझं बोलणं चालू असतानाच आमच्या समोर दोन जणांची चर्चा सुरू होती.
 
त्यातली एक व्यक्ती जरांगेंकडे बोट दाखवत त्याच्यासोबतच्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली, “आपल्याला या माणसाला गमवायचं नाहीये. समाजासाठी असा दुसरा माणूस आहे का? मराठ्यांनी तर ठेवलाच पण धनगरांनीही या माणसावर विश्वास ठेवलाय. सरकारचं तेवढं निब्बर काळजाचं आहे बघा.”
 
दुपारी 105 वर्षांचे आजोबा जरांगेंना भेटायला आहे. बराच वेळ ते उपोषणस्थळी असलेल्या व्यासपीठाजवळील खुर्चीवर बसून होते.
 
जरांगेंना भेटण्यासाठी व्यासपीठावरील दोन पायऱ्या ते चढले आणि थरथरत्या हातांनी जरांगेंना हात जोडत म्हणाले, “तुम्हाला आम्ही लोक देव मानतो. बाकी कुणावर आम्हाला विश्वास नाही राहिला. पाटील तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आमच्यासाठी पाणी प्या.”
 
सप्टेंबरमध्येही मी अंतरवाली सराटीत 5 दिवस आंदोलन कव्हर करत होतो.
 
त्यावेळी मला तिथं संग्राम जाधव नावाचा तरुण भेटला होता. तो सातारा जिल्ह्यातून जवळपास 450 किलोमीटर अंतर पार करुन अंतरवालीला आला होता.
 
मनोज जरांगेंविषयी बोलताना तो म्हणाला, “मी स्वत: मराठा आरक्षणासाठीच्या अनेक आंदोलनांत सहभागी झालो. पण, मनोज जरांगेंसारखं आंदोलन कुठच पाहिलं नाही. याआधी आंदोलनातले नेते बंद दाराआड चर्चा करायचे आणि मॅनेज व्हायचे. पण मनोज जरांगे थेट कॅमेऱ्यासमोर, जनतेसमोर चर्चा करतात. ते आम्हाला खूप आवडतं.”
 
या आंदोलनात नेमकं काय होतंय आणि आंदोलनासंर्भातले अपडेट अंतरवालीतल्या गावकऱ्यांना चांगलेच ठाऊक होते. कोणतं शिष्टमंडळ कधी येणार, त्यात कोण असणार तेही गावकऱ्यांना माहिती असायचं.
 
29 तारखेच्या दुपारी गावात फेरफटका मारताना एका घरासमोर असलेल्या ओट्यावर बसलो. शेजारी कापसाचं शेत होतं. महिला कापूस वेचत होत्या.
 
ओट्यावर आजोबा बसून होते. ते आपल्या नातवाला खेळवत होते.
 
जरांगेंच्या उपोषणाबद्दल चर्चा सुरू केली तेव्हा ते म्हणाले, “अहो, 100 कोटींची ऑफर होती पाटलांना. अनेक राजकारण्यांनी ती पाटलांच्या कानात सांगितली. पण हा भला माणूस नाही म्हणाला. समाजासाठी या माणसानं गद्दारी नाही केली.”
 
29 तारखेच्या संध्याकाळी महिलांचा एक मोठा समूह घोषणा देत अंतरवालीत पोहचला.
 
‘पाणी प्या, पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या,’ ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. यावेळी या महिलांच्या डोळ्यात पाणी होतं.
 
लोकांच्या आग्रहास्तव जरांगेंनी 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 1 घोट पाणी पिलं.
 
30 ऑक्टोबरच्या दुपारी माझी भेट अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारख यांच्याशी झाली. व्यासपाठाशेजारी बसून ते येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना सूचना देत होते.
 
मनोज जरांगे यांनी जेव्हापासून अंतरवालीत उपोषण सुरू केलं, तेव्हापासून ते त्यांच्यासोबत कायम दिसत होते.
 
मनोज जरांगेंविषयी विचारल्यावर ते म्हणाले, “जरांगे पाटलांना पैशांची लालूच नाही. त्यांना पुढारपण नाही करायचं. त्यांना फक्त समाजाचं कल्याण करायचं आहे.
 
“पाटील ही चटणी-भाकर खाणारी व्यक्ती आहे. नुकताच आम्ही काही जिल्ह्यांचा दौरा केला. तेव्हा जिथं लोक झोपायचे, तिथंच पाटीलही झोपत होते.”
 
पुढच्या एका दिवसात आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पाणी सोडण्याची घोषणा मनोज जरांगेंनी 31 ऑक्टोबर रोजी केली.
 
31 ऑक्टोबरची ती रात्र
31 ऑक्टोबरची ती रात्र पत्रकार म्हणून मी कधीही विसरू शकणार नाही. 31 ऑक्टोबरलाच संध्याकाळी 6 वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील इटंरनेट सेवा बंद करण्यात आली.
 
त्यानंतर जरांगे पाटलांना पोलिस ताब्यात घेऊ शकतात, अशी अफवा वेगानं पसरली आणि रात्री 11 पर्यंत अंतरवालीत जवळपास 4 हजार तरुण दाखल झाले. अनेकांच्या हातात दांडके होते. आता आपणही तयारीनिशी उतरायचं, असा सूर त्यांच्या बोलण्यात होता.
 
ट्रक भरून आणि इतर खासगी वाहनांतून हे तरुण उपोषणास्थळी येत होते. उपोषणस्थळी येताना ते जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.
 
‘आम्ही पोहचलो, तुम्हीही लवकर या,’ अंतरवालीत पोहचलेल्या तरुणांचे फोनवरील असे संवाद स्पष्टपणे ऐकू येत होते.
 
1 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता आम्ही मुक्कामी असलेल्या धाब्यासमोर पोलिसांची मोठी व्हॅन लावलेली दिसली.
 
तिथं उपस्थित असलेले एका पोलिस कर्मचारी म्हणाले, हा दररोजचा बंदोबस्त आहे. काल रात्री नुसत्या अफवा पसरवण्यात आल्या.
 
अंतरवाली गावात बंदोबस्ताला जात आहात का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "तिथं गावात पोलिस जात नाहीत. कारण पोलिस आले की तिथले लोक चिडतात."
 
सकाळी 9 च्या सुमारास अंतरवालीत माझी भेट गोंदी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्याशी झाली.
 
त्यांच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अंतरवाली सराटी हे गाव येतं. 31 ऑक्टोबरला रात्रभर ते अंतरवालीत ठाण मांडून होते.
 
31 ऑक्टोबरच्या प्रकाराविषयी बोलताना ते म्हणाले, “पोलिस येणार आणि जरांगेंना उचलणार ही अफवा परसली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक इथं जमा झाले होते. त्यांना आम्ही ही अफवा असल्याचं समजून सांगितलं.”
 
ठाकरे हे त्यांच्या यूनिफॉर्मध्ये होते. पण त्यांचे इतर सहकारी मात्र सिव्हिल ड्रेसमध्ये होते.
 
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. अंतरवाली सराटीत उपोषणस्थळी जवळपास निम्म्या जागेवर महिला बसलेल्या दिसत होत्या.
 
दररोज सकाळ, दुपारी आणि संध्याकाळी महिलांचे जत्थेच्या जत्थे घोषणा देत उपोषणस्थळी पोहचत होते.
 
डॉ. मनिषा मराठे संभाजीनगरहून त्यांच्या महिला सहकाऱ्यांसोबत 31 ऑक्टोबरला अंतरवालीत आल्या होत्या.
 
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, “मुलांना शिकवणं आणि नोकरीस लावणं दिवसेंदिवस महाग होत चाललंय. गरीब कुटुंबाला ते परवडू शकत नाही. मुलाला चांगलं शिक्षण देऊन नोकरीला लावणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. याआधी राजकारणी आणि सामाजिक संघटनांच्या लोकांनी मराठा समाजाच्या विश्वासाचं भांडवल केलंय.
 
“पण, मनोज जरांगे हे इमानदार आणि प्रामाणिक नेतृत्व आहे. ते मॅनेज होऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजातील महिलांचा त्यांच्यावर खूप विश्वास बसला आहे.”
 
वयाच्या पंचविशीतला अमित काटकर उपोषणस्थळी मागच्या बाजूला एकटाच उभा होता. बाईटसाठी मी काही लोकांशी बोलत होतो.
 
त्यानंतर तो माझ्याकडे आला आणि मी कोणत्या चॅनेलसाठी काम करतो, याची त्यानं विचारणा केली.
 
मग आमची चर्चा सुरू झाली. अमित एकटाच 550 किलोमीटर अंतर मोटारसायकलवर पार करुन अंतरवालीत दाखल झाला होता. तो सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या वडजल गावात राहतो.
 
चार दिवसांपासून तो अंतरवालीतच थांबला होता.
 
माझ्याशी बोलताना तो म्हणाला, “जरांगेंची तब्येत पाहून मला घरी झोप लागत नव्हती, म्हणून मी इथं आलोय. आमची भाकरी इतक्या दिवस इतरांनी खाल्ली. ती आम्ही परत मागतोय त्यात चूक ते काय?”
 
“मराठा आमदार-खासदारांनी मराठा तरुणांच्या भविष्याचा कधीच विचार नाही केला. सामान्य मराठा तरुणांच्या भविष्याची मूळं रुजवण्याचं काम जरांगे पाटील करत आहेत. जरांगे हा मानवता एकत्र करणारा शास्त्रज्ञ आहे”, अमित पुढे म्हणाला.
 
अमितच्या घरी 3 एकर शेती आहे. त्याचे आई-वडील शेतीच करतात. 2014 ला अमितचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. सध्या तो शेती करतोय.
 
अंतरवालीत असताना तो गावातील ग्रामपंचायत कार्यालया झोपत होता. गावकरी जेवण देतात, अंघोळीला पाणी देतात, असं त्यानं सागितलं.
 
इथं नेटवर्क नाही, तर मी गावाबाहेर जाऊन, नेटवर्क शोधून इथले अपडेट गावातल्या मित्रांना कळवतो, असंही त्यांनी सांगितलं.
1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही, असं सांगत जरांगेंनी पाणी पिणं सोडलं.
 
'मला कधीपर्यंत बोलता येईल आणि कधी माझं बोलणं एकदम थांबेल हे आता सांगता येणार नाही,' असंही ते म्हणाले.
 
जरांगेंच्या बोलण्यावरुन त्यांची तब्येत खालावल्याचं स्पष्ट जाणवत होतं. हा त्यांच्या आमरण उपोषणाचा आठवा दिवस होता.
 
जरांगेंच्या आमरण उपोषणचे दिवस जसजसे वाढत होते, तसतशी लोकांमध्ये, माणूस दोन दिवस उपाशी नाही राहू शकत, पाटील समाजासाठी 8 दिवस उपाशी राहिले आहे, अशी चर्चा सुरू होती.
 
आमच्या चर्चेत एक जण म्हणाला, मला दररोज सकाळी 8 वाजता जेवण लागतं. नाहीतर माझे हात लटलट कापतात.
 
‘पाटील म्हणतील ते धोरण...’
2 नोव्हेंबरच्या दिवशी मी सकाळी अंतरवालीतल्या गावकऱ्यांबरोबर जरांगेंच्या तब्येतीविषयी चर्चा केली.
 
तेव्हा गावातली एक महिला म्हणाली, “अहो, पाटील काल रात्री हातसुद्धा उचलत नव्हते. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो.”
 
2 नोव्हेंबरला मनोज जरांगे सकाळी माध्यमांशी काहीच बोलले नाही. नाहीतर गेले 2 महिने ते सकाळी 11 आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास माध्यमांशी नियमितपणे बोलत होते.
 
2 तारखेला संध्याकाळी 5 च्या सुमारास न्यायमूर्ती आणि मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं. तब्बल अडीच-तीन तास त्यांची चर्चा चालली.
 
त्यानंतर जरांगेंनी माध्यमांशी बोलताना, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ देत असल्याचं जाहीर केलं.
 
जरांगेंच्या या निर्णयाविषयी अंतरवालीत जमलेल्या आंदोलकांशी मी चर्चा केली.
 
यापैकी एक होत्या निर्मला तारख. 1 सप्टेंबरला अंतरवालीत पोलिस आणि आंदोलकांत जी झटापट झाली त्यात निर्मला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला एकूण 29 टाके पडले होते.
 
जरांगेंच्या निर्णयाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आमच्यासाठी पाटील जे म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. पाटील जे म्हणतील तेच करू आम्ही.”
 
या आठ दिवसांमध्ये एक चित्र मला दररोज पाहायला मिळालं. दररोज लोक आपापली निवेदनं घेऊन ती जरांगेंना द्यायला येत होती. ही माणसं जरांगेंच्या पाया पडत होती. त्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढत होते.
 
उपोषणस्थळी आलेली माणसं कुटुंबीयांना व्हीडिओ-ऑडियो कॉल करुन जरांगेंच्या तब्येतीची माहिती देत होते.
 
याशिवाय लोक स्वत:हून मीडियाशी बोलण्यास उत्सुक होते.
 
'जनताच माय-बाप'
1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मी मनोज जरांगे यांच्या अंकुशनगर गावात गेलो. अंतरवाली सराटीतल्या उपोषण स्थळापासून अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या साखर कारखान्याच्या परिसरात ते राहतात. त्यांच्या गावातही महिलांचं साखळी उपोषण सुरू होतं.
 
मी जरांगेंच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांचे वडील रावसाहेब जरांगे बाहेरच एका झाडाखाली चटई टाकून बसले होते.
 
बीड जिल्ह्यातलं गेवराई तालुक्यातील मातोरी हे जरांगेंचं मूळ गाव. पण 17-18 वर्षांपूर्वी ते अंकुशनगरात राहायला आले.
 
मनोज जरांगेंविषयी त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी सांगितलं, “मनोजचं शिक्षण तेरावीपर्यंत झालंय. त्यानं नोकरी-बिकरी काही नाही केलं. नुसता झेंडा हातात घेतला. त्याला आंदोलन करायचाच नाद. खूप आंदोलन केलेत त्यानं सांगता नाही येत. पिंपळगावला केलं, शहागडला केलं, नावं तर कोणती लक्षात ठेवावं. तीस-पस्तीस आंदोलनं झाले.
 
“तो म्हणतो, ही जनताच महे माय-बाप आहे. तुम्ही होते, पण आता नाही. हे आंदोलन शेवटचंच आहे असं म्हणला होता. आता त्यांना हरायचं, नाहीतर आपण मरायचं, असं म्हटला होता.”
 
मनोज जरांगे यांच्याकडे 4 एकर शेती होती. आंदोलनापायी त्यांनी 2 एकर शेती विकल्याचं त्यांचे वडील सांगतात.
 
2 एकरवाला माणूस आज मराठ्यांना त्यांचा पोशिंदा वाटतोय, नेता वाटतोय, याचा आनंद वाटतो का, असा प्रश्न विचारल्यावर जरांगेंचे वडील म्हणाले, “आनंद वाटतो. पण सरकार काहीच करेना. आमचं आरक्षण आम्हाला द्यायला हवं. आम्हाला गरज आहे तर गडबडीनं द्यायला पाहिजे.”
 
जरांगेंचं घर पत्र्याचं आहे. त्यांना एकूण 3 मुली आणि एक मुलगा आहे. या चौघांचंही शिक्षण सुरू आहे.
 
जरांगेंच्या पत्नी सुमित्रा मनोज जरांगे म्हणाल्या, “22 वर्षं झालं ते समाजाचं काम करतात. ते आंदोलनाला जाताना सांगून जातात की, घरी आलो तर तुमचा, नाहीतर समाजाचा.”
 
मनोज जरांगे यांनी काँग्रेस पक्षातही कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं. कालांतरानं त्यांनी 'शिवबा' संघटनेच्या माध्यमातून स्थानिक भागात संघटन उभं केलं.
 
मनोज जरांगेंनी आतापर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. सारथी संस्थेचे प्रश्न, हॉस्टेलचे प्रश्न तसंच शेतीच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केल्याचं त्यांना जवळून पाहणारी माणसं सांगतात.
 
जरांगेंनी काय हेरलं?
जरांगेंनी आतापर्यंत त्यांच्या सर्वच पत्रकार परिषदांमध्ये एक वाक्य हमखास उच्चारलंय.
 
ते म्हणजे, सामान्य कुटुंबातील मराठा तरुणांच्या कल्याणासाठी मी लढतोय. जे या आंदोलनाला विरोध करत आहेत, त्यांनाही सामान्य मराठ्याच्या पोरांचं भलं झालेलं दिसत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केलाय.
 
मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणाचा, नोकरीचा विषय घेतल्यामुळे त्यांनी लोकांच्या काळजाला हात घातलाय.
 
तसं पाहिलं तर सध्या मराठवाड्यातील बेरोजगारी, दुष्काळस्थिती ही परिस्थिती पाहिल्यास कोणत्याही कार्यक्रमाला मग त्या राजकीय सभा असो की धार्मिक कार्यक्रम गर्दी जमते. पण जरांगेंच्या सभेचं, उपोषणाचं वेगळं चित्र असल्याचं अभ्यासक सांगतात.
 
राजकीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव सांगतात, “जरांगेंच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांपैकी 90 ते 95% लोक हे कमिटेड (बांधील होते.) याप्रकरणी काहीतरी मार्ग निघेल अशी त्यांना आशा आहे. नोकरीपेक्षा शिक्षणासाठी खूप पैसे द्यावे लागणं या मुद्द्यावर सगळीकडे नाराजी आहे. शिवाय ओबीसींना मिळणारे फायदेही दिसत आहेत. याशिवाय जरांगेंचं बोलणं, फाटक असणं, जिगरबाजपणा लोकांना भावतोय. त्यामुळे त्यांना जबरदस्त सहानुभूती मिळत आहे.”
 
“पण, जरांगेंना हे सगळं झेपेल का हा प्रश्न आहे. कारण त्यांचं कोणतंही केडर नाहीये. इतर मराठा संघटनांप्रमाणे त्यांचं महिला, पुरुष आणि तरुणांचं वेगळं केडर नाहीये. त्यांना जनतेची सहानुभूती मिळाली आणि मग ते मास लीडर झालेत. त्यांचं मोठं वलय निर्माण झालंय. त्यामुळे समजा त्यांना हवं ते नाही झालं, तर मग हे लोक सैरभैर होतील, ही भीतीसुद्धा वाटते,” भालेराव पुढे सांगतात.
 
सध्यातरी आरक्षण मिळणं हे संपूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
 
मराठा आरक्षणाची मागणी बरोबर आहे की चूक हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल.
 
पण यावेळेला आंदोलकांचा भ्रमनिरास झाला तर मात्र वाईट परिस्थिती निर्माण होईल, यात दुमत नसल्याचं राजकीय विश्लेषकांच्या बोलण्यातून समोर येतं.